मयत युवकाची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू
म्हापसाः मालीम, बेती बिठ्ठोण येथे मांडवी पुलाखाली मासळी कापण्याच्या जुन्या शेडमध्ये ३० वर्षीय अज्ञात युवकाचा दगडाने खून करण्यात आला होता. याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी मालीम जेटी येथे वास्तव्यास असलेले संशयित आरोपी कृष्णा मंधार प्रदान (१८, रा. झारखंड) व भौला उर्फ भोला उर्फ नारायण सिंग (२३, रा. झारखंड) या दोघांना अटक करून या प्रकरणाचा छडा लावला. दरम्यान, अद्याप मृताची ओळख पटलेली नाही. तोही झारखंड मधीलच असल्याचे माहिती मिळाली असून पोलीस त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
शनिवारी 9९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ च्या सुमारास बिठ्ठोणच्या बाजूने मांडवी पुलाखाली मालीम बेती येथील जुन्या मासळी कापण्याच्या शेडमध्ये एका ३० वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता.
मयताचा चेहरा दगडाने ठेचून त्याच्या डोक्यावर काचेच्या बाटल्या फोडण्यात आल्या होत्या. घटनास्थळी दारूच्या बाटल्या, रिकामे प्लास्टिक ग्लास, पाण्याची बाटली हे साहित्य पडले होते. त्यामुळे दारूच्या नशेत मयत व आरोपींमध्ये भांडण होऊन त्यातून हा खूनाचा प्रकार घडल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून आले होते.
पोलिसांनी चौकशीनंतर वरील दोघा संशयितांना रविवारी रात्री ताब्यात घेतले होते. संशयितांनी खुनाचा गुन्हा कबूल केल्यानंतर दोन्ही संशयितांना रितसर अटक करण्यात आली. म्हापसाला न्यायालयाने संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस निरीक्षक राहूल परब यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मयूर सावंत, प्रतिक तुळसकर, आकाश चोडणकर, अरुण शिरोडकर, सहाय्यक उपनिरीक्षक उमेश पावसकर, हवालदार कख, सुनील चव्हाण, आकाश नावेलकर, विराज मळीक, वैभव कांबळी, ईश्वरराज शेट, सिध्देश परब, सर्वेश मार्टीन, प्रितेश किनळेकर, मनोहर परवार, कल्पेश गावस (पणजी किनारी पोलीस), निखिल भैमयकर, सिध्देश नाईक व हरूण शेख या पथकाने ही कामगिरी केली. पुढील तपास पोलीस अधीक्षक अक्षत कौशल व उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
रोजंदारीवर करायचे काम
संशयित आरोपी कृष्णा प्रधान व भोला सिंग हे दोघे झारखंड येथील असून ते मालीम जेटी येथे रोजंदारीवर मासेमारी बोटीवर काम करत होते. मासेमारी सुरू झाल्यानंतर दोन तीन महिन्यांपूर्वी ते गोव्यात आले होते व जेटी परिसरातच राहत होते.