मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून एक व्यावसायिक डिजिटल अरेस्टचा शिकार बनल्याची घटना समोर आली आहे. भोपाळ पोलिसांनी वेळीच व्यावसायिकाला डिजिटल अरेस्ट मधून सोडवले तसेच त्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्यापासूनही वाचवले.
भोपाळ : गेल्या काही काळापासून देशात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यातच 'डिजिटल अरेस्ट'च्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. आता भोपाळ पोलिसांनी एका व्यावसायिकाला डिजिटल अरेस्टमधून सोडवले तसेच त्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्यापासून वाचवले आहे. या संपूर्ण घटनेची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. सायबर गुन्हेगारांनी शनिवारी या व्यावसायिकाला फोन करून भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) चे अधिकारी असल्याचे भासवत आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला.
समोर आलेल्या माहितीनुसार शनिवारी भोपाळच्या अरोरा कॉलनीत राहणाऱ्या विवेक ओबेरॉय यांना शनिवारी एक कॉल आला. कॉल करणाऱ्याने आपण ट्रायचे अधिकारी असल्याचे भासवले. पुढे कॉल करणाऱ्याने विवेकला 'तुमच्या नावे अनेक बँक खाती उघडण्यात आली असून आधार कार्डचा गैरवापर करत अनेक सिमकार्ड घेतली गेली आहेत तसेच आम्हाला तुमच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा संशय'असल्याचे सांगितले. दरम्यान या अधिकाऱ्याने विवेकला स्काइप व्हिडिओ कॉलिंग ॲप डाऊनलोड करण्यास प्रवृत्त केले तसेच स्वतःला एका खोलीत बंद करण्यास सांगितले.
दरम्यान रूममध्ये जाताना विवेकने खबरदरीचा उपाय म्हणून भोपाळच्या सायबर क्राइम अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. विवेक एव्हाना डिजिटल अरेस्ट झालाच होता की पोलिस तेथे पोहोचले. दरम्यान सायबर पोलिसांनी या बनावट ठगोबा पोलीस अधिकाऱ्याला आपली ओळख सांगितल्यावर गुन्हेगारांनी व्हिडिओ कॉल डिस्कनेक्ट केला. भोपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगारांना विवेकच्या बँकखात्याची माहिती मिळाली होती. मात्र पैसे हस्तांतरण होणारच इतक्यात पोलिसांनी येथे पोहचून सगळं बनाव हाणून पाडला.
लोकांना लुबाडण्यासाठी सायबर ठगोबा नेहमी नव्या क्लूप्त्यांचा अवलंब करतात. आता त्यांनी डिजिटल अरेस्ट यास आपले हत्यास बनवले आहे. ते प्रथम आपले सावज हेरतात. त्यांचा बॅकग्राऊंड चेक करतात. मग त्याला कॉल करत आपण अमुक तमुक खात्याचे अधिकारी असल्याचा बनाव रचत डिजिटल अरेस्टचे सवंग रचतात. याद्वारे आजवर देशात तब्बल १२०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची नोंद आहे. मागील मन की बातच्या भागात देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी याबाबत स्वध राहण्याचे आवाहन देखील केले होते.