पर्वरी पोलिसांकडून तपास सुरू
म्हापसाः मालीम, बेती बिठ्ठोण येथे मांडवी पुलाखाली मासळी कापण्याच्या ठिकाणी एका अज्ञात युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. मयत युवक हा ३० ते ३५ वयोगटातील असून तो गोव्याबाहेरील आहे. याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी अनोळखी संशयितांविरूध्द खूनाचा गुन्हा नोंद केला आहे.
ही घटना शनिवारी ९ रोजी संध्याकाळी ६च्या सुमारास उघडकीस आली. बिठ्ठोणच्या बाजूने मांडवी पुलाखाली मालीम बेती येथील मासळी कापण्याच्या जागी एका व्यक्तीचा मृतदेह काहींना आढळून आला.
याबाबतची माहिती मिळताच पर्वरी पोलीस निरीक्षक राहूल परब यांनी सहकार्यांसह धाव घेतली. मयताच्या तोंडावर दगडाने ठेचल्याच्या जखमा होत्या. तसेच त्याच्या शरीरावर इतर ठिकाणीही मारहाणीचे घाव होते. मयताच्या अंगावर टीशर्ट आणि हाफ पँट होती.
हा खूनाचा प्रकार असल्याचे आढळून आल्यावर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह गोमेकॉत पाठवून दिला. त्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये अज्ञात संशयितांविरूध्द खूनाचा गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस मयताची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस अधीक्षक अक्षत कौशल व उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल परब करत आहेत.