पीडित महिलेवर बांबोळी रुग्णालयात उपचार सुरू
पेडणेः पेडणे, गडेकर भाटले येथील प्रभावती द्वारका प्रसाद नामक महिलेवर तिच्या राहत्या घरी हल्ला करून तिचे मंगळसूत्र आणि मोबाईल फोन सर्व मिळून रु. ८० हजारांचा ऐवज घेऊन फरार झालेल्या रुपेश आना कांबळी (वय ४०, रा.कवठणी, महाराष्ट्र) या संशयिताला पेडणे पोलिसांनी शनिवारी (दि. ०९ नोव्हेंबर) अटक केली आहे. सदर घटना ०५ नोव्हेंबर रोजी घडली होती. दरम्यान पीडित महिलेवर सध्या बांबोळी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेसंबंधी प्रथमेश द्वारकाप्रसाद यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित रुपेश याने फिर्यादीच्या घरात घुसखोरी करून तक्रारदाराच्या आई प्रभावती द्वारका प्रसाद या घरात एकट्याच असल्याची संधी साधून कोयत्याने त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार करत प्राणघातक हल्ला केला.
तसेच त्यांचे सोन्याचे मंगळसूत्र व नोकिया मोबाईल फोन असा एकूण रु. ८० हजारांचा ऐवज घेऊन पळ काढला. यासंबंधी प्रथमेश द्वारकाप्रसाद याने पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला.
पोलिसांना सुत्रांकडून माहिती मिळाल्यावर त्यांनी तांत्रिक पाळत ठेवली असता गोवा सीमेनजीक नयबाग, पेडणे येथे सदर व्यक्ती आढळून आली. घटनास्थळी जात पोलिसांनी संशयिताला पकडून त्यांची चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे सांगितले. त्यानंतर रुपेश कांबळी याला अटक करण्यात आली.
पोलीस इन्स्पेक्टर सचिन बी. लोकरे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस कॉन्स्टेबल सागर खोर्जुवेकर, शशांक साखळकर, प्रज्योत मयेकर, संदेश वरक आणि मिथिल परब यांनी या दरोडा प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सहभाग घेतला.