आरोपी तुरूंगातून सुटल्यानंतर गुंतला होता पुन्हा ड्रग्ज विक्री व्यवसायात
म्हापसा : हरमल, पेडणे येथे गुन्हा शाखेने ड्रग्ज विरोधी कारवाईखाली ७५ हजारांचा ८.७५ ग्रॅम एक्स्टसी टॅबलेट हा एमडीएमए ड्रग्ज जप्त केला. याप्रकरणी ओबीनेरी उडोको अॅंथनी उर्फ टोनी (४६, रा. हरमल) या नायजेरियन नागरिकाला अटक केली. संशयित आरोपी तुरूंगातून सुटल्यानंतर पुन्हा ड्रग्ज विक्री व्यवसायात गुंतला होता.
गुन्हा शाखेच्या पोलिसांना हरमल येथील टीएनजे सँडबॅंक्स या हॉटेलच्या समोरील पार्किंग स्थळी ड्रग्ज विक्री व्यवहार होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार शनिवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपीला पकडले.
झडतीवेळी त्याच्याजवळ ८.७५ ग्रॅमच्या गुलाबी रंगाच्या साडेपंधरा एक्स्टसी गोळ्या सापडल्या. या एमडीएमए ड्रग्जची किंमत ७५ हजार रूपये आहे. तसेच पोलिसांनी संशयिताकडून एक मोबाईल व जीए ०३ एके ३०६१ क्रमांकाची अॅक्टीवा दुचाकी जप्त केली.
संशयिताला ड्रग्ज प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून पोलिसांनी अटक केली असून त्याला पेडणे न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता, उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक निनाद देऊलकर, सहाय्यक उपनिरीक्षक संतोष गोवेंकर, श्रीराम साळगावकर, हवालदार इर्शाद वाटांगी, कॉन्सटेबल महाबळेश्वर सावंत, संजय गावकर व क्रितेश किनळकर हा पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
पाच वर्षांपूर्वी झाली होती अटक
संशयित आरोपी ओबीनेरी उडोको अॅंथनी उर्फ टोनी यास पाच वर्षांपूर्वी पेडणे पोलिसांनी ड्रग्स प्रकरणी अटक केली होती. या गुन्ह्यात संशयित कोलवाळ कारागृहात होता. पाच वर्षांनी गेल्या जुलै २०२४ मध्ये टोनी कारागृहातून सुटला होता. त्यानंतर पुन्हा त्याने ड्रग्स विक्री व्यवसाय सुरू केला.