उत्तर गोव्यात ऑक्टोबरमध्ये ५५ हजार भाडेकरूंची पडताळणी

चालू वर्षी १ लाखांची पडताळणी : पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांची माहिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th November, 11:37 pm
उत्तर गोव्यात ऑक्टोबरमध्ये ५५ हजार भाडेकरूंची पडताळणी

म्हापसा : उत्तर गोव्यात पोलिसांनी भाडेकरू पडताळणी मोहीम राबवत ऑक्टोबर महिन्यात विक्रमी अशी ५५ हजार लोकांची पडताळणी केली. चालू वर्षी आतापर्यंत १ लाख भाडेकरूंची पडताळणी केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व पोलीस महासंचालक आलोक कुमार यांच्या सूचनेनुसार ही मोहीम राबवण्यात आली, अशी माहिती पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली.

पर्वरी येथील उत्तर गोवा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी भाडेकरू पडताळणी हे एक महत्त्वाचे साधन आहे. संभाव्य गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना ओळखण्यात यामुळे मदत होते. भाडेकरू पडताळणी केल्याने कायद्याची अंमलबजावणी करता येते तसेच नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करते, असे अधीक्षक कौशल म्हणाले.

ऑक्टोबर महिन्यात विक्रमी ५५ हजार २६ जणांची भाडेकरू पडताळणी पूर्ण करण्यात आली. हे यश आमच्या उत्तर गोव्यातील १४ पोलीस स्थानकांच्या कर्मचाऱ्यांमुळे प्राप्त झाले. सध्या या सर्व भाडेकरूंची पार्श्वभूमीची पडताळणी केली जात असून संशयास्पद इतिहास असलेल्यांवर योग्य ती कारवाइ केली जात आहे, असे कौशल यांनी सांगितले.

तसेच ज्यांनी योग्य पडताळणी न करता आपली जागा या लोकांना भाड्याने दिलेल्या घरमालकांचा अहवाल उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जात आहे. भाडेकरू पडताळणीद्वारे स्थानिक रहिवाशांची सुरक्षाच नव्हे तर गोव्यातील पर्यटकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी मदत होईल, असा दावा कौशल यांनी केला.

मोहीम सुरूच राहणार

पर्यटन हंगाम तसेच सेंट फ्रान्सिस झेवियर शवप्रदर्शन जवळ येत आहे. या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आव्हानांना तोड देण्यासाठी भाडेकरू पडताळणी मोहीम तीव्र करण्याची योजना आखण्यात आली आहे. हा उपक्रम भविष्यातही सुरूच राहील, असे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी सांगितले.

१४ पोलीस स्थानकांमार्फत पडताळणी

चालू वर्षी आतापर्यंत उत्तर गोव्यातील १४ पोलीस स्थानकांमार्फत १ लाख ८ लोकांची सत्यता पडताळणी करण्यात आली. यात पणजी ७०००, जुने गोवे १२२१५, आगशी १६३१, म्हापसा ८९३३, कोलवाळ ४७२३, हणजूण ४४६१, पेडणे १९१७, मोपा १८३०, मांद्रे १२४३, कळंगुट १७९८२, पर्वरी १९११४, साळगाव ५३९२, डिचोली ९५१६, वाळपईत ४०५१ जणांची पडताळणी करण्यात आली. 

हेही वाचा