खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी ही म्हण तुम्ही ऐकली असेलंच. तूप खाल्ल्याने आरोग्यासाठी भरपूर फायदे मिळतात. तूप म्हणजे गाईच्या दुधापासून बनलेलं दही घुसळून त्यातून निघालेलं लोणी कढवून तयार केलेलं साजूक तूप. गरम गरम भात, त्यावर पिवळं धमक वरण आणि त्यावर साजूक साजूक तुपाची धार, गरम उकडीचा मोदक आणि त्यावर सोडलेली तूपाची धार असो किंवा गरम पुरण पोळी आणि त्यावर भरपूर साजूक तूप... असे पदार्थ खाल्ले की पोट टम्म भरतं आणि आनंद वाटतो की नाही?
पण तुमच्यापैकी काही जणांना तूप आवडत नसेल, तर आज मी तुम्हाला तूप खाण्याचे खूप महत्त्वाचे फायदे सांगणार आहे. ते वाचल्यावर तुम्हाला तूप नक्की आवडू लागेल आणि तूप खायला तुम्ही सुरुवात सुद्धा कराल.
रोज एक चमचा तूप जेवणाबरोबर खाल्लं तर बुद्धी, स्मरण शक्ती वाढते. खूप अभ्यास करून सुद्धा तो परीक्षेत आठवत नाही असं ज्यांना होतं त्यांनी रोज १-१ चमचा तूप खाऊन बघा.
तूप खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. मोबाईल वापरून येणारा डोळ्यांवरचा ताण कमी करण्यासाठी बंद डोळ्यांवर तूपाने हळू मालिश करावी.
रोज तूप खाल्ल्याने त्वचा सुद्धा मऊ आणि चमकदार बनते.
खूप भूक लागली असेल तर गरम चपातीला तूप लावून त्यावर थोडीशी साखर भुरभुरवून त्याचा मस्त रोल करून खाल्ला की पोट ही भरतं आणि इन्स्टंट एनर्जी सुद्धा मिळते.
नाक कोरडं होत असेल, चुरचुरत असेल, श्वास घेताना त्रास होत असेल तर नाकपुड्यांमध्ये तूप लावल्याने त्रास कमी होतो.
तुमच्या आई-बाबांना किंवा आजी आजोबांना रात्री झोप लवकर येत नसेल, तर रात्री झोपताना त्यांच्या तळपायांना तूपाने रोज मालिश करा. त्यांना शांत झोप लागेल.
ओठांच्या साली निघून दुखत असेल किंवा जेवताना चुकून ओठ चावला गेला तर तिथे लगेच तूप लावले असता त्रास होत नाही.
तूप खाल्ल्याने ताकद सुद्धा वाढते.
देवाची पूजा करताना आपण जेव्हा देवाला पंचामृत स्नान घालतो त्या पंचामृतात सुद्धा तूप असतं. म्हणजेच तूप आपण सुद्धा आपल्या त्वचेला बाहेरून लावू शकतो. देवाच्या नैवेद्यात तूप अर्पण केलं जातं.
देवाला सुद्धा तूप आवडतं कारण ते आरोग्यासाठी बेस्ट आहे. लहान मुलं ही देवासारखीच असतात म्हणून तुम्ही सर्व लहान मुलांनी सुद्धा रोज वरण-भात-तूप, पोळी तूप साखर, तूप-मेतकूट-भात, दूध-तूप, पंचामृत असे पदार्थ खाऊन बुद्धी, स्मरण शक्ती व ताकद वाढवली पाहिजे.
रोज गाईचं तूप खा आणि स्वस्थ रहा, मस्त रहा.
- वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य