हँड, फूट एण्ड माऊथ डिसीज हा आजार तुमच्यापैकी काही जणांना होऊन गेला असेल, काहींना अजून होत आहे. शालेय मुलांना हा आजार होतो आणि तो आजार पसरूही शकतो. यामध्ये गुडघ्यावर, कोपरावर, काखेत, तसेच तोंडात पुरळ येतात. त्या ठिकाणी खाजही येते. काहींना तापही येतो, काहींना खाऊ सुद्धा खाता येत नाही कारण जीभ, घसा दुखत असतो.
पण तुम्हाला माहीत आहे का? ज्यांची रोगप्रतिकार शक्ती म्हणजेच रोगांचे जिवाणू, विषाणू यांच्याशी लढण्याची शरीराची शक्ती चांगली असते त्यांना मात्र या आजाराचा खूप त्रास होताना दिसत नाही. कारण शरीरातील रोगजंतूंशी लढणाऱ्या पेशी लगेच त्या ठिकाणी येऊन ढिशुम ढिशुम करून त्या रोगजंतूंना मारून टाकतात. रोगांशी लढण्याची शरीराची ताकद कशी वाढवावी हे आपण नंतर कधी तरी जाणून घेऊया. तसेच जी मुलं वेळेत औषध घेतात, आई-बाबांनी सांगितलेल्या भाज्या आणि इतर घरी बनवलेले पदार्थ खातात त्यांचा कोणताही आजार लवकर बरा होतो.
परंतु जी मुलं औषध घ्यायचा कंटाळा करतात, रडतात, आई-बाबांना त्रास देतात अशा मुलांना मात्र या व्याधींचा जास्त दिवस त्रास सहन करावा लागतो. औषध न घेतल्यामुळे त्रास तर लवकर कमी होतच नाही, शाळाही बुडते आणि चांगलं चांगलं खायलाही मिळत नाही. याउलट डॉक्टरांनी सांगितलेलं, आई-बाबांनी सांगितलेलं ऐकून औषध जर तुम्ही व्यवस्थित घेतलं, तर तुमचा आजार औषधांना घाबरून लगेच पळून जाईल आणि तुम्हाला खूप लवकर बरं वाटेल. त्यामुळे आजपासून कोणताही आजार झाला, तर कटकट न करता आजीने सांगितलेलं घरगुती औषध किंवा तुमच्या डॉक्टरांनी दिलेली औषधं नीट आणि कंटाळा न करता घ्या आणि लवकर निरोगी व्हा.
वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य