शिवोलीत पर्यटकांची धोकादायक स्टंटबाजी : वाहतुकीला अडथळा

हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांमुळे गोव्याच्या पर्यटनाला गालबोट : स्थानिक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
शिवोलीत पर्यटकांची धोकादायक स्टंटबाजी : वाहतुकीला अडथळा

पणजी : देशविदेशातील पर्यटकांचे (Tourist) पसंतीचे ठिकाण म्हणजे‌ निसर्गसंपन्न गोवा (Goa).  मोठ्या संख्येने पर्यटक गोव्यात आनंद घेण्यासाठी येत असतात. मात्र, काही हुल्लडबाज, नशेखोर पर्यटकांमुळे गोव्याच्या पर्यटनाला गालबोट लागताना दिसत आहे. नाहक गोव्याची बदनामी होताना दिसत आहे. नशेच्या धुंदीत वाहने चालवून (Vehicles) अपघाताला (Accident) कारणीभूत ठरणे, वाहने चालवताना जीवघेणी स्टंटबाजी करून इतरांचा जीव धोक्यात टाकणे; बंदी असताना वाहने घेऊन समुद्रकिनाऱ्यावर (Beaches of Goa)  जाणे,  गुन्हेगारी प्रकारांत गुंतण्याचे प्रकार दिसून येतात. शिवोली (Siolim)  परिसरात चालत्या कारमध्ये धोकादायक स्टंटबाजी करताना काही पर्यटक दिसले आहेत. येथील स्थानिकांनी चिंता व्यक्त करताना या पर्यटक युवकांना कारसहीत कॅमेऱ्यात टिपले आहे. 

शिवोली येथील सेंट अॅंथनी चर्च परिसरात कारमधून जात असलेल्या पर्यटकांची ही स्टंटबाजी काहीजणांनी पाहिली. डिल नोंदणीच्या कारमधून स्टंटबाजी करीत असलेले हे युवक नशेत असल्याचा संशयही येथील काही स्थानिकांनी व्यक्त केला. 

चालत्या कारमध्ये स्टंटबाजी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे हे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. या प्रकारांमुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या इतर वाहनचालकांच्या आणि नागरिकांच्या जीवितालाही धोका पोहोचू शकतो. प्रशासनाने या प्रकारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. गोवा हे शांत, सुरक्षित आणि पर्यटनस्नेही राज्य म्हणून ओळखले जाते. पर्यटकांनी वाहतूक नियमांचे पालन करून आणि जबाबदारीने वागून गोव्यातील पर्यटनाचा आनंद लुटावा; असे आवाहन शिवोलीतील काही स्थानिकांनी केली.   


हेही वाचा