कृषी खाते, वन खात्याने उपाययोजना करण्याची मागणी

पणजी : नारळ, काजू, आंबा व केळीपाठोपाठ (Coconut, Cashew, Mango, Banana) आता माकडांनी (Monkeys) गोव्यातील (Goa) सुपारी (Areca Nut) बागांमध्ये हैदोस घालून नासधूस करणे सुरू केले आहे. त्यामुळे शेतकरी, बागायतदार चिंतेत आहेत. गेल्या काही दिवसांत सत्तरी तालुक्यातील Sattari Taluka) विविध भागांत सुपारी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.
माकड व इतर जनावरांमुळे इतर फळ पिकांचे सातत्याने नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी सुपारी लागवडीकडे मोर्चा वळवला होता. आजवर माकडांचा सुपारीकडे फारसा कल नव्हता. त्यामुळे हे पीक तुलनेने सुरक्षित मानले जात होते. मात्र; आता माकडांनी सुपारीवरही हल्ले सुरू केल्याने शेतकऱ्यांच्या उपजीविकेवरच गदा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गेल्या दहा-पंधरा वर्षांत गोव्यासहीत सत्तरी तालुक्यात माकडांचा उपद्रव सातत्याने वाढत आहे. सुरूवातीला नारळ पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आजही नारळ लागवडीला फटका बसत असून अनेक शेतकरी नव्याने नारळाची लागवड करण्यास अनुत्सुक आहेत. नारळासह केळी, पपई, चिकू, आंबा व काजू पिकांचेही माकडांकडून मोठे नुकसान होत आहे.
शेतकऱ्यांचा सुपारीकडे कल
सततच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी सुपारी लागवडीवर भर दिला. अनेक वर्षे माकडांनी या पिकाला हात न लावल्याने सत्तरी तालुक्यात सुपारीच्या बागांची संख्या वाढली. कृषी खात्याच्या सर्वेक्षणानुसार, चांगली बाजारपेठ असल्याने अनेक शेतकऱ्यांनी अनुदानाशिवायही सुपारी लागवड केली आहे.
आता मात्र परिस्थिती बदलली आहे. माकडे सुपारीच्या झाडांवर चढून घडांचे नुकसान करत आहेत, फळांचा रस पिऊन सुपाऱ्या खाली फेकून देत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे उत्पादनात घट होत असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
सत्तरी तालुका हा सुपारी उत्पादनासाठी महत्त्वाचा मानला जातो. नारळ लागवड आधीच घटत असताना सुपारीलाही जर असा फटका बसला, तर अनेक शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे.
नाणेली येथील सुपारी उत्पादक महेश गावकर यांनी सांगितले की, “आधी माकडांनी नारळ, पपई, काजू, चिकू व आंबा पिकांचे नुकसान केले. आता सुपारीच्या झाडांवरही हल्ले वाढले असून नुकसान दिवसेंदिवस वाढत आहे.”
सरकारने विशेष लक्ष द्यावे
सत्तरीसह गोव्यातील इतर बागायती भागांतील शेतकरी गेली पंधरा वर्षे वन्यप्राण्यांच्या उपद्रवावर नियंत्रण आणण्याची मागणी करत आहेत. मात्र या समस्येकडे अपेक्षित तेवढे लक्ष दिले जात नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. पर्येच्या आमदार देविया राणे यांनीही हा मुद्दा विधानसभेत अनेकदा उपस्थित केला असल्याची माहिती येथील स्थानिक बागायतदारांनी दिली.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, सरकारने तातडीने लक्ष घालून माकडांचा उपद्रव रोखण्यासाठी प्रभावी व कठोर उपाययोजना कराव्यात, अन्यथा सत्तरीतील शेतीच धोक्यात येईल.