साळगावात रेंट-अ-बाईक व्यवसायावरून राडा; बाप-लेकावर प्राणघातक हल्ला

घटना सीसीटीव्हीमध्ये कैद...

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
36 mins ago
साळगावात रेंट-अ-बाईक व्यवसायावरून राडा; बाप-लेकावर प्राणघातक हल्ला

पणजी : साळगाव येथील ग्रँड मरड परिसरात रेंट-अ-बाईक व्यवसायातील आर्थिक वादातून एका गटाने बाप-लेकावर भररस्त्यात प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. 

मंजीत महेश नाईक आणि त्यांचे वडील महेश नाईक यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली असून, संशयितांनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून साळगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी हॉटेल अल्डिया सिएस्टा जवळ हा प्रकार घडला. रेंट-अ-बाईक व्यवसायातील व्यवहारावरून मंजीत नाईक आणि संशयितांमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती. वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊन संशयितांच्या गटाने मंजीत आणि त्यांच्या वडिलांना बेदम मारहाण केली.

भरवस्तीत सुरू असलेल्या या राड्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, घाबरलेल्या नाईक कुटुंबीयांनी तत्काळ साळगाव पोलीस स्थानकात धाव घेऊन संरक्षणाची मागणी केली आहे. साळगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून संशयितांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, पर्यटन व्यवसायाशी संबंधित वादांची ही पहिलीच वेळ नाही. २९ डिसेंबर रोजी रात्री दोन रेंट-अ-बाईक व्यवसायिकांमध्ये झालेल्या भीषण वादात एकाने दुसऱ्याच्या कानाचा लचका तोडल्याची धक्कादायक घटना घडली होती. नितेश कांदोळकर या जखमीवर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आले.

नंतर म्हापसा पोलिसांनी याप्रकरणी समीर पेडणेकर या संशयिताला ताब्यात घेतले. अशा गुंडगिरीच्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, पोलिसांनी कठोर कारवाई करून कायदा व सुव्यवस्था राखावी, अशी मागणी जोर धरत आहे.

हेही वाचा