गोव्यातील व्हिलाच्या किमतींमुळे मुंबई, दिल्ली, नोयडातील बांधकाम व्यवसायात खळबळ

पणजी : गोव्यातील शांत, हिरवळीने नटलेले मयडे गाव सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. नुकत्याच एका आंतरराष्ट्रीय लिलाव संस्थेने मयडे येथे सहा बेडरूमचा एक आलिशान व्हिला तब्बल १०५ कोटी रुपयांहून अधिक किमतीला सूचीबद्ध केला आहे. त्यामुळे गोव्यातील जमिनी आणि घरांच्या किमती कशा गगनाला भिडल्या आहेत.
दिल्ली आणि मुंबईसारख्या महानगरांनाही थक्क करणाऱ्या या किमतीमुळे गोव्यातील रिअल इस्टेटमधील उच्चभ्रू किनारपट्टी सोडून अंतर्गत गावांमध्ये शिरल्याचे दिसून येत आहे. या अवाढव्य किमतीमुळे सर्वसामान्य मूळ गोमंतकीयांना गोव्यात स्वत:चे घर बांधणे किंवा एखादा फ्लॅट खरेदी करणे दुरापास्त होत आहे.
करोना महामारीनंतर गोव्यात स्थायिक होणाऱ्या श्रीमंत वर्गाच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सुरुवातीला उत्तर गोव्यातील आसगाव आणि शिवोली या भागांना पसंती दिली जात होती. मात्र, तिथे जागा अपुरी पडू लागताच आता धनदांडग्यांनी आपला मोर्चा मयडे, हळदोणा आणि नास्नोळा यांसारख्या अंतर्गत गावांकडे वळवला आहे. एकेकाळी लेखक आणि कलाकारांचे गाव म्हणून ओळखले जाणारे मयडे आता आलिशान व्हिला प्रकल्प, हाय-फाय कॅफे आणि खासगी क्लब्सचे केंद्र बनू लागले आहे.अभ्यासकांच्या मते, २०११ च्या जनगणनेनुसार, गोव्यातील जवळपास २५ टक्के घरे आजही रिकामी आहेत. ही ती घरे आहेत जी गुंतवणूक म्हणून किंवा ‘सुटीतील घर’ म्हणून श्रीमंतांनी खरेदी केली आहेत. एकीकडे हजारो घरे रिकामी असताना दुसरीकडे स्थानिकांना राहण्यासाठी जागा मिळत नाही, हे चित्र गोव्याच्या भविष्यातील सामाजिक आणि पर्यावरणीय संतुलनासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
शहरीकरणामुळे निसर्गाचा ऱ्हास
* जुन्या गोव्याची ओळख असलेली विहीर, बाग आणि मोकळी अंगणे आता ‘ग्रे’ रंगाच्या आधुनिक व्हिला प्रकल्पांच्या आड हरवत चालली आहेत.
* मोठ्या व्हिला प्रकल्पांमुळे भूगर्भातील पाणी पातळी खालावली आहे.
* वाढत्या लोकसंख्येमुळे कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
* अरुंद रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढली आहे.
स्थानिक गोमंतकीयांची घुसमट
रिअल इस्टेटच्या या ‘बूम’चा सर्वात मोठा फटका मूळ गोमंतकीयांना बसत आहे. जमिनींचे दर अवाढव्य वाढल्यामुळे सामान्य गोमंतकीयाला स्वतःच्या गावात घर बांधणे किंवा फ्लॅट खरेदी करणे आता स्वप्नवत झाले आहे. बाहेरून येणारे सेलिब्रीटी आणि व्यावसायिक ‘सेकंड होम’ म्हणून कोट्यवधींची गुंतवणूक करत असताना, स्थानिक तरुण मात्र रोजगारासाठी आणि घरासाठी संघर्ष करत आहेत.