उ उ... उवांचा!!!

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
13th October, 03:53 am
उ उ... उवांचा!!!

उष्णता प्रचंड वाढली आहे ना वातावरणात? उष्णता वाढली की घाम खूप येतो आणि अश्यावेळी शरीराची नीट स्वच्छता ठेवली नाही तर अनेक त्रास निर्माण होतात. त्यातीलच एक म्हणजे डोक्यातील उवा व लिखा. 

उवा वाढण्यासाठी  पोषण कुठून मिळतं तुम्हाला माहीत आहे का? उवांना मानवी रक्तातून पोषण मिळते. डोक्यातील उवांमुळे डोक्याला खाज सुटणे, लालसरपणा यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. सारखी खाज आल्यामुळे अभ्यासात सुद्धा लक्ष लागत नाही, हात सारखे डोकं खाजवण्यात व्यस्त असतात. उवा काढण्यासाठी वेळीच योग्य उपचार केले नाहीत तर उवा त्वचेच्या वरच्या भागात घरे करतात, तिथे खूप वेदना होतात, केस सुद्धा विंचरता येत नाही. उवा केसांमध्ये खूप अंडी घालतात, ज्यांना लिखा असं म्हटलं जातं. या लिखा केसांना घट्ट चिकटलेल्या असल्याने त्या काढणे कठीण जाते. 

उवा एका माणसाच्या डोक्यातून दुसऱ्या माणसाच्या डोक्यात पसरू शकतात. म्हणून एकमेकांचा कंगवा, टोपी, स्कार्फ, हेअर बॅंड, क्लिप्स, टॉवेल वापरणे टाळा. ज्यांना उवा आहेत त्यांनी वापरलेली उशी, अंथरूण, पांघरूण सुद्धा वापरू नका किंवा अश्या मुलांशेजारी झोपू नका. 

   उवा होऊ नये म्हणून डोके, केस स्वच्छ ठेवा. 

   घाम जास्त येत असल्यास रोज डोक्यावरून आंघोळ करून केस नीट सुकवा. 

   उवा झाल्या असतील तर त्या काढण्यासाठी काही घरगुती उपाय पुढीलप्रमाणे तुम्ही करू शकता.

   शनिवारी रात्री १/२ वाटी खोबरेल तेल कोमट करून त्यात भीमसेनी कापराची बारीक पूड १/४ चमचा घाला, हे तेल चांगले केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत आई किंवा आजीकडून लावून घ्या. डोक्याला पांढरा पंचा किंवा सुती टॉवेल बांधा व झोपा. सकाळी टॉवेल काढून केस बारीक दातांच्या कंगव्याने विंचरा, असे केल्याने उवा लिखा सहज निघतील. त्यानंतर कडूनिंबाच्या काढ्याने केस धुवा. असं सलग ४-५ शनिवार रविवार केल्याने उवा नाहीश्या होतील. निंब तेल सुद्धा वापरू शकता. 

   ज्यांच्याकडे सिताफळाचे झाड आहे त्यांनी सिताफळाच्या पानांचा रस काढून रात्री केसांच्या मूळांशी चोळून लावावा आणि दुसऱ्यादिवशी वर सांगितल्या प्रमाणे केस विंचरून कडुनिंबाच्या काढ्याने धुवावे.

हे उपाय केले असता व स्वच्छता ठेवली असता उवा लिखा गायब होतात. डोकं शांत होतं आणि अभ्यासात ही लक्ष नीट लागतं. उवांनी डोक्यात घरं केली असल्यास मात्र लवकरंच जवळच्या वैद्यांकडे जाऊन औषधं सुरू करावी.


वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य आयुर्वेदाचार्य