चला चला दिवाळी आली, फराळ खायची वेळ झाली!!

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
27th October, 04:05 am
चला चला दिवाळी आली, फराळ खायची वेळ झाली!!

छान छान रंगीत आकाश कंदील बनवले ना तुम्ही सर्वांनी???? रांगोळ्या कोणत्या काढायच्या हे सुद्धा ठरवलं असेल आणि अभ्यंग, सुगंधी उटणे लावण्याची तयारी तर नक्कीच केली असेल कारण तुम्हाला आता हे सगळं कसं करायचं व का करायचं हे माहीत झालंच आहे ना??? 

आणि तुम्ही एवढी सगळी तयारी केली आहे म्हणून तुमच्यासाठी आजीने व आईने चविष्ट फराळ सुद्धा बनवला असेल. 


दिवाळीचा फराळ हा खास असतो. या फराळात गोड, तिखट, खारट अशा विविध चवींचे पदार्थ असतात. 

 वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, नारळाची बर्फी, कोहळ्याची बर्फी, काजू कतली, फेणोऱ्या, करंज्या असे गोड पदार्थ पौष्टिक असतात. शरीराची ताकद तसेच वजन वाढवण्यासाठी ते मदत करतात. 

 तिखट - खारट पदार्थ जसे की पुरी, मेथी मटरी, चूर्मा, चकली, वेगवेगळ्या प्रकारचा चिवडा असे पदार्थ सुद्धा पौष्टिक आणि दिवाळीच्या दिवसात होणारा त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करतात. 

 या फराळातील पदार्थांमध्ये साजूक तूप वापरलं जातं जे बुद्धीवर्धक आहे. त्यामुळे असे पदार्थ खाल्ल्याने तुमची बुद्धी सुद्धा तल्लख होणार. 

 हाडं स्ट्रॉंग बनवण्यासाठी डिंक फराळातील लाडू बनवताना वापरला जातो.  

 काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, मनुका, खजूर, चारोळ्या असा सुकामेवा सुद्धा या फराळामध्ये वापरला जातो. हा सुकामेवा सुद्धा पौष्टिक व आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

विशेष म्हणजे हे सगळे पदार्थ आई, आजी अगदी प्रेमाने आपल्यासाठी बनवत असतात. हे पदार्थ बनवताना स्वच्छता राखली जाते, उत्तम प्रतीचे घटक वापरले जातात, साजूक तूप, चांगल्या प्रतीचे तेल वापरले जाते, त्यामुळे हे पदार्थ पौष्टिक तर आहेतच त्याशिवाय योग्य प्रमाणात खाल्ले असता शरीराला कोणताही त्रास होत नाही. 

याउलट आपल्याला आवडणारे बाजारातील चटपटीत पदार्थ, पॅकेट मधील चिवडा, बिस्कीट, चिप्स बनवताना चांगलं तेल वापरलं जात नाही, स्वच्छता पाळली जात नाही, त्याशिवाय या पदार्थांमध्ये केमिकल्स असलेले प्रिझर्वेटिव्हस, अनैसर्गिक रंग वापरलेले असतात जे खाल्ले असता काही दिवसांनी उलट्या होणे, जुलाब होणे, अंगाला खाज सुटणे, पोटात दुखणे, पोटात कृमी म्हणजेच जंत होणे असे वेगवेगळे आजार निर्माण होऊ शकतात. म्हणून यंदाच्या दिवाळीपासून  चिप्स व इतर चटपटीत पदार्थ, दुकानातील मिठाई, चॉकलेट्स न खाता घरी बनवलेला पौष्टिक फराळ खाऊन तर बघा. 

आई व आजीने तुमच्यासाठी प्रेमाने बनवलेला फराळ जर तुम्ही खाल्ला तर त्यांनाही आनंद वाटेल. 

तुम्हा सर्वांना हॅप्पी दिवाळी!!


वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य