रात्रीचे जेवण आणि झोप यांतील अंतर

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
24th January, 11:14 pm
रात्रीचे जेवण आणि झोप यांतील अंतर

झो​प ही सगळ्यांची आवडती गोष्ट आहे, हो ना? रात्री झोपलो की सकाळ कधी होते कळत सुद्धा नाही आणि थंडीत तर अंथरुणातून बाहेर यावेसे अजिबात वाटत नाही. झोप आवडत असली तरी टीव्ही, मोबाईलच्या नादात आपण हल्ली झोपायला उशीर करतो, त्यामुळे झोप पूर्ण होत नाही. कधी कधी जेवून लगेच झोपतो आणि मग सकाळी फ्रेश वाटत नाही. योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेतलेली झोप आरोग्यासाठी का महत्त्वाची आहे, हे याआधी आपण समजून घेतले आहे. आज रात्रीचे जेवण आणि झोप यामध्ये किती अंतर असावे व का, हे जाणून घेऊया.

​आपण सगळे रोज रात्री जेवतो आणि मग झोपतो. पण जेवण केल्यानंतर लगेच झोपणे योग्य आहे का?

याचे उत्तर 'नाही' असे आहे.

​आपल्या पोटात 'जाठराग्नी' नावाची एक शक्ती असते. ही शक्ती म्हणजेच आपली पचनशक्ती होय, जी आपण खाल्लेले अन्न पचवते. जेवण केल्यानंतर या पचनशक्तीला काम करण्यासाठी वेळ हवा असतो.

​जर आपण जेवल्यानंतर लगेच झोपलो, तर अन्न नीट पचत नाही. त्यामुळे पोट दुखणे, पोट फुगणे, ढेकर येणे, आळस येणे, सकाळी उठल्या उठल्या पोट साफ न होणे असे त्रास सुरू होऊ शकतात.

​रात्रीचे जेवण व झोप यामध्ये अंतर किती असावे?

​रात्रीचे जेवण आणि झोप यामध्ये किमान २.५ ते ३ तासांचे अंतर असावे.

हे अंतर ठेवल्यास अन्न नीट पचते आणि झोपही शांत लागते.

​त्यासाठी काय करावे?

​रात्री लवकर जेवावे.

​घरचे, साधे आणि हलके जेवण जेवावे.

​आहारात भात, पोळी किंवा भाकरी, वरण, भाजी यांचा समावेश असावा.

​जास्त तेलकट, तिखट आणि बाहेरचे म्हणजेच हॉटेलमधील पदार्थ किंवा स्ट्रीट फूड टाळावे.

​जेवणानंतर काय करावे?

​थोडा वेळ एका जागी शांत बसावे.

​एखादी गोष्ट किंवा कविता वाचावी अथवा गृहपाठ करावा.

​अर्ध्या तासानंतर शतपावली करावी.

​मोबाईल, टीव्ही आणि व्हिडिओ गेम्स टाळावेत.

​आपण खाल्लेले अन्न नीट पचले, तर आपल्या शरीराला चांगली शक्ती मिळते. शरीर ताकदवान बनले की आपली रोजची कामे, खेळ, व्यायाम आणि अभ्यास करणे सहज शक्य होते.

​रोज लक्षात ठेवा:

१. रात्री लवकर जेवा.

२. रात्रीचे जेवण व झोप यामध्ये २.५ ते ३ तासांचे अंतर ठेवा.

​चांगली झोप आणि चांगले आरोग्य मिळवा. योग्य वेळी जेवण आणि योग्य वेळी झोप या दोन गोष्टी निरोगी राहण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत.


वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य