
सकाळी उठल्यापासून शाळा, अभ्यास, क्लासेस आणि खेळ यामध्ये दिवसभर धावपळ होते ना?? अशा वेळी सकाळी आईने प्रेमाने तयार केलेला डबा हा केवळ पोट भरण्यासाठी नसून, तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा ठरतो. आई प्रेमाने व युक्तीने डब्यातील विविध पदार्थ करते त्यामुळे तुम्हाला योग्य पोषण, चविष्ट आहार आणि आईचं प्रेम या सगळ्या गोष्टी मिळतात.
आपण जसं अन्न खातो त्यानुसार आपलं मन आणि शरीर तयार होत असतं. म्हणजे आपण जे अन्न खातो, त्यावर आपली ताकद, पचनशक्ती, विचारशक्ती आणि वर्तन अवलंबून असते.
घरचं अन्न का श्रेष्ठ मानलं जातं?
आई घरच्या घरी स्वच्छ, ताजं आणि तुम्हाला योग्य असे अन्न तयार करते. पोळी, भाजी, पुलाव , उसळ, थालीपीठ, इडली, डोसा, पराठा असे पारंपारिक पदार्थ शरीराला आवश्यक ऊर्जा देतात. घरी केलेले हे पदार्थ पचनाला हलके, पोषक आणि मनाला शांत ठेवणारे असते. त्यामुळे पोट नीट काम करते, शरीराला योग्य पोषण मिळते आणि आजारांपासून संरक्षण होते.
शाळेच्या मधल्या सुट्टीत डब्यातले घरचे अन्न खाल्ल्याने आपण निरोगी राहतो. भूक नीट लागते, पोटदुखी, गॅस, अपचन यांसारखे त्रास कमी होतात आणि आपण तंदुरुस्त राहते.
डब्यातील पोषक व संतुलित अन्न मेंदूला योग्य पोषण देते. त्यामुळे आपली स्मरणशक्ती सुधारते, अभ्यासात लक्ष लागते आणि शिकण्याची आवड वाढते. शाळेत उत्साह वाटतो, थकवा कमी जाणवतो आणि आपला आत्मविश्वासही वाढतो. म्हणूनच
योग्य आहार बुद्धीविकासासाठी महत्वाचा आहे असे सांगितले जाते.
बाहेरचे पदार्थ का टाळावेत?
तुमच्यापैकी बऱ्याच जणांना चिप्स, कुरकुरे, बिस्किटे, पॅकेटमधले स्नॅक्स, समोसा आणि कोल्ड्रिंक्स यांचे आकर्षण जास्त असते. हे पदार्थ खायला चविष्ट लागले तरी त्यात जास्त मीठ, साखर, तेल आणि कृत्रिम घटक असतात. असे पदार्थ पचायला जड असतात. त्यामुळे पचनशक्तीवर ताण येतो. सर्दी, खोकला, पोटदुखी, दातांचे त्रास, लठ्ठपणा अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
आई जेव्हा आपल्यासाठी डबा भरते, तेव्हा त्यात फक्त पोळी-भाजी नसते, तर तिचे प्रेम, काळजी आणि आशीर्वाद असतात. डबा नीट खाणे म्हणजे केवळ आरोग्य जपणे नव्हे, तर आईच्या कष्टांचा सन्मान करणेही होय.
आईने दिलेला डबा रोज खाल्ल्यास शरीर मजबूत राहते, बुद्धी तीक्ष्ण होते आणि मन आनंदी राहते. बाहेरच्या सवयींपेक्षा घरच्या अन्नाला प्राधान्य दिल्यास तुम्ही निरोगी, हुशार आणि संस्कारी व्हाल.
त्यामुळे घरून डबा न्यायला लाजू नका.
आईने करून दिलेला डबा रोज आवडीने खा, आणि ताकदवान, हुशार व निरोगी बना.

- वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य