आपल्या शरीरात अनेक अवयव आहेत आणि प्रत्येक अवयवाचे आपापले काम ठरलेले आहे. आपल्या शरीरात ५ ज्ञानेंद्रिये आहेत त्यांपैकी जीभ या ज्ञानेंद्रिया बद्दल मी तुम्हाला माहिती दिली आहे. आज आपण नाक या ज्ञानेंद्रियाबद्दल जाणून घेणार आहोत.
ज्ञानेंद्रिय म्हणजे जी इंद्रिये आपल्याला वेगवेगळया गोष्टींचे ज्ञान करून देतात.
हे नाक शरीरात इतर कोणकोणती कामे करतं माहीत आहे? चला जाणून घेऊया...
श्वास आत घेण्याचे व बाहेर सोडण्याचे काम नाकावाटे होते. नाक आपल्या श्वसन संस्थेचा महत्त्वाचा भाग आहे.
तुम्ही संध्याकाळी खेळून दमून घरी येता आणि खमंग भजी तयार आहेत हे वासावरूनच समजतं, तुमचा थकवा पळून जातो. पहाटे बागेत पारिजातकांच्या फुलांचा मंद सुगंध दरवळत असतो, सकाळी धूप किंवा अगरबत्तीचा सुगंध आला की देवघरात पूजा झाली हे ही समजतं. केवळ वासामुळे आपल्याला कितीतरी गोष्टींचे ज्ञान होते.
नाक हा अवयव व घ्राणेंद्रिय आपल्याला गंधज्ञान देतं.
नाकाला दोन नाकपुड्या आहेत ना, त्यात बारीक केस असतात.
नाकामध्ये एक ओलसर, पातळ थर असतो. धूळ, पराग कण, जंतू इत्यादि या केसांमुळे नाकातच अडवले जातात. नाकाच्या आतील ओलसर त्वचेला हे कण व जंतू चिकटतात, त्यामुळे फुफ्फुसांत या कणांचा, जंतूंचा प्रवेश होऊ नाही. नाक हे फिल्टरसारखे काम करते व त्यामुळे आपली श्वसन संस्था निरोगी रहायला मदत होते.
थंडीच्या दिवसात किंवा एसीमध्ये जास्त वेळ राहिल्यास नाकाच्या आतील असणारी ओलसर त्वचा कोरडी होते, श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, धूळ किंवा पराग कण श्वसन संस्थेत जाऊन सर्दी होऊ शकते. तुम्ही जर रोज एसी रूममध्ये झोपत असाल किंवा गाडीत फिरताना नेहमी एसी चालू करत असाल, तर न चुकता सकाळी व रात्री नाकपुड्यांना आतून करंगळीने तेल लावा. तेल लावल्याने नाकातील त्वचेचा कोरडेपणा कमी होतो, श्वास घेताना त्रास होत नाही, शिंका येणे कमी होते.
नाकात सतत बोटं किंवा इतर कोणतीही गोष्ट घालू नये कारण त्यामुळे नाकाच्या त्वचेला व आतील रक्तवाहिन्यांना इजा होऊ शकते. नाकातून रक्त सुद्धा येऊ शकते आणि नाकातून होणारा रक्तस्त्राव थांबवण्यासाठी किंवा खेळताना कोणी जर नाकात एखादी छोटी वस्तू घातली तर ती बाहेर काढेपर्यंत, रक्तस्राव थांबेपर्यंत आई बाबांच्या मात्र नाकी नऊ येते.
आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचे असलेले हे नाक, त्याची योग्य काळजी घ्या आणि पहिल्या पावसात येणारा मातीचा गंध, वेगवेगळी सुवासिक फुलं, अत्तर, धूप, वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचा वास अश्या मनाला आनंद देणाऱ्या गंधांचा आनंद घ्या.
वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य