लांडगा राजा झाला लाडका राजा

Story: छान छान गोष्टी |
27th October, 04:02 am
लांडगा राजा झाला लाडका राजा

फार फार वर्षां पूर्वीची गोष्ट. धांदलपूरच्या जंगलात खाण्यापिण्याचे हाल आणि त्या जंगलात वाढत जाणाऱ्या तापमानामुळे जंगलाची शान असलेले रुबाबदार सिंह, शक्तिशाली वाघ, धिप्पाड हत्ती आणि केसाळ गुबगुबीत अस्वल या प्राण्यांनी धांदलपूर जंगल सोडून नव्या जंगलात जायचा निर्णय घेतला. 

जायच्या आधी जंगलाचा राजा सिंहाने सगळ्या प्राण्यांची सभा भरवली. माकडाने जंगलभर त्या संबंधीची दवंडी पिटली आणि ठरल्या वेळी एका संध्याकाळी सभा सुरु झाली. जंगलाचा अधिपती सिंह आणि त्यांचे सगळे भाऊबंध एका उंच आसनावर बसले. त्या खालोखाल वाघ, हत्ती आणि अस्वल आपापल्या आसनावर स्थानापन्न झाले. सिंहाने आज्ञा देताच हत्तीने प्रचंड आवाजात तुतारी वाजवली आणि सभा सुरु आली. 

कासवाला पोचायला जरा उशीर झाला, तसा हळू आवाजात कासव म्हणाला, “महाराज मला माफ करा, थोडा उशीर झाला. लांडगा दादा मला आपल्या पाठीवरून नेतो म्हणालेला, परंतु जरा चुकामुक झाली.” सभेत एकच हशा पिकला. “असुदे, असुदे. हां, प्रधान वाघ, आपण सभेचा विषय सर्वांसमोर मांडावा.” सिंहाने हुकूम सोडताच वाघ उठला. त्याने आधी माइक तपासून पहिला. माइक बरोबर आहे याची खात्री झाल्यावर वाघाने सिंहाला मुजरा केला आणि थेट मूळ मुद्द्याला हात घातला. 

“माझ्या बंधुनो आणि भगिनींनो, ही सभा बोलावण्याचे प्रयोजन हे आहे की, धांदलपूरचे हे जंगल आता पूर्वी सारखे राहिलेले नाही. इथली झाडे तोडली जात आहेत. लहान मोठ्या प्राण्यांची सर्रास शिकार केली जात आहे. इथले झरे, ओहोळ आता लवकर आटत चालले आहेत आणि खाण्याचे सुद्धा वांदे होत आहेत. बऱ्याच प्राण्यांचे भुकेने हाल होत आहेत आणि म्हणून सगळे सिंह, वाघ, हत्ती, अस्वल यांनी हे जंगल सोडून दूर सांगमपूरच्या जंगलात जायचा अधिपती सिंहानी निर्णय घेतला आहे, या पुढे हे जंगल आता तुमच्या हवाली करत आहोत. तुमचा राजा कोण होणार हे आज अधिपतींच्या साक्षीने ठरणार आहे. तरी मी अधिपतींना विनंती करतो की त्यांनी सभेला संबोधित करावे.” वाघाचे बोलणे संपताच सभेत चलबिचल आणि चुळबुळ सुरु झाली. सर्वांसाठी हा आश्चर्याचा धक्का होता. 

तेवढ्यात अधिपती सिंहानी हात उंचावला तशी सभा अगदी चिडीचूप झाली. सिंहाने सभेला आधी संबोधित केले. आजवर सहकार्य आणि विश्वास दाखवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आणि धांदालपूरचा राजा कोण होण्यास इच्छुक आहे हे विचारले. परंतु कोणीच तयारी दाखवली नाही. तसा एका कोपऱ्यात काहीतरी चघळत बसलेल्या लांडग्याने हात वर केला. सिंहाने अजून कोणी राजी नसल्यामुळे लांडग्याला धांदलपूर जंगलाचा नवा राजा म्हणून घोषित केले. 

सिंह, वाघ, हत्ती आणि अस्वल निघून गेल्यावर लांडग्याने लागलीच सभा बोलावली आणि आपले नवे नियम त्याने बनवले. त्याने सांगितले की, यापुढे कोणीही कसलीही शिकार केली तर त्या शिकरीचा अर्धा हिस्सा आपल्याला द्यावा, दर दिवशी आपल्या सेवेसाठी दहा दहा सेवेकरी असावेत. आपल्याला न सांगता जंगल सोडून कोणीही बाहेर जाऊ नये. पूर्वीच्या सिंह, वाघ, हत्ती, अस्वल यांच्याशी कसलेही संबंध ठेवू नयेत. हे आणि असे अनेक नियम. आपले राज्य कसे चालेल त्यांची झलक दाखवली. 

कडक शिस्तीच्या नावाखाली दिसेल त्याला तो वाट्टेल तशी शिक्षा करू लागला. मनाला मानेल तेव्हा आपल्या वैयक्तिक कामासाठी प्राण्यांना बोलावू लागला. कारण नसताना इतरांच्या खाजगी आयुष्यात दखल देऊ लागला. 

त्याच्या या अशा वागण्यामुळे इतर प्राणी त्रस्त झाले. इतक्या वर्षात अधिपती सिंहाने आपल्याला कधी वाईट वागणूक दिली नाही की अन्याय केला नाही असे जो तो बोलू लागला. लांडग्याला धडा शिकवायचा आणि त्याच्या जाचातून सर्व प्राण्यांना सोडवायचं असा एक विचार जंगलातल्या प्राण्यांच्या मध्ये रुजला. परंतु करायचं काय? कारण आता जंगलात लांडग्यापेक्षा शक्तिशाली आणि चतुर कोणी नव्हता. 

तरीही आपण प्रयत्न सोडायचे नाहीत असे ठरवून सगळे समविचारी प्राणी कामाला लागले. 

एक दिवस ससा धाडस करून लांडग्याला भेटायला गेला. “काय रे सशा, कामधंदा सोडून इकडे कशाला कडमडलास?” लांडग्याने घुश्शातच विचारले.

परंतु सशाने या प्रसंगाला निडरपणे सामोरे जायचे ठरवले. त्याने थोडे कचरतच बोलायला सुरुवात केली. “महाराज मी तुमचा सर्वात मोठा चाहता आहे. म्हणून पावलोपावली मी तुमचाच विचार करतो. तुम्ही कसे प्रसिद्ध व्हाल, तुम्ही कसे रुबाबदार दिसाल, सगळे प्राणी तुमचा आदर सम्मान कसा करतील याचाच विचार मी करतो. म्हणून काही सांगायला मी आलोय महाराज.” 

हे ऐकल्यावर लांडगा आनंदाने उसळलाच. म्हणाला “वा वा! ससोबा मी खुश आहे तुझ्यावर. सांग काय सांगायचंय.”

हीच संधी साधून ससा म्हणाला, “महाराज आपण एवढ्या मोठ्या जंगलाचे सर्वमान्य, सर्वप्रिय राजा. परंतु तुमचा चेहरा जो आहे त्याचं काही तरी करायला हवं. म्हणजे तुमचं दिसणं जरा सुधारलं पाहिजे. तुम्ही जरा गोंडस दिसायला पाहिजेत. बाकीचे प्राणी पण म्हणत होते की आपल्या राजाने कसं सिंहापेक्षा रुबाबदार दिसायला हवं.” 

हे ऐकल्यावर तर लांडग्याला आनंदाच्या उकळ्या फुटल्या. तो सशाच्या जाळ्यात फसत चालला होता. तो उत्सुकतेने साशाला म्हणाला, “बरोबर आहे तुझं. पण मग हे कसं करू?”

ससा म्हणाला, “असं करा, सगळ्यात आधी तुमच्या अंगावरचे हे केस कमी करा, नव्हे ते काढूनच टाका. तुमची शेपटी खाली वाकली आहे ती कुत्र्यासारखी वाकडी करून घ्या, तुमची मिशी दाढी काढून टाका. थोडक्यात काय तर तुम्ही लांडगे आहात ही तुमची ओळख आधी पुसून टाका. कारण तुम्ही लांडगे आहात म्हणून तुमच्यावर कोणी विश्वास ठेवत नाहीत.”

“अरे बापरे, असं आहे का? तू सांगितलेलं सगळं केलं, तर तुझ्यासारखा गोंडस दिसेन मी?” 

“अजिबात नाही” ससा म्हणाला.

“म्हणजे?”

“म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही गोंडस आहातच, परंतु हे सगळं केलं तर अजुन रुबाबदार दिसाल.” 

लांडगा बरोब्बर सशाच्या जाळ्यात अडकला आणि लागलीच मुंगूस न्हाव्याला बोलावून घेऊन सशाने सांगितल्याप्रमाणे केले. त्याने आरशात पाहिले तर स्वतःलाच ओळखू शकला नाही. खरंतर तो विचित्र आणि हास्यास्पद दिसत होता. तरीही मुंगूस न्हावी सुद्धा म्हणाला, “वा वा!! महाराज आपण किती रुबाबदार दिसता.” सशानेही मुंगूसाचीच री ओढली. लांडग्याला ते खरे वाटले. आपले हे रूप सगळ्या प्राण्यांना दाखवण्यासाठी त्याने जंगलातून एक फेरफटका मारून यायचे ठरवले. 

लांडगा आपल्या साथीदारासोबत निघाला. वाटेत ठिकठिकाणी वेगवेगळे प्राणी भेटायचे, परंतु ते लांडग्याला मुजरा करण्याऐवजी त्याच्यावर हसू लागले. आपला राजा वेडा झाला, आपला राजा कामातून गेला असे म्हणून त्याला हिणवू लागले. 

लांडग्याला कळून चुकले की आपल्याला मूर्ख बनवले. जनता आपल्यामुळे त्रस्त आहे, आपल्या जाचाला कंटाळली आहे आणि त्यामुळेच मोठ्या चातुर्याने सशाला पुढे करून आपल्या जनतेने आपल्यावर ही वेळ आणली. जनतेचं प्रेम आणि विश्वास जर परत मिळवायचा असेल तर आपल्याला आपली वर्तणूक आणि इतरांच्या प्रति दृष्टिकोन बदलावाच लागेल हे लांडग्याने जाणले. 

त्याने सशाला जवळ बोलावलं आणि म्हणाला, “आज तुझ्यामुळे मला माझ्या कर्तव्याची जाणीव तर झालीच शिवाय माझी चूक मला उमगली. या पुढे मी माझ्या मर्जीने नव्हे तर तुमच्या सर्वांशी चर्चा करून, विचार-विनिमय करूनच हे राज्य चालवीन.”

लांडग्या राजाचं झालेलं हे मत आणि मन परिवर्तन पाहून सर्वांनी त्याचा जयघोष केला आणि एका क्षणात लांडगा राजा सर्वांचा लाडका राजा झाला.


चंद्रशेखर गावस