आगळीवेगळी दिवाळी...!!

Story: छान छान गोष्ट |
03rd November, 12:28 am
आगळीवेगळी दिवाळी...!!

“हा फ्रेंड्स!” म्हणत निशी सायलीकडे गेली. तिच्या हातात बेसनाच्या लाडवांचा डबा होता. सगळी मुले एकेक लाडू घेऊन खाऊ लागली. निशीने मात्र लाडू बॅगमध्ये ठेवला. आठ वर्षाच्या निशीच्या घरी पप्पा निनाद, आजी सरिताबाई. निशीने लहानपणी आईला गमावल्याने निनाद आणि सरिताबाई तिला तळहातावरच्या फोडासारखं जपत. निनाद मल्टिनॅशनल कंपनीत मोठ्या हुद्द्यावर असल्याने त्यांचं राहणीमान उच्चस्तरीय होतं. सितारा टाॅवर्समध्ये राहाणारी निशी सेंट जॉर्ज इंटरनॅशनल स्कूलमध्ये जात होती. दुपारी दोन वाजता शाळेतून आल्यावर जेवण करून, अभ्यास आटपून ती घराजवळच्या चिल्ड्रन्स पार्कमध्ये आजीसोबत खेळायला जायची.

एक दिवस निशी खेळता खेळता बागेच्या कोपऱ्यात गेली. आंब्यांच्या सावलीत तिच्याच वयाचा एक मुलगा शाडू मातीपासून लहानलहान खेळणी बनवत होता. कुतूहलापोटी निशीने जवळ जाऊन पाहिलं. शाम व निशी दोस्त बनले. शामचे वडील पार्कचे केअरटेकर होते. पार्कच्या मागे छोट्या काॅटर्समध्ये शाम आईबाबांसह राहायचा. जवळच्याच सरकारी शाळेत जायचा. पार्कमध्ये येणारी मुलं उच्चभ्रू वर्गातली, इंग्रजीत बोलणारी असल्यामुळे शाम बुजायचा. 

 त्याला लहानपणापासून मातीत खेळायला आवडायचं. बाबा त्याला मूर्तीशाळेतून माती आणून देत. शाम झाडाखाली एकटाच खेळणी बनवे. सायलीने दिलेला लाडू निशीने शामसाठी ठेवला होता. थोडावेळ मैत्रिणींशी खेळल्यानंतर ती हळूच शामकडे गेली. 

“हे काय?” त्याच्या हातातल्या पणतीकडे बघत तिने विचारलं. “ही पणती. दिवाळीसाठी बनवतोय. आई दरवर्षी मी बनवलेल्या पणत्यांनी घर सजवते. काल बाबांनी बांबू आणलेत. आम्ही दोघं आकाश कंदील बनवणार.” शाम उत्साहाने सांगत होता. निशी कुतूहलाने ऐकत होती. तिच्या डोळ्यासमोर लायटिंग आणि प्लास्टिकचा आकाश कंदील आला.

“हो, माझ्या पप्पाने पण काल खूप लायटिंग्स आणल्या. फराळाचं शाॅपिंग केलं. अरे फराळावरून आठवलं...” म्हणत तिने बॅगमधून लाडू काढला. शामचे हात मातीने माखलेले असल्याने तिने लाडू भरवला. नंतर दोघांनी मिळून पणत्या बनवल्या. एकमेकांना दिवाळीला घरी येण्याचं आमंत्रण देऊन दोघं परतले. “जाऊया ना रे श्यामच्या घरी... मला बांबू स्टिक्सचा आकाश कंदील बघायचाय.” संध्याकाळी परतल्यापासून निशीने निनादच्या मागे भुणभुण लावली होती. “हो प्रिन्सेस, जाऊया हं.” म्हणत निनादने संमती दिल्यावर तिची कळी खुलली.

दिवाळीची पहाट उजाडली. निशी उत्साहाने उठली. आजीने तिला छान तयार केलं. तिच्या हट्टापायी निनाद तिला घेऊन सातलाच श्यामच्या घरी पोहचला. “माफ करा हं. हिने हट्ट केला म्हणून एवढ्या लवकर यावं लागलं.” भेटवस्तू श्यामच्या बाबांच्या हाती देत निनाद म्हणाला. “अंकल, शाम कुठे आहे?” पणत्यांची आरास, दारातली रांगोळी, झेंडूचं तोरण नि तुळशीवृंदावनापुढे फोडलेल्या कारीटाला निरखत निशीने विचारलं. मागील दारी त्याची आई त्याला उटणं लावतेय.” त्यांनी असं म्हणताच निशीने विचारलं, “पप्पा, उटणं म्हणजे काय रे?” “बाळा उटणं म्हणजे वेगवेगळ्या नॅचरल हर्ब्जनी बनलेली पावडर. ती आजच्या दिवशी तेलात मिक्स करून आंघोळीआधी अंगाला लावायची असते आणि मग आंघोळ करायची असते.” निनादने तिच्या शंकेचं निरसन केलं. शाम आंघोळ आटपून छान तयार होऊन आला. बाबांसोबत तुळशी वृंदावनापाशी गेला. गोविंदा गोविंदा म्हणत त्याने कारीट फोडलं आणि रस बोटावर घेऊन जिभेला लावला.

“निशी, शामने जे कारीट फोडलं ते नरकासुराचं म्हणजेच वाईटाचं प्रतीक आहे म्हणून ते पायाखाली चिरडलं आणि तोंडाने गोविंद म्हणजे कृष्णाचं नाव घेतलं.” निशीच्या प्रश्नाचं निनादने उत्तर दिलं. शामच्या आईने त्याला आणि निशीला ओवाळलं आणि दोघांना किराईत्याचा रस दिला. ते बघून निशीने तोंड वळवलं, तेव्हा श्यामची आई वत्सलाबाई म्हणाल्या, “बाळा, हे किराईतं आरोग्याला चांगलं असतं. आता दिवाळीचे चार पाच दिवस आपण गोडधोड, खमंग, कुरकुरीत पदार्थ खाणार. त्याने पोट बिघडू नये म्हणून दिवाळीच्या सकाळी फराळाआधी हे प्यावं. तसं फक्त दिवाळीलाच नव्हे, तर कधीही घेतलं तरी ते फायदेशीर आहे. एका हाताने नाक पकड आणि एका दमात पिऊन टाक.” म्हणत त्यांनी निशीच्या डोक्यावरून हात फिरवला. निनाद आणि शामचे बाबा गप्पा करत बसले. मुलं अंगणात खेळत होती. काॅर्टसच्या समोर वत्सलाबाईंनी फुलझाडं लावली होती. निशी छान रमली होती. तेवढ्यात वत्सलाबाईंची हाक आल्यावर दोघे आत आले.

वत्सलाताईंनी सगळ्यांची फराळाची ताटं छान सजवली होती. त्यात निशीकडून आलेले जिन्नस आणि मिठाई होती. त्यांनी बनवलेले दुधपोहे, गुळपोहे, तिखट पोहे, शामला आवडणारे चुरमुऱ्याचे लाडू, चिवडा होता. सर्वांनी मिळून फराळ केला आणि निशी निनाद जायला निघाले. “निशीला हे सगळं अनुभवायला मिळावं म्हणून मी प्रयत्न केला पण सफल झालो नाही. माझ्या आईचं आता वय झालंय त्यामुळे तिला झेपत नाही आणि निशीची आईही नाही म्हणून मग बाहेर, विकत आणलेल्या पदार्थांनी सण साजरे होतात आमच्याकडे. पण तुमच्यामुळे माझ्या निशीला माझ्या लहानपणीची पारंपरिक पद्धतीची दिवाळी अनुभवता आली. त्यासाठी तुमचे मनापासून आभार.” निनाद म्हणाला. निनादने निशीकडे पाहिलं या आगळ्यावेगळ्या दिवाळीमुळे निशी खूप खूश होती.


मंजिरी वाटवे, पर्वरी