गणेश चतुर्थीला मखरात विराजमान गणूला (गणपती बाप्पाला) पाहून चिनूला खूप आनंद झाला. आपल्या हाताने बनवलेल्या त्याच्या लाडक्या गणूची सुबक मूर्ती पाहून तो खूप सुखावला होता. चिनूला शाळेत गणेश चतुर्थीची सुट्टी सुरू होण्याआधी शाळेत त्याच्या बाईंनी त्यांना वर्गात श्री गणेश या आराध्य दैवतेबद्दल खूप महत्त्वाची माहिती सांगितली होती. “गणपती हे निसर्गाचे दैवत आहे. श्री गणेशाला निसर्ग खूप आवडतो. निसर्गाचा समतोल राखून पर्यावरण सांभाळण्यासाठी आपण श्री गणेश चतुर्थीला ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ची मूर्ती न पुजता, शुद्ध शाडूची म्हणजेच चिकण मातीची गणेश मूर्ती पुजली पाहिजे.” असेही बाईंनी त्यांना सांगितले होते.
खास गणेश चतुर्थी निमित्त चिनूच्या शाळेत मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेतली होते. या कार्यशाळेत तज्ञ, नामवंत मूर्तिकारांनी मुलांना मातीपासून मूर्ती कशा साकारता येतील ते शिकवले होते. चिनूनेही या कार्यशाळेत आवडीने भाग घेऊन मूर्ती कला शिकून घेतली होती. चिनूने बनवलेल्या बालगणेशाच्या मूर्तीला बक्षीसही प्राप्त झाले होते. ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ हे पर्यावरणाला घातक आहे. ते पाण्यात व्यवस्थित मिसळत नाही. त्यामुळे यावर्षीच नव्हे, तर दर वर्षी गणेश चतुर्थीला शाडूच्या म्हणजेच चिकण मातीच्या गणेश मूर्तीचे पूजन करायचे असा निश्चय चिनूच्या शाळेतील बालगोपाळांनी केला होता.
यावर्षी गणेश चतुर्थीसाठी चिनूने बाबांच्या ओळखीच्या चित्रशाळेत जाऊन शाडूची माती विकत आणून त्यापासून गणेश मूर्ती तयार केली होती व चिनूच्या घरात त्याच गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती. चिनूच्या आई-बाबांनी अगदी आनंदाने, उत्साहाने चिनूला गणेश मूर्ती बनवायला मदत केली. गणेश चतुर्थीला चिनूचे घर काका, काकू, चिनूची चुलत भावंडे यांनी गजबजून गेले होते. गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यावर आरत्या, महाप्रसाद झाला. चिनूची भावंडे खेळण्यात दंग होती. चिनू खूप आनंदात होता. संध्याकाळ होत आली तसा चिनू आपल्या मामांची तसेच वर्गमित्रांची वाट पाहू लागला. चिनूच्या आईने ‘खमंग गोडाचा शिरा’ बनवला होता शिवाय तिने गणेश चतुर्थीसाठी खास फराळाचे म्हणजे करंजी, मोदक, लाडू, चकली, शंकरपाळी, अनारसे यासारखे पदार्थही बनवले होते. मामाला खास फोन करून चिनूने ‘फटाके आणू नका’ असे सुचवले होते. त्याच्या मित्रांनी मिळून गणेश चतुर्थीला फटाके फोडायचे नाही असा दृढ निश्चय केला होता. चिनूच्या शाळेत त्याच्या बाईंनी त्याला फटाक्यांचे दुष्परिणाम सांगितले होते.
फटाक्यांच्या दुष्परिणामांचा प्रत्यक्ष अनुभव चिनूने त्याच्या शेजारच्या भैय्याच्या लग्नाच्या वेळी घेतला होता. भैय्याच्या लग्न समारंभात फोडलेल्या फटाक्यांच्या आवाजाने चिनूचे मोती, सिनी (कुत्री) दोघीही काही न खाता पिता संपूर्ण एक दिवस फटाक्याच्या आवाजाला घाबरून घराच्या मागच्या न्हाणीघरात लपून बसली होती. चिनूला हे पाहून फार वाईट वाटले व त्यांने फटाके न फोडण्याचा निश्चय केला. चिनूच्या मामाने येताना गोड गोड मिठाई व गोष्टीची पुस्तके आणली होती. चिनू आपल्या मित्रांसोबत खूप खेळला. त्यांनी सगळ्यांनी मिळून गोष्टीची पुस्तकेही वाचली. संध्याकाळी त्याच्या बालगोपाळ मित्रांना घरी परतताना चिनूच्या आईने त्यांना खाऊचे पुडे दिले.
गणेश चतुर्थीचे दोन दिवस अगदी आनंदात कसे सरले ते चिनूला कळलेच नाही. म्हणता म्हणता गणेश विसर्जनाची वेळ आली. गणपती बाप्पाला तळीत विसर्जन करायला नेताना चिनूला रडू यायला लागले. त्यावेळी चिनूच्या आईने चिनूला खूप समजावले. ती म्हणाली, “बाळा गणपती बाप्पा आता आपल्या घरी त्याच्या मम्मी-पप्पांकडे जातोय. त्याची मम्मी पप्पा त्याची वाट पाहत असणार. तुझ्या लाडक्या गणूला अगदी हसत हसत टाटा बाय करीत निरोप दे हं” चिनू फार समजूतदार मुलगा असल्याने त्यांने हसत-हसत गणूला निरोप दिला. गणपती विसर्जन करून सगळी घरी परतली.
घरी आल्यावर गणूचे रिकामे मखर पाहून चिनूला खूप वाईट वाटले. तो मखरासमोर हात जोडून म्हणाला, “गणू तू सांभाळून, सावकाश तुझ्या मम्मी-पप्पाकडे जा हं आणि पुढच्या वर्षी लवकर ये गणू. तोवर मी तुझी वाट पाहीन.”
शर्मिला प्रभू
फातोर्डा, मडगाव
९४२०५९६५३९