शंतनू नायडू हा व याचा चमू ज्येष्ठांची करत असलेली सेवा बालगोपाळांच्या कानावर पडत होती. आपणही असंच काहीतरी चांगलं काम करायचं असं त्यांनी ठरवलं. बालचमूतला कार्तिक तर दोन तास घरी गेलाच नाही. आई शोधून शोधून बेजार. कुणीतरी त्याच्या कानाला पकडून त्याच्या आईसमोर केला हजर.
“अरे सुंभा, होतास कुठे तू इतका वेळ?”
“आई मी परळकर आजींच्या बगिच्यात होतो.”
“तिथे का तडमडत होतास?”
“बाग जरा साफसूफ केली. रोपांना पाणी घातलं; म्हंटलं तेवढंच परळकर आजीचं काम हलकं होईल.”
इतक्यात परळकर आजी हजर, “बागेत मला न विचारता पाणी का घालत होतास कार्तिक! तो पाईप तसाच सुरू ठेवलान. बागेचा हौद करून ठेवला हो. नवीकोरी रोपं सकाळीच माळ्याकडनं आणून, लावून घेतली होती. अशी तरंगताहेत... माणसं तळ्यात पोहतात तशी.”
परळकर आजी कार्तिकच्या नावाने बोटं मोडत गेल्या. तिकडे शर्विल आपल्या आजोबांचा झब्बा न लेंगा इस्त्री करायला घेऊन बसला, “कसले चुरगळलेले झब्बे घालतात आजोबा. ते काही नाही, अशी झक्क इस्त्री करून देतो.”
तो इस्त्री करताना इस्त्रीतनं जोराचा आवाज झाला, आजी तितक्यात आली म्हणून बरं, तिने लाकडी छडीने शर्विलला बाजूला ढकलला.
मग मात्र असं ठरलं की आधी विचारायचं की तुम्हाला काही मदत हवी आहे का? मदत हवी असेल आणि ती आपल्या करण्यालायक असेल तरच त्यात पडायचं.
साठेआजी सांधेदुखीमुळे बाहेर जाऊ शकत नव्हत्या. त्यांना विचारलं की त्या कागदावर अर्धा लीटर दूध,कॉफीची पाकीटं, नारळ शेंडीवाला, कोथिंबीरची हिरवीगार जुडी, पोपटी मिरच्या, कोंब न आलेले अर्धा किलो बटाटे, कोवळी भेंडी अशी यादी लिहून देऊ लागल्या. यातून झालं कायकी आजींची मदत व्हायचीच शिवाय सामान आणून देणाऱ्या मुलाला पैशांची देवाणघेवाण, बाजार कसा करायचा याचं ज्ञान होऊ लागलं. मुलं अभ्यासात हुशार होतीच, व्यवहारातही हुशार होऊ लागली.
तांबे आजोबांचे इस्त्रीचे कपडे नीट एका हातावर घेऊन आणून देणं, किर आजींना नाक्यावरच्या देवळात घेऊन जाणं, सबनीस आजोबांसाठी आठवड्यातनं दोनदा वाचनालयात जाऊन पुस्तकं बदलून आणू लागले... त्या वाचनालयात अवघ्या पाच रुपये मासिक वर्गणीत छोट्यांची पुस्तकं वाचायला मिळतात हे कळलं नि अकबरबिरबल, ठकसेन, तेनालीरमण, पंचतंत्र,अशी अनेक पुस्तकं मुलं वाचू लागली.
वेळ काढून एकट्यादुकट्या आजीआजोबांकडे गप्पांना जाऊ लागली. सामंत आजी कानातली कुडी घालत असताना तिच्या बोटांतून सुटलेलं मळसूत्र जान्हवीने शोधून दिलं म्हणून सामंत आजीने बच्चेकंपनीकरता पावभाजी बनवली, समवयस्क आजीआजोबांनाही बोलावलं तेंव्हा देशमाने आजोबांनी आगाऊ सूचना दिली की पार्टीला जाताना प्रत्येकाने आपल्याकडची थाळी, वाडगा, ग्लास घेऊन जायचं म्हणजे आजींना प्लास्टीकचे कप,प्लेट्स आणावे लागणार नाहीत नि प्लास्टीककचरा टाळता येईल... ही सूचना मुलांना पटलीदेखील.
घरी जाताना प्रत्येकाने आपापली भांडी नळाला विसळून घेतली. आपलं घर स्वच्छ ठेवतो तसा आपला परिसर स्वच्छ रहावा म्हणून कचरा इथेतिथे टाकू नये हे देशमाने आजोबांनी मुलांच्या अंगवळणी पाडलं इतकं की सहलीवरनं येताना टिनूची आई तिथेच रस्त्याकडेला पाण्याच्या रिकाम्या बाटल्या टाकू पहात होती तर टिनूने तिला तसं करू दिलं नाही. आपले रस्ते, बागा आपणच स्वच्छ ठेवायच्या टिनूने आईला निक्षून सांगितलं.
अशाप्रकारे निस्वार्थ मनाने ज्येष्ठांची सेवा करताकरता मुलं ज्येष्ठांकडून बरंच काही शिकत होती जे त्यांना भविष्यात खचितच उपयोगी पडणार होतं.
- गीता गरुड