समुद्र आणि मासे

Story: छान छान गोष्ट |
17th November, 03:47 am
समुद्र आणि मासे

निळा समुद्र, निळं आकाश आणि निळसर पाणी पाहायला खूप सुंदर दिसतं. अशाच एका निळसर समुद्रात खूप मासे राहत होते. बांगडे, इसवण, पापलेट, वेर्ले, तारले, पेडवे आणि खेकडे सुद्धा...

पण एकदा मात्र समुद्राच्या पोटातील वाढत्या कचऱ्याला कंटाळून सगळ्या माशांनी बैठक बोलावली. सगळ्यांचं म्हणणं एकच होतं, समुद्रात राहणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. समुद्रातून बाहेर निघून कुठेतरी स्वच्छ आणि शांत अशा ठिकाणी राहायला जायला सगळ्यांनाच आवडलं असतं.

इटुकला बांगडा टुणकण उडी मारून म्हणाला, “समुद्रात माणसं नको तितका कचरा टाकतात. पाण्याच्या प्लास्टिक बॉटल्स व पिशव्या, देवाला वाहिलेली फुले (निर्माल्य), सांडपाणी आणि नको असलेले इतर सामान सुद्धा.”

पिटुकली सुंगटे म्हणू लागली, “आमचं कोण बरं ऐकून घेतोय? आणि सांगणार तरी कोणाला?”

कडक खेकडे म्हणू लागले, “कारखान्यातील घाण पाणी सुद्धा समुद्राच्याच पोटात आणि समुद्रीत पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या पेयजलाच्या रिकाम्या बाटल्या पण इथंच!”

गोरे गोमटे वेर्ले, पापलेट व त्याचबरोबर पेडवे, तारले कुजबुजू लागले. “हल्ली झोपताना डोळ्याला डोळा सुद्धा लागत नाही आमचा. समुद्रकिनारी चालणाऱ्या माणसांचा गोंगाट, त्याशिवाय समुद्रातली भली मोठी तेल व खनिज वाहतूक व माणसांना घेऊन जाणारी भली मोठी जहाजं, पर्यटनासाठी खोल समुद्रात येणाऱ्या, मोठमोठ्याने डिजे संगीत लावणाऱ्या होड्यांची येजा चालूच राहते व त्यांच्या मोटार इंजिनातून सतत बाहेर फेकणाऱ्या तेल तवंगाचे थर अशा गोष्टींमुळे आराम म्हणून नाही कसला. मोठमोठ्या गोंगाटाने आमचं डोकं सुद्धा दुखतंय हल्ली.”

एवढ्यात बाजूला राहून ऐकणारे समुद्री कासव म्हणाले, “या सगळ्याचा परिणाम म्हणजे समुद्री शेवाळे, जे आमचे मुख्य खाद्य आहे त्यांची उत्पादकता कमी होत चालली आहे.”

बलशाली इस्वण आपल्या कणखर शब्दात सांगू लागला की, “आताच्या नवीन कोळी पिढीला आपल्या मासे संपत्ती विषयी आपलेपणच राहिलेले दिसत नाही. तुटलेल्या व फाटलेल्या जाळ्यांचे तुकडे मासेमारी झाल्यावर समुद्रातच टाकून जात असल्याने त्यात कितीतरी पटीने मासे व इतर समुद्री जीव अडकले जातात व त्यांना आपल्या जीवाला मुकावे लागते. त्याचप्रमाणे आमच्यासारख्या मोठ्या जीवांना स्वच्छंद व मनमोकळेपणाने त्या तुटलेल्या जाळ्यात अडकण्याच्या भीतीने सैर व विहार करता येत नाही.”

सगळेच मासे वैतागून गेले. माशांच्या बैठकीत सगळ्यांनी आपले मत मांडले. सगळ्या माशांची मते जवळपास एकच होती, की समुद्रात राहणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय.

त्याचवेळी भला मोठा मासा सगळ्या छोट्या व लहान माशांना म्हणू लागला, “तुम्ही घाबरू नका, मी यावर काहीतरी उपाय करतो. तोपर्यंत तुम्ही माझ्या पोटात थोडे दिवस राहू शकता.” असे म्हणून त्याच्या बरोबरच्या सगळ्या मोठ्या माशांनी आपले भले मोठे जबडे उघडले. त्यांचे ते उघडे तोंड बघताच लहान मासे सावध झाले आणि त्यांनी त्यांची खेळी ताडली. सगळे लहान मासे बघता बघता दिसेनासे झाले. मोठ्या माशांचा डाव त्यांनी हाणून पाडला.

जाता जाता लहान माशांना शाळकरी मुले, विद्यार्थी समुद्रकिनाऱ्यावर प्लास्टिक कचरा स्वच्छ करताना दिसले आणि लहान मासे गालातल्या गालात हसू लागले व त्यांनी ईश्वराकडे प्रार्थना केली की, “देवा या नवीन माणसाच्या पिढीला सर्व समुद्रकिनारे, पाणी, नद्या व शेजारील परिसर असाच स्वच्छ, सुंदर, हिरवागार व प्रदूषण मुक्त ठेवण्याची चांगली सुबुद्धी दे. जेणेकरून आमचं जगणं सोपं होईल, आमचं अस्तित्व टिकून राहील. व आमच्या पुढच्या पिढीचे अस्तित्वही पुढील येणाऱ्या काळात अबाधित राहील.” एवढी प्रार्थना करून किनाऱ्या शेजारी पोहोचलेले लहान मासे टुणुक टुण करून समुद्राच्या लाटांवर उड्या मारीत खोल पाण्याकडे वळले.

- शितल नंदकुमार परब