सुव्रत... सातेक वर्षांचा घारेल्या डोळ्यांचा, निमगोऱ्या वर्णाचा मुलगा. अगदी सशक्त असा मुलगा. सुव्रतचे आईबाबा कामावर जात असले तरी सुव्रतला घरी सांभाळण्यासाठी त्यांनी गावच्या पमामावशीला आणून ठेवली होती. पमामावशीचं बिचारीचं घरचं कुणी नव्हतं. पमामावशी सुव्रतच्या घरी रहायला लागल्यापासनं सुव्रतच्या आईवडिलांना सुव्रतला शाळेतनं आल्यावर कुठे ठेवायचं वगैरे चिंता नव्हती.
झालं काय, सुव्रतच्या आईला मिळाली बढती. नवीन गावी तिची बदली झाली. सुव्रतच्या वडिलांनी वरिष्ठांना विनंती करून आपलीही त्या गावी बदली करून घेतली. पमामावशी, सुव्रत व त्याचे आईबाबा नवीन गावी रहायला गेले. तिथे भाड्याच्या घरात राहू लागले.
शेजारच्या सदूकाकाच्या सल्ल्यानुसार सुव्रतचे आईबाबा त्याला नवजीवन शाळेत घेऊन गेले. मुख्याध्यापकांनी विचारलेल्या प्रश्नांची सुव्रतने अचूक उत्तरे दिली. सुव्रतचा नवजीवन शाळेत प्रवेश निश्चित झाला. दुसऱ्या दिवशी, ठरवलेल्या रिक्षातून सुव्रत शाळेत पोहोचला. मुख्याध्यापकांनी त्याची इतर मुलांना ओळख करून दिली. त्याच्या गुणवत्तेचे कौतुक केले. सुव्रतच्या वर्गात दिनकर नावाचा हुशार विद्यार्थी होता जो दरवर्षी वर्गात पहिला यायचा. सदैव त्याचंच कौतुक होत असल्याने मुख्याध्यापकांनी सुव्रतचं केलेलं कौतुक त्याच्या पचनी पडलं नाही.
सुव्रत दिसायला तर छानच होता, पण त्याचं नाक त्याच्या चेहऱ्याच्या मानाने जरा जास्तच जाडगेलं होतं. “ए हा बघा धबाड्या नाकाचा. जसं काय याचं नाक म्हणजे पीठाचा गोळाच!” हे ऐकून इतर मुलंही तोंडावर हात धरून हसू लागली. सुव्रतला मात्र फार वाईट वाटलं, तरी तो गप्प राहिला.
बाई वर्गात शिकवत असताना दिनकरने खडूने बाकावर सुव्रतचा चेहरा रेखाटला नि त्यावर टोमॅटोसारखं नाक काढलं तसं मागची मुलं फीसफीस करून हसू लागली. सुव्रत बाईंना नाव सांगायला उभा राहिला. त्याने दिनकरची तक्रार केली. बाई बाकावरचं चित्र पहायला आल्या, तर बाक अगदी चकाचक. “कुठे आहे चित्र?” म्हणत बाईंनी सुव्रतच्या पाठीत धपाटा दिला नि त्या पुन्हा शिकवू लागल्या.
“पमामावशी, मी नाही जायचा उद्यापासनं शाळेत.” दप्तर भिरकावून देत सुव्रत म्हणाला. “का रे सुर्व्या, आमचा सुर्व्या तर त्या आकाशातल्या सुर्व्यासारखा आहे. तो सुर्व्या बघ कसा रोज उगवतो. तो उगवतो म्हणून तर सकाळ होते, सकाळ होते म्हणून आपण झोपेतनं उठतो, कामाला लागतो. झाडं आपलं अन्न बनवतात, पाखरं अन्न शोधण्यासाठी दूरवर उडून जातात. सुर्व्या उगवलाच नाही तर कसं होईल बरं!”
“पमामावशी, त्या सुर्व्याचा नि या सुव्रतचा काडीमात्रही संबंध नाही. मी शाळेत गेलो नाही म्हणून कुणाचं काही बिघडणार नाही.”
“अरे मग करणार काय घरात बसून तू?”
“पमामावशी, आपण जाऊ पूर्वी रहायचो त्या गावी. मला या शाळेतली मुलं नाही आवडत. ती हसतात मला.”
“हसतात..ते आणि कशावरनं?”
“नाक गं, माझं थोडं जास्तच जाड आहे नं?”
“सुर्व्या तुला गोष्ट सांगते. एक होता सात शेपट्यांचा गिड्डू उंदीर. आईनं त्याला शाळेत घातलं. शाळेत गेला तर मुलं चिडवू लागली. सात शेपट्यांचा गिड्डू उंदीर. तो बिचारा रडतरडत घरी आला. आईला म्हणाला... आई माझी एक शेपटी कापून टाक. झालं, आईने कात्रीने त्याची एक शेपटी कापली. गिड्डू मारे टुणटुण उड्या मारत शाळेत गेला. पुन्हा तेच... सहा शेपट्यांचा उंदीर करत उंदरांनी कल्ला केला. उंदरांचं गिड्डूला चिडवणं नि त्याची एकेक शेपूट गळून पडणं. शेवटी एक शेपूट होती तरी मुलांनी चिडवलंच. बघा रे बघा, एका शेपटीचा उंदीर! हे म्हणजे आपण हसे दुसऱ्याला नं शेंबूड आपल्या नाकाला...त्यांनाही एकेक शेपूट होतीच की! पण हा गिड्डू आला परत मुसमुसत. एकुलती एक शेपूट आई नको म्हणत असताना घेतलीन कापून. गेला शाळेत. उंदरांनी वर्ग डोक्यावर घेतला... कल्ला केला... बिनशेपटीचा उंदीर... बिनशेपटीचा उंदीर!!! सांग बघू यातून काय कळलं तुला?”
“हो पमामावशी, कळलं मला. लोकांचं बोलणं मनावर नाही घ्यायचं. आपण आपलं काम करत रहायचं.”
पमामावशीने तिच्या सुर्व्याचा गालगुच्चा घेतला व त्याला गुलाबी पेरु तिखटमीठ लावून खायला दिला.
दुसऱ्या दिवशी, सुव्रत न कुरकुरता शाळेत गेला. त्या दिनकरने आज फळ्यावर सुव्रतचं चित्र काढलेलं व हे भलंमोठं नाक दाखवलेलं. सुव्रत म्हणाला, “छान काढलंस हो चित्र.” यावर दिनकर म्हणाला, “ए फदाड्या नाकाचा.” दिनकरला वाटलं, सुव्रत रडेल पण सुव्रत म्हणाला, “माझं नाक कसं का असेना, देवाने दिलंय ते मला. याच फदाड्या नाकाने मी तुमच्यासारखाच श्वास घेऊ शकतो. फुलांचा वास घेऊ शकतो.” सुव्रतच्या या उत्तराने दिनकर गोंधळून गेला. तेवढ्यात वर्गात दिघेबाई आल्या. त्यांनी फळ्यावरचं चित्र पाहिलं. दिनकरच्या या खोडीबद्दल बाईंनी दिनकरला सुव्रतची माफी मागायला लावली.
गीता गरुड