आयआयटी रुरकीमधून शिक्षण घेतलेल्या भोपाळच्या संजीव कुमारने आपल्या 'स्वायत्त' स्टार्टअपच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ड्रायव्हरशिवाय धावू शकणारी कार डिझाइन केली आहे.
भोपाळ:सध्या जगात व त्या अनुषंगाने देशात 'हँडस्फ्री आणि मॅनफ्री' युग अवतरले आहे. रोबोट्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचाच पुरावा म्हणावा लागेल. या रोबोट आणि एआयच्या मदतीने लोक अनेक गोष्टीत आपला हात आजमावत आहेत. तंत्रज्ञान व नविन्याची कास धरून वेगळी वाटेवर चालणाऱ्या भोपाळ येथील एका अवली अभियंत्याची व त्याच्या लवली अविष्काराची ही कथा. भोपाळ येथे सध्या एका ड्रायव्हरलेस वंडरकारचीच चर्चा आहे. अनेक दिवसांपासून शहरात धावणारी ही चालकविरहित बोलेरो पाहून प्रत्येकजण तोंडात बोटे घालतोय. ही कार आहे की चमत्कार ? असाच काहीसा प्रश्न सर्वांना पडला आहे.
भोपाळमधील एका स्वायत्त रोबोट्स नावाच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित स्टार्टअपने ही अनोखी यंत्रणा तयार केली आहे आणि या प्रणालीला कारमध्ये जोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे भोपाळच्या रस्त्यांवर आतापर्यंत या चालक विरहित गाडीने अंदाजे ५० हजार किलोमीटरचे अंतर टेस्ट ड्राइव्ह करत कापले आहे.
ही यंत्रणा निर्माण करणाऱ्या 'स्वायत्त रोबोट्स'च्या टीमने या यंत्रणेबाबत माहिती देणारा व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. कारमध्ये ही यंत्रणा बसवताच गाडी चालकाशिवाय धावण्यास सज्ज होते. ही यंत्रणा सुरू होऊन स्थापित होताच, कार सेल्फ सेन्सिंग सिस्टमने धावते, म्हणजेच ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या व्यक्तीला स्टीयरिंग किंवा गीअर शिफ्टवर नियंत्रण ठेवावे लागत नाही, सर्व काही स्वयंचलित बनते, असे 'स्वायत्त रोबोट्स'चे संस्थापक, संजीव शर्मा म्हणाले. दरम्यान, त्यांचे काम कार बनवणे नाही. विदेशात स्वयंचलित प्रणालीवर चालणाऱ्या अनेक गाड्या आहेत. भारतातील जनतेला देखील या गाड्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा प्रयत्न त्यांनी केला आहे असे संजीव शर्मा म्हणाले.
दरम्यान गेल्या एप्रिलमध्ये संजीव यांच्या ड्रायव्हरलेस बोलेरोवर महिंद्रा अँड महिंद्राचे आनंद महिंद्रा यांची नजर पडली.
सदर सिस्टम एका अल्गोरिदमवर आधारित आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा भरपूर वापर करण्यात आला आहे. वाहनात बसवलेले सेन्सर आणि कॅमेऱ्यांच्या सहाय्याने गोळा केलेल्या डेटाच्या माध्यमातून ही यंत्रणा कार्य करते. गाडी चालवताना बऱ्याचदा अपघात होण्याचा धोका असतो. पण स्वायत्त रोबोटिक्सच्या या यंत्रणेद्वारे संभाव्य अपघात ८५ टक्क्यांच्या अचूकतेने टाळता येतात. यामध्ये, वाहनावर बसवलेले सेन्सर आणि कॅमेऱ्यांच्या मदतीने वाहन स्वतःचा वेग वाढवण्यापासून ते ब्रेक लावण्यापर्यंतचे निर्णय स्वतः घेते. याशिवाय गाडीला एका खास कॉम्प्युटरशी जोडण्यात आले आहे. याच माध्यमातून गाडीचे तापमान तसेच इतर सर्वकाही ऑपरेट केले जाते.
२००९ साली आयआयटी रूरकीत शिकत असताना संजीवने एआय- आधारित स्वयंचलित कार बनवण्याचे स्वप्न पाहीले. पुढे यावरच त्यांनी काम केले. आयआयटी रुरकी आणि कॅनडात शिकलेले स्वायत्त रोबोट्सचे सीईओ संजीव शर्मा २०१५ पासून सतत संशोधनात व्यस्त आहे. दरम्यान, २०१६ साली कॅनडातील भरपगारी नोकरीला रामराम म्हणत त्यांनी आपले गाव गाठले. येथे आपली टीम बनवली. कल्पना सत्यात उतरली. यंत्रणा आकारास आली. दरम्यान यात सातत्याने प्रगती होत आहे.
आतापर्यंत संजीव व त्यांच्या टीमने तब्बल ३६ देशांत या यंत्रणेचे डेमो दिले आहेत. हा संशोधन प्रकल्प पुढे नेण्यासाठी, संजीव शर्मा यांना २०२१ मध्ये अमेरिकास्थित सिलिकॉन व्हॅलीकडून सुमारे २२ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. सध्या त्यांच्या कंपनीचे बाजारमूल्य सुमारे ५६३ कोटी रुपये आहे. याच्या आधारे ते व त्यांची टीम नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात गुंतले आहेत.