एका मुस्लिम व्यावसायिकाच्या फेसबुक पोस्टमुळे वाद सुरू झाला.
चितगाव : बांगलादेशातील चितगावमध्ये कट्टरपंथी इस्लामिक संघटना हेफाजत-ए-इस्लामने शुक्रवारचे नमाज पार पडल्यानंतर इस्कॉनविरोधात रॅली काढली. यामध्ये इस्कॉनच्या भाविकांना पकडून ठार मारण्याच्या घोषणा देण्यात आल्या. इस्कॉनवर बंदी न घातल्यास आंदोलन करू, असे आंदोलकांनी सांगितले. हजारी लेन परिसरात ५ नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेत सहभागी असलेल्यांना अटक करून त्यांना शिक्षा करण्याची मागणी त्यांनी केली.
समोर आलेल्या माहितीनुसार, उस्मान अली या मुस्लिम व्यावसायिकाने फेसबुकवर इस्कॉनला दहशतवादी संघटना म्हटले होते. त्यामुळे हिंदू संतप्त झाले. त्यांनी ५ नोव्हेंबर रोजी चितगावमधील हजारी लेन भागात उस्मानच्या दुकानासमोर निदर्शने केली. यावेळी लष्कराने आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यामुळे हिंदू आणखी संतप्त झाले. यामध्ये १२ पोलीस आणि अनेक हिंदू जखमी झाले. वृत्तानुसार, यानंतर रात्री अचानक पोलीस आणि लष्कर हजारी लेनमध्ये पोहोचले आणि त्यांनी स्थानिक हिंदूंना मारहाण केली. हजारी गली परिसरात सुमारे २५ हजार लोक राहतात व यात ९० टक्के हिंदू आहेत. त्याचवेळी हजारी लेन घटनेत त्यांचा कोणताही सहभाग नसल्याचा दावा इस्कॉनने केला आहे. त्यांनी आपल्या भाविकांच्या सुरक्षेची मागणीही केली आहे.
बांगलादेशी हिंदूंच्या संरक्षणाची मागणी भारतातही करण्यात आली आहे. बांगलादेशात हिंदूंवर सातत्याने हल्ले होत आहेत, काही दिवसांपूर्वीच इस्कॉन संघटनेचे सचिव चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी उर्फ चंदन कुमार धर यांच्यावर ३ महिन्यांत २५० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले होते. चितगावच्या न्यू मार्केटमधील आझादी स्तंभावर राष्ट्रध्वजाच्या वर भगवा ध्वज फडकवल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या ध्वजावर 'सनातनी' असे लिहिले होते. बांगलादेशात ५ ऑगस्ट रोजी शेख हसीना सरकार पडले. तेव्हापासून, अल्पसंख्याक हिंदू समुदायावरील हल्ल्यांच्या २५० हून अधिक प्रकरणांची नोंद झाली आहे.