हेल्थ स्टार रेटिंग सिस्टम अंतर्गत, यूएस-आधारित ATNI निर्देशांकानुसार, उत्पादनांना एकूण ५ गुण दिले जातात. ५ पैकी ५ गुण मिळवणारे पदार्थ आरोग्यास परिपूर्ण ठरतात, तर ३.५वरील गुण आरोग्यदायी श्रेणीत येतात.
नवी दिल्ली: पेप्सिको, युनिलिव्हर आणि डॅनोन सारख्या जागतिक पॅकेज्ड फूड कंपन्या भारत तसेच कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कमी आरोग्यदायी उत्पादने विकत असल्याचा आरोप ग्लोबल पब्लिक नॉन-प्रॉफिट फाऊंडेशन ऍक्सेस टू न्यूट्रिशन इनिशिएटिव्ह (एटीएनआय) च्या नवीन निर्देशांक अहवालात करण्यात आला आहे.
एटीएनआय ग्लोबल इंडेक्सच्या अहवालानुसार, या कंपन्या कमी-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आपल्या उत्पादनांची विक्री करतात. यांची हेल्थ स्टार रेटिंग उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या उत्पादनांपेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहे. अहवालानुसार इथिओपिया, घाना, भारत, केनिया, नायजेरिया, पाकिस्तान, फिलीपिन्स, टांझानिया आणि व्हिएतनाम हे कमी आणि निम्न-मध्यम उत्पन्न असलेले देश आहेत.
चांगली उत्पादने फक्त युरोपमध्ये विकली जात आहेत
अहवालानुसार, लेज चिप्स आणि ट्रॉपिकाना ज्यूस विकणाऱ्या PepsiCo ने त्यांच्या "Nutri-Score A/B" उत्पादनांची विक्री वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे, परंतु हे लक्ष्य केवळ युरोपियन युनियनच्या स्नॅक्स पोर्टफोलिओपुरते मर्यादित आहे, युनिलिव्हरच्या खाद्य उत्पादनांमध्ये क्वालिटी वॉल्स, मॅग्नम आइस्क्रीम, नॉर सूप्स आणि तयार-कुक मिक्स यांचा समावेश आहे. डॅनोन भारतात प्रोटिनेक्स सप्लिमेंट्स आणि ऍप्टामिल इन्फंट फॉर्म्युला विकते.
एटीएनआय या स्वयंसेवी संस्थेने आपला अहवाल तयार करण्यासाठी अशा ३० कंपन्यांच्या उत्पादनांचा अनेक स्तरांवर अभ्यास केला . यातूनच समोर आलेल्या नोंदीनुसार, हेल्थ स्टार रेटिंग सिस्टम अंतर्गत विकसित आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये मोठी तफावत आढळून आली आहे. ही स्टार रेटिंग प्रणाली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये विकसित करण्यात आली आहे. एटीएनआय निर्देशांकाने कमी आणि उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये केलेल्या अभ्यासावर अहवाल सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतात कार्यरत असलेल्या प्रमुख कंपन्यांमध्ये पेप्सिको, डॅनोन आणि युनिलिव्हर यांचा समावेश आहे.
कोणाला किती रेटिंग मिळाले?
हेल्थ स्टार रेटिंग सिस्टम अंतर्गत, यूएस-आधारित एटीएनआय निर्देशांकानुसार, उत्पादनांना ५ गुणांच्या आधारे रेट केले जाते. मध्ये ५ हा सर्वोत्तम स्कोअर आहे आणि ३.५ च्या वरचा स्कोअर आरोग्यदायी मानला जातो. कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, अन्न कंपन्यांच्या पोर्टफोलिओची चाचणी घेण्यात आली. यात धक्कादायक माहिती समोर आली. येथे असलेल्या पेप्सिको, डॅनोन आणि युनिलिव्हरच्या उत्पादनांना १.८ ची रेटिंग देण्यात आली. मात्र उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये अशा उत्पादनांना सरासरी २.३ गुण मिळाले आहेत.