इंटरनॅशनल मास्टर इथन वाझला रौप्यपदक

राष्ट्रीय सब-ज्युनियर खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत अभूतपूर्व कामगिरी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
13th November 2024, 12:18 am
इंटरनॅशनल मास्टर इथन वाझला रौप्यपदक

पणजी : तामिळनाडू येथे झालेल्या राष्ट्रीय सब-ज्युनियर खुल्या बुद्धिबळ चॅम्पियनशिप २०२४ स्पर्धेत इंटरनॅशनल मास्टर (आयएम) इथन वाझने गोव्यासाठी रौप्य पदक पटकावले.एथनने शानदार खेळीच्या जोरावर एकूण ११ फेऱ्यांमध्ये ९.५ गुण मिळवले, यात ८ विजय आणि ३ वेळा बरोबरी साधून ४९व्या १५ वर्षाखालील राष्ट्रीय सब-ज्युनियर ओपन बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्त प्रथम क्रमांक पटकावला. ही स्पर्धा तामिळनाडू बुद्धिबळ संघटनेच्या वतीने ऑल इंडिया बुद्धिबळ महासंघाच्या अंतर्गत ३ ते ११ नोव्हेंबर या कालावधित तामिळनाडूमधील होसूर येथे आयोजित करण्यात आली होती.
आशियाई युवा, फिडे विश्वसाठी इथनची निवड
तामिळनाडू येथे ९ दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेत २८८ खेळाडूंचा समावेश होता. १३ वर्षीय इथनने संपूर्ण ११ फेऱ्यांमध्ये एकदाही पराभव न स्वीकारता स्पर्धेत अपराजित राहण्याचा मान मिळवला, ज्यात भारतातील सर्वोत्कृष्ट खेळाडू सहभागी झाले होते. दरम्यान, या कामगिरीमुळे इथन वाझची २०२५ मधील आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धा आणि फिडे विश्व युवा बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे.