अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयानंतर अनेक देशांची झोप उडली आहे. त्यामध्ये चीनचाही समावेश असू शकतो. ट्रम्प यांचा विजय चीनसाठी त्रासदायक असल्याचे मानले जात आहे. त्यामध्ये चिनी मालच्या आयातीवर ६० टक्के कर लावण्यासोबतच ट्रम्प यांनी केलेली घोषणा तसेच वुहान व्हायरसबाबतचे त्यांचे वक्तव्यही आहे. जे करोना काळात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
अमेरिकेतील सत्ताबदलानंतर चीनची झोप उडण्याचे अनेक कारणे आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर भारी शुल्क लावणार असल्याचे स्पष्ट केले होते. ट्रम्प हे चीनविरोधी धोरणासाठी ओळखले जातात. देशातील उत्पादन वाढवून अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या उद्देशाने चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर ६० टक्के शुल्क आकारले जाऊ शकते, इतर देशांवर १० टक्क्यांपर्यंत शुल्क आकारले जाऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत चीनमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर बंदी येऊ शकते. त्यामुळे चीनला आर्थिक आघाडीवर मोठा धक्का बसू शकतो. ट्रम्प यांनी चीनचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा संपवण्याचाही प्रस्ताव ठेवला आहे. चीन दरवर्षी ४०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या वस्तू अमेरिकेला विकतो. तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांच्या राजवटीत अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्ध पुन्हा सुरू होण्याच्या शक्यतेने बीजिंग चिंतेत आहे, कारण चीनला सध्या अनेक महत्त्वाच्या अंतर्गत आणि आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
ट्रम्प यांनी अमेरिकेला पुन्हा सर्वात शक्तिशाली देश बनवणार असल्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे पुरवठा साखळीत सामील असलेल्या टेक कंपन्यावर ट्रम्प निर्णय घेतील. हा निर्णय चीनच्या आर्थिक विकासाला धोका पोहोचवू शकतो. यामुळे अनेक मोठ्या कंपन्या चीन सोडून अमेरिकेत जाऊ शकतात किंवा दुसऱ्या देशात जाऊ शकतात. यामुळे चीनचे मोठे आर्थिक नुकसानही होऊ शकते.
कोविड-१९ महामारीने जागतिक विकासाचे इंजिन मानल्या जाणाऱ्या चीनच्या अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे. दक्षिण चीन समुद्रात तैवानसोबत चीनच्या वाढत्या संघर्षाच्या बाबतीत ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका आक्रमक होऊ शकते. या प्रदेशात अमेरिका आपल्या लष्करी हालचालीही वाढवू शकते. तैवानजवळील समुद्रात अमेरिका लष्करी हालचाली वाढवू शकते. एकूणच अमेरिका चीनवर प्रचंड दबाव वाढवू शकतो, असेही मानले जात आहे.
- सुदेश दळवी