तेलंगणातील राजकारण सध्या अभिनेता अल्लू अर्जुन आणि त्याचा चित्रपट ‘पुष्पा २ - द रुल’भोवती फिरताना दिसत आहे. यानिमित्ताने अल्लू अर्जुन आणि मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यातील वाद समोर आला आहे. आता या वादात विरोधी पक्ष असलेल्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस)ने उडी घेतली आहे.
चित्रपटात यशस्वी झालेले अनेक दाक्षिणात्य कलाकार राजकारणात आपले नशीब आजमावून पाहत असल्याचे दिसते. अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २- द रुल’ हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एक महिला मृत्युमुखी पडली. या प्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल होऊन त्याला अटकही झाली. मात्र, त्याच दिवशी तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याला जामीन दिला. या प्रकरणानंतर सत्ताधाऱ्यांकडून अल्लूवर आरोप करण्यात आले. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी अभिनेता अल्लू अर्जुनवर दोषारोप सुरू केले. मात्र, तेलंगणातील विरोधी पक्ष बीआरएसने सत्ताधारी काँग्रेसला लक्ष्य केले आहे.
तेलंगणामध्ये २०२३ साली विधानसभा आणि २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत बीआरएसचा पराभव झाल्याने त्या पक्षात त्यानंतर मरगळ दिसत होती. मात्र, या मुद्द्यामुळे आता पक्षात पुन्हा एकदा उत्साह संचारलेला आहे. राज्य सरकार राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
बीआरएसच्या एका नेत्याने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या निर्णयामुळे सामान्य लोकांमध्ये नाराजीचे वातावरण आहेच. आता ते सेलिब्रिटीबरोबरही तसेच वागत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचे पडसाद पाहायला मिळतील, असेही या नेत्याने सूचित केले.
विधानसभा आणि लोकसभेत पानिपत झाल्यानंतर बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव हे फारसे सार्वजनिक कार्यक्रमांत दिसले नव्हते. मात्र, अल्लू अर्जुनच्या विषयामुळे या पक्षाच्या नेत्यांमध्ये एक नवा उत्साह संचारला आहे. आगामी निवडणुकांसाठी मंडल, जिल्हा स्तरावरील कार्यकर्ते कामाला लागले आहेत. सरकारला घेरण्यासाठी पक्षाचे नेते पुढे सरसावले आहेत. दुसरीकडे रेवंत रेड्डी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदारांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे मंत्री दसारी अनुसया यांनी अल्लू अर्जुनला यापूर्वी मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तस्कर हा आदर्श असू शकतो का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
- प्रसन्ना कोचरेकर