संगीत पार्ट्यांचे मृत्युजाल

संगीत पार्ट्या मृत्युजाल बनत आहेत का, त्यावर सरकारनेही विचार करायला हवा. सुरक्षा यंत्रणा असे अमली पदार्थ पार्ट्यांमध्ये नेण्यापासून अडवण्यात अपयशी ठरतात, गोव्यात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Story: संपादकीय |
30th December 2024, 10:10 pm
संगीत पार्ट्यांचे मृत्युजाल

नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने गोव्यात शेकडो संगीत पार्ट्या सुरू आहेत. देशभरात नववर्षाच्या स्वागताचे निमित्त करून वेगवेगळ्या संगीत पार्ट्यांचे आयोजन होत असते. किनारी आणि शहरी भागात या पार्ट्या आयोजित करण्यासाठी मोठमोठ्या इव्हेंट कंपन्या चित्रपट तारे, प्रसिद्ध डीजेंना आणत असतात. डिसेंबर महिन्यातील शेवटच्या तीन चार दिवसांत किनारी भागात पार्ट्यांचा धुमाकूळ असतो. यातील अनेक संगीत पार्ट्यांमधून ड्रग्जचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो, हे सत्य कोणी नाकारू शकत नाही. अधिकृतपणे त्याबाबतीत नोंद कुठे होत नाही.

सनबर्न सारखा संगीत महोत्सव जो जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे. २००७ मध्ये गोव्यात प्रथम दोन दिवसांचा हा महोत्सव कांदोळी - वागातोर येथे झाला. तेव्हापासून या महोत्सवाने गोव्यात मूळ धरले. त्यानंतर सुपरसोनिक नावाचा महोत्सव गोव्यात सुरू केला गेला, पण सनबर्नला तो पर्याय होऊ शकला नाही. मध्यंतरी २०१६ च्या दरम्यान सनबर्न गोव्यातून पुण्याला गेला. दोन वर्षांनंतर तो पुन्हा गोव्यात आला. वातागोरला पुन्हा स्थिरावला. यंदा प्रथमच सनबर्नने आपली जागा बदलली आणि धारगळ सारख्या दुर्गम भागातील खुल्या जागेत सनबर्नचे आयोजन केले. मांद्रे, आश्वे, मोरजी, हरमल या भागांत अशा छोट्या स्वरुपाच्या पार्ट्या होत असतात. बार्देशमध्ये कळंगुट, वागातोर, बागा, हणजूण या भागांत तर रोज पार्ट्यांचाच हंगाम असतो. सनबर्नने या सर्व पार्ट्यांचे स्वरूप बदलले. या महोत्सवात सहभागी झालेल्यांपैकी अनेकदा काहीजणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे कारण शेवटपर्यंत समोर येत नाही. शवचिकित्सा अहवालातही त्याबाबत काही नमूद केले जात नाही. त्यामुळे सनबर्न संगीत महोत्सवात सहभागींचा मृत्यू ड्रग्जच्या ओव्हर डोसने होतो का, हा प्रश्न मृत्यू आलेल्यांसोबतच मरण पावतो. धारगळमध्ये सनबर्नला सुरुवातीला विरोध झाला. पंचायतीमध्ये या विषयावरून मतभेद झाले. सत्ताधारी गटाने महोत्सवाला हिरवा कंदील दाखवला. धारगळचे नागरिक सोडून इतर सर्वत्र सनबर्नला विरोध दिसत होता. सोशल मीडियावरून तर हा महोत्सव नकोच, असे म्हणणारे शेवटी थकून गेले. प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने प्रशासनाला आयोजक नियम भंग करतात का, त्यावर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले. गोव्यात सनबर्नला न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाला. त्याचवेळी केरळमध्ये वायनाडमध्ये सनबर्न करण्यास केरळ उच्च न्यायालयाने नकार दिला. धारगळमध्ये सनबर्नची सुरुवात झाली ती होम हवनाने. त्यात गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कळंगुटकरही उपस्थित होते. या फोटोनंतर राजकीय पक्ष लोकांना कसे मूर्ख बनवतात, त्यावर चर्चा सुरू झाली. शेवटी सनबर्न सुरू झाला आणि पहिल्याच दिवशी दिल्लीतील एका तरुणाला अस्वस्थ स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याचा मृत्यू झाला. मूत्रपिंडाला इजा पोहचल्याचे शवचिकित्सा अहवालात म्हटले आहे. व्हिसेरा राखून ठेवण्यात आला. संगीत पार्ट्यांमध्ये मृत्यू येणाऱ्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट केलेच जात नाही, त्यामुळे अधिकृतपणे ड्रग्जमुळे मृत्यू झाला असे म्हणता येत नाही. २००९ मध्ये मेहा बहुगुणाच्या मृत्यूनेच गोव्यातील मोठ्या संगीत पार्ट्यांमध्ये मृत्यू येण्याच्या घटना घडू लागल्या. आतापर्यंत अशा पार्ट्यांमध्ये सहभागी झालेल्या सहाजणांचा मृत्यू झाला आहे. गोव्याच्या पर्यटनासाठी अशा संगीत पार्ट्यांची गरज आहे का, त्यावर सरकारने फेरविचार करायला हवा.

गोव्यात रेव्ह पार्ट्या, संगीत पार्ट्या होत असतात. तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी त्यांचे आयोजन केले जाते. अशा पार्ट्यांमधून ड्रग्जचा वापर होतो का? हा नेहमीच चर्चेचा विषय बनतो. गोव्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले जातात. परवाच दिल्लीत ३.६८ किलो चरस जप्त करण्यात आला, जो कारमधून गोव्यात आणला जात होता. गोवा पोलिसांनी कितीतरी प्रकरणांमध्ये एक्स्टसी, गांजा, एमडीएमए, कोकेन, चरस, एलएसडी असे अनेक अमली पदार्थ जप्त केले आहेत. गोव्यातील काही संगीत पार्ट्यांमध्ये अशा ड्रग्जचा वापर होत असतो. मोठमोठे नाईट क्लब, पब अशा ड्रग्जच्या वापरामुळे यापूर्वीही पोलिसांच्या स्कॅनरखाली आले आहेत. गोव्याबाहेरील पोलिसांनीही काहींच्या मुसक्या गोव्यातूनच आवळल्या आहेत. फक्त माणूस मेल्यानंतरच अशा विषयांचा गवगवा होतो. संगीत पार्ट्या मृत्युजाल बनत आहेत का, त्यावर सरकारनेही विचार करायला हवा. सुरक्षा यंत्रणा असे अमली पदार्थ पार्ट्यांमध्ये नेण्यापासून अडवण्यात अपयशी ठरतात, गोव्यात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.