भागवतांचे तरी ऐकणार का ?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी, पूर्वीची धर्मस्थळे शोधण्याबाबत सबुरीचा सल्ला दिला आहे, त्याचे पालन संघात होईल, मात्र संतमहंत त्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, असे प्रतिक्रियांवरून दिसते आहे.

Story: संपादकीय |
29th December 2024, 10:38 pm
भागवतांचे तरी ऐकणार का ?

असे म्हटले जाते की, दुसऱ्यावर टीका करताना आपण तेच तर करीत नाही ना, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. मुस्लिम बादशहांनी आपल्या सत्ताकाळात असंख्य धर्मस्थळे पाडली आणि कालांतराने हिंदू मंदिरे आणि बौद्ध धर्मस्थळांच्या जागी मशिदी उभ्या राहिल्या. त्यामागे मुस्लिम सत्ताधाऱ्यांचे पाठबळ होते, असे इतिहास सांगतो. याच कारणास्तव भारतात अनेक मशिदींचे मूळ शोधायचे ठरविले तर त्या ठिकाणी मंदिर होते असे आढळून येते. अयोध्येतील बाबरी मशीद त्या ठिकाणी असलेले श्रीरामाचे मंदिर पाडून बांधली गेली होती, हे न्यायालयात सिद्ध झाल्यावर त्या ठिकाणी पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर गेल्या जानेवारीत भव्यदिव्य असे रामलल्लाचे मंदिर उभे राहिले आहे. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी ज्यावेळी हिंदूंच्या ताब्यात आली त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले होते की हा कोणाचा विजय नसून राष्ट्रीय अस्मितेचा सन्मान आहे. त्यावेळी डॉ. भागवत यांनी दिलेल्या संयमाच्या, सबुरीच्या सल्ल्यावरून गदारोळ माजला नाही. हिंदूंमधील उत्साह आणि श्रद्धा यांचे दर्शन जसे त्यावेळी घडले त्याचवेळी त्यांच्यामधील सहिष्णुता आणि संयमाचा प्रत्यय देखील आला. मग आताच भागवतांनी दिलेल्या संयमाच्या सल्ल्यावरून धार्मिक प्रतिक्रिया कडव्या स्वरुपात का व्यक्त होत आहेत, याचे आश्चर्य वाटते. भागवत यांनी आपले सांस्कृतिक कार्य करावे, धर्माच्या कामात लक्ष घालू नये, असे संतमहंत म्हणू लागले आहेत. जुन्या धर्मस्थळांचा शोध घेण्याच्या निमित्ताने हिंदूंचे नेते बनण्याचा प्रयत्न काही जण करीत आहेत, ही भागवत यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. आपण कुठच्या टोकापर्यंत जायचे असा प्रश्न देशातील सच्च्या नागरिकाला पडल्याशिवाय राहत नाही, तेच प्रातिनिधिक मत संघाने व्यक्त केले असेल, तर त्यावर तुटून पडण्याची खरोखरच गरज आहे का, असेच सुबुद्ध नागरिक म्हणेल.

डॉ. भागवत यांच्या कार्यकाळावर नजर टाकली तर त्यांची सुधारकाची भूमिका समोर येते. कालानुरूप बदल करण्यात ते मागे राहिलेले नाहीत. प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधत राहू नका, असे त्यांचे निवेदन कडव्या धार्मिक नेत्यांना अथवा या स्थितीचा राजकीय लाभ घेऊ पाहणाऱ्यांना कदाचित आक्षेपार्ह वाटले असेल, पण इतिहास खोदत राहणे कितपत योग्य आहे, अशीच भावना त्यामागे आहे. गुजरातमधील दंगलीनंतर भागवत यांनी राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या स्थापनेला चालना दिली होती. महिला सशक्तीकरणाबाबतही ते आग्रही आहेत. महिलांना समान संधी मिळाली तरच देशाचा विकास शक्य आहे, या मताचे ते आहेत. जातव्यवस्था कालबाह्य ठरली आहे, ग्रामीण विकासावर अधिक लक्ष द्यायला हवे, अशी मते त्यांनी वेळोवेळी व्यक्त केली आहेत. मुस्लिम, ख्रिश्चन आणि डावे हे देशाचे अंतर्गत शत्रू आहेत, हे संघाचे जुने मत त्यांनी खोडून काढले आहे. धाडसी आणि दूरदर्शी धोरणे आखण्यात ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत, असे त्यांचे विरोधकही म्हणतात. सध्यस्थितीत वीस कोटी मुस्लिमांना देशविरोधी मानणे चुकीचे असून सर्व भारतीयांचा डीएनए समान आहे, या तत्त्वावर त्यांचा विश्वास असावा. याचमुळे द्वेषभावना पसरणे देशाला घातक आहे, असे त्यांना वाटल्यावरून त्यांनी हिंदूंना संयमाचा सल्ला दिला आहे, हे तर स्पष्टच आहे. अशा खुल्या आणि व्यापक मतप्रदर्शनाचे स्वागतच व्हायला हवे, मात्र चित्र वेगळेच दिसते आहे.

भागवतांचा सल्ला ऐकायचा की संतमहतांचे समर्थन करायचे, असा प्रश्न हिंदुत्ववाद्यांना पडला असेल. जगाची एकंदरीत वाटचाल, विज्ञानाची प्रगती आणि लष्करी सामर्थ्य वाढविण्यावर प्रत्येक देशात सुरू असलेली स्पर्धा याचा विचार करता राष्ट्र प्रथम हाच विचार प्रबळ व्हायला हवा. केंद्रातील मोदी सरकारने हेच ध्येय ठरवले आहे. या पार्श्वभूमीवर देशवासीयांमधील ऐक्याला प्राधान्य देण्याची वेळ आली आहे. अन्य देशांत हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत भारताने आवाज उठवण्यात गैर काहीच नाही, पण देशातील धार्मिक सलोखा टिकविण्याची जबाबदारी अधिक महत्त्वाची आहे. देश अभंग राहावा यासाठी सरकारच्या प्रयत्नामागे ठामपणे राहणे आवश्यक आहे. धर्म ही सार्वजनिक बाब नव्हे, ती वैयक्तिक आचरणाची गोष्ट आहे. हे देशवासीयांना पटविण्यासाठी संघाने प्रयत्न करावेत अशीच अपेक्षा आहे. अतिरेकी, दहशतवादी यांचा बंदोबस्त सरकार करणार आहेच, त्यासाठी नागरिकांनी आक्रमक बनण्याची गरज काय, असा प्रश्न भागवत मंथनातून उपस्थित होतो.