शुद्ध मनाचे, शुद्ध बुद्धीचे, निंदा न करणारे व एकनिष्ठ असे जे सज्जन असतात त्यांना गूढ, गौप्य, गुह्य गोष्टी विश्वासाने सांगाव्यात. असे केल्याने त्या सांगण्याचा सदुपयोगच होतो.
देवळात जमलेल्या श्रद्धाळू व जिज्ञासू मुमुक्षुंसमोर ज्ञानियांचा योगीराणा असलेले संतश्री ज्ञानेश्वर महाराज श्रीमद्भगवद्गीतेच्या आठव्या अध्यायाच्या विस्तृत विवेचनाची सांगता करून नवव्या अध्यायाच्या विवेचनास हात घालण्याअगोदर पुढे सांगताहेत- तुमच्या मोठ्या मनाने तुम्ही आपलेपणाने मला स्वीकारलेले असल्यामुळे साहजिकच तुम्हाला मी करीत असलेल्या सलगीचे ओझे वाटणार नाही. वासरू लुचताना जसे जसे गाईला अधिकाधिक ढुश्या मारते तसे तसे ती गाय अधिकाधिक प्रेमाने आपला पान्हा सोडत जाते. त्याप्रमाणे माझे लेकराचे बोलणे ऐकून तुमच्यातला सुप्त कृपाळूपणा जागा झाला असेल असे मी सोयिस्करपणे समजतो. आणि त्या कृपाळूपणाने आपण माझ्या बोलण्याकडे अधिक लक्ष द्यावे अशी विनंती मी आपणास करतो. एरवी आंब्यांप्रमाणे आढीत घालून काय आपण चांदणे पिकवतो का? किंवा आकाशावर कोणी पांघरूण घालते का? किंवा वाऱ्याला काय आपण गती देतो? पाण्याला आणखी पातळ करू शकत नाही, किंवा ताक घुसळून काढलेल्या लोण्याला परत कोणी घुसळायला जात नाही! म्हणजे या गोष्टी जशा न बदलता येणाऱ्या व अंतिम आहेत, तसे गीतार्थाच्या खोलीमधे शिरून बघितले तर जीवनाचे जे तत्व दृष्टोत्पत्तीस येते ते सुद्धा न बदलता येणारे असे अंतिम स्वरूपाचे सत्य आहे. एरवी ते वेदांनाही कळत नाही.
अहो, जिथे वेद ही मौन झाले, तो गीतार्थ मी कसा सांगू? आणि तोही मराठीत? तेवढा माझा अधिकार कुठला? पण एक मात्र निश्चित; की तीव्र इच्छेने जर मी आपले प्रेम प्राप्त करू शकलो, तर तोच दुष्प्राप्य गीतार्थ मी आपणास धीटपणे सांगू शकेन. म्हणून कृपा करून चंद्राहूनही शीतल असणारे व जीवनास अमृताहूनही उपयुक्त असलेले असे आपले अमूल्य अवधान आपण मी सांगतो त्याकडे लक्ष देऊन माझे मनोरथ पूर्ण करा. जर तुमच्या कृपादृष्टीचा वर्षाव सगळ्या बाजूंनी झाला तर माझ्या बुद्धीमध्ये सर्वार्थाचे पीक नि:शंक पूर्णपणे पिकेल. पण जर तुम्ही इथे उदासीन झालात, तर मात्र माझे ज्ञानांकुर सुकून जातील! जर श्रोत्यांकडून अवधानरुपी पौष्टिक खाद्य मिळाले तर साहजिकच वक्त्याचे वक्तृत्व पुष्ट होते व त्याच्या अक्षरांना स्वच्छंदतेने प्रमेयांची दोंदें सुटतात!
अर्थ हा प्रकट होण्यासाठी बोलाचीच वाट पहात आसतो! अर्थासवे मग अभिप्राय प्रकटतो. त्या परी मग एकातून एक असे अभिप्राय उपजतात आणि बुद्धीवर भावरूप फुलांचा बहर येतो! म्हणून संवादरूपी अनुकूल असा वारा जर व्यवस्थित वाहिला तर अंतरंगांत साहित्याच्या रसपूर्ण मेघांची यथोचित वृष्टी होईल. पण श्रोते जर दुर्लक्ष करणारे व उदास मनाचे असले, तर मांडलेला रस सगळा वितळून जाईल. अहो, चंद्रकांत मणी द्रवतो खरा, पण तो चंद्राच्या कौशल्यामुळे! तसे वक्त्याच्या वाणीला वक्तृत्वाचा पूर आणण्याचे कौशल्य श्रोत्यांच्या चित्ताच्या सावधानतेत असते. ती सावधानताच जर नसेल, तर वक्त्याचे वक्तृत्व कसे ओसंडेल?
असो. तर "कृपया आम्हाला गोड करून खावे" - असे काय तांदुळ खवय्याला विनवतात का कधी? की "आम्हाला असे नाचव किंवा तसे नाचव" - असे कठपुतळी - प्रयोगातल्या कळसूत्री बाहुल्या सूत्रधाराची मनधरणी करतात? तो सूत्रधार काय त्या बाहुल्यांच्या समाधानासाठी त्यांना नाचवतो का? नाही. खरे तर त्यांना नाचवून तो स्वत:ची कला वृद्धिंगत करतो. त्या चालीवर तसे बघायला गेले तर मला काय गरज आहे म्हणा, "अवधान द्या अवधान द्या" - अशी तुम्हाला विनंती करायची!
असे ज्ञानदेवांनी म्हटल्यावर श्रीगुरुजी त्यांचे थोरले बंधुराज संतश्री निवृत्तिनाथ सहज म्हणाले की, अरे ज्ञानदेवा, काय झालय तुला?; असे का बोलायला लागलास? तुझ्या सगळ्या प्रार्थना व विनंत्या मला पोचल्या. आता गीतार्थ प्रकट कर. श्रीमन्नारायणदेवांनी गीतेच्या तत्वार्थाचे जे साररुपी निरूपण तुझ्याजवळ केलेय ते सत्वर या श्रोत्यांना सांग. हे ऐकून श्रीनिवृत्तिदास ज्ञानदेवांचे समाधान झाले. हर्षोल्हास पावून ते पुढे सांगते झाले - संत-सज्जनहो, आता (गीतेचा नववा अध्याय) ऐका. पुढे भगवंत पार्थाला असे म्हणाले -
श्रीभगवानुवाच
इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे।
ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा
मोक्ष्यसेsशुभात्।।१।।
सरळ अर्थ : त्यानंतर श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे अर्जुना, तुला दोषदृष्टिरहित भक्त असलेल्याला हे परमगुह्य ज्ञान रहस्यासह सांगतो, की जे जाणल्याने दु:खरूप संसारातून मुक्त होशील.
विस्तृत विवेचन : हे अर्जुना, हे वर्म, हे ज्ञान, जे जीवाच्या अंतरीचे गुज आहे, ते मी तुला पुन्हा सांगतो. निजांतरीची खूण परत परत उकलून दाखवायची काय आवश्यकता आहे, असे तुला वाटणे स्वाभाविक आहे. याचे कारण म्हणजे तू सूज्ञ आहेस, जाणता आहेस; नीट ऐकावे, समजून घ्यावे अशी आस्था तुझ्या ठायी आहे. आणि आम्ही जे जे काही म्हणून सांगतो त्याचा तू मान राखतोस, अनादर करीत नाहीस. करिता, नको ते बोलणे सुद्धा घडले तरी घडू दे, पण आमच्या बाबतीत तुझ्या ठायी असलेले गूढपण मोडायला हवे. आमच्या जीवीचे गुज तुला उमजायला हवे.
आईच्या स्तनामधले दूध जरी कितीही गोड असले तरी त्या स्तनाला त्या गोडीचे अप्रूप नसते. पण ते बाळाला नुसतेच गोड लागत नाही, तर त्याने त्याची इच्छापूर्ती होऊन सुखही मिळते. मुड्यातले (भाताचे वा इतर धान्याचे बीज आत घालून बाहेरून पेंढा अगर गवत याचे आवरण घालून सुंभाने अगर दोरीने बांधून केलेल्या गोलाकार किंवा अंडाकृती गांठोड्याला 'मुडा' किंवा 'कणगा' म्हणतात) बी काढून मशागत केलेल्या शेतात पेरले तर ते सांडून वाया गेले असे आपण म्हणत नाही (कारण ते दूध आणि ते बीज त्या योग्य ठिकाणी गेलेले असते जिथे त्याचा चांगला विनियोग होतो). यासाठी शुद्ध मनाचे, शुद्ध बुद्धीचे, निंदा न करणारे व एकनिष्ठ असे जे सज्जन असतात त्यांना गूढ, गौप्य, गुह्य गोष्टी विश्वासाने सांगाव्यात. असे केल्याने त्या सांगण्याचा सदुपयोगच होतो.
- मिलिंद कारखानीस
(लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल असून
ते विविध विषयांवर लेखन करतात.)
मो. ९४२३८८९७६३