म्हापसा : पिकेन-चिवार, हणजूण येथे वडिलोपार्जित घर बळकावण्यासाठी १५ ते २० भाडोत्री गुंडांच्या सहाय्याने बापलेकावर खूनी हल्ला करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हा नोंदवत दोघांना अटक केली. सदर घटना गुरूवारी सकाळी १०.४५ च्या सुमारास घडली. फिर्यादी मेविल्टन थिओदोर (३२, रा. गुमालवाडा हणजूण) व त्याचे वडील टिम्मी थिओदोर यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. मेविल्टन याच्या तक्रारीच्या आधारे हणजूण पोलिसांनी संशयित आरोपी दिगंबर नारायण साळकर (५४, रा. धुळेर म्हापसा) व अखिल सुरेश टेक्केकर (३३, रा. कुचेली म्हापसा) या दोघांना अटक केली.
फिर्यादी थिओदोर यांच्या वडिलोपार्जित घरावर संशयित ब्रुनो डिसोझा (रा. मुंबई) यांनी वारसदार म्हणून दावा करीत दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला होता. मात्र हल्लीच त्यांनी हा खटला मागे घेतला. तर फिर्यादी कुटूंबाने सदर घरामध्ये एका विदेशी दाम्पत्याला भाडेकरू म्हणून ठेवले होते. गुरूवारी सकाळी संशयित ब्रुनो डिसोझा हे १५ ते २० हे बाऊंन्सरना घेऊन घटनास्थळी आले व त्यांनी भाडेकरू विदेशी कुटूंबाला सामानासह घरातून बाहेर पडण्यास सांगितले.
हा प्रकार विदेशी नागरिक महिलेने घर मालक टिम्मी थिओदोर यांच्या कानावर घातला. त्याबरोबर जखमी थिओदोर पितापूत्र घटनास्थळी दाखल झाले. तिथे आल्यावर संशयितांनी त्यांना लाथा बुक्की व दंडुकांच्या सहाय्याने मारहाण केली. हा प्रकार पाहून ते विदेशी कुटूंब घर सोडून पळाले. त्यानंतर संशयितांनी घराला कुलूप लावले. जबर जखमी थिओदोर पितापूत्राला रूग्णवाहिकेतून गोमेकॉत दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असून टिम्मी थिओदोर यांची प्रकृत्ती चिंताजनक आहे. या घटनेनंतर थिओदोर कुटूंबियांनी हणजूण पोलिसांत धाव घेतली व तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयित ब्रुनो डिसोझा व त्याने आणलेल्या १५-२० भाडेकरू लोकांविरूध्द खूनी हल्ल्याचा गुन्हा दाखल केला.तर ब्रुनो डिसोझा यांच्या तक्रारीच्या आधारे त्यांना तसेच त्यांची मुलगी लाना व दिगंबर यांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपाखाली अज्ञातांविरूध्द पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा नोंद केला आहे.
दरम्यान, संशयित ब्रुनो डिसोझा याने २०२३ मध्ये वारसदार म्हणून घरावर हक्क दाखवला. तसेच त्यांनी न्यायालयात दिवाणी खटला दाखल केला. मात्र गेल्या ५७ वर्षांत डिसोझा हे कधीच या ठिकाणी आले नसल्याचे सांगत थिओदोर कुटूंबियांनी त्यांचा हा दावा फेटाळून लावला. गेल्यावर्षी थिओदोर कुटूंबियांनी डिसोझा यांच्याविरूध्द हणजूण पोलिसांत छळणूकीची तक्रार नोंदवली होती. मात्र पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली नाही, असे मारीया थिओदोर यांनी सांगितले.