निष्पक्ष निवडणुकांसाठी पोलीस महासंचालकांची बदली

Story: राज्यरंग |
08th November 2024, 12:25 am
निष्पक्ष निवडणुकांसाठी पोलीस महासंचालकांची बदली

महाराष्ट्राची निवडणूक जाहीर झाल्यापासून विरोधकांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांच्या बदलीची मागणी निवडणूक आयोगाकडे लावून धरली होती. अखेर सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्ला यांची बदली केली. महासंचालकपदी शुक्लांनंतरच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असे निर्देशही निवडणूक आयोगाने दिले. या निर्णयामुळे शुक्लांबाबत सुरू असलेल्या चर्चा थांबणार आहेत.

रश्मी शुक्ला यांचा जन्म १५ ऑगस्ट १९६५ रोजी मुंबईत झाला. त्यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. एल्फिन्स्टन महावि‍द्यालयातून पदवी मिळवली. मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले. १९८८ मध्ये अवघ्या २२ व्या वर्षी त्या यूपीएससीची परीक्षा उ‌त्तीर्ण होऊन आयपीएस अधिकारी बनल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू, असे त्यांना मानले जात होते. राज्याच्या गुप्तचर विभागाचे प्रमुखपदही त्यांनी सांभाळले आहे. २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या काही अधिकाऱ्यांची बदली केली होती, त्यात रश्मी शुक्लाही होत्या. त्यांना राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख पदारून हटवण्यात आले होते. मात्र लागलीच त्यांना केंद्रात प्रतिनियुक्तीवर बोलावण्यात आले होते. तेथे त्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालकपदाची आणि नंतर सशस्त्र सीमा दलाच्या प्रमुखपदाची जबाबदारी पार पाडली होती.

शुक्ला केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेल्या, त्यावेळी काँग्रेसचे नाना पटोले, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे आदी विरोधी नेत्यांचे फोन टॅप केले, असा आरोप त्यांच्यावर झाला होता. याविरोधात शुक्ला यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांच्या विरोधातील दोन गुन्हे रद्द केले, तर एका प्रकरणात सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला. त्यामुळे शुक्लांचा राज्यात परतण्यातील मोठा अडथळा दूर झाला होता.

राज्यात महायुतीने पुन्हा स‌त्ता हाती घेतल्यानंतर रश्मी शुक्लांना पोलीस महासंचालक पदावर नियुक्त केले. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर फोन टॅपिंग प्रकरणाचा संदर्भ देत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन शुक्ला यांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती. अखेर त्यांची मागणी पूर्ण झाली. निवडणुका म्हटल्या की, राजकीय पक्षांतील आरोप-प्रत्यारोप रंगत असतात. सर्वांच्या नजरा राजकारण्यांकडे असतात; मात्र विरोधी पक्षांच्या आरोपामुळे पोलीस अधिकारीही चर्चेत राहिला होता. अखेर निवडणूक आयोगाने या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

- प्रदीप जोशी