कर्नाटक : बस चालवतानाच चालकाला आला 'हार्ट अटॅक'; कंडक्टरचे प्रसंगावधान, वाचवले १० जणांचे प्राण

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
07th November, 11:28 am
कर्नाटक : बस चालवतानाच चालकाला आला 'हार्ट अटॅक'; कंडक्टरचे प्रसंगावधान, वाचवले १० जणांचे प्राण

बंगळुरू :  कोणत्याही क्षेत्रात वाहन चालकाची भूमिका बजावणाऱ्यांचे आपल्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष होते. त्यांचे अर्धे आयुष्य हे प्रवासातच निघून जाते. कामाचा ताण आणि जेवण-विश्रांती-औषधपाणी योग्य वेळी न झाल्याने बऱ्याचदा त्याचे विपरीत परिणाम आरोग्यावर होतात. दरम्यान बंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बंगळुरू मेट्रो ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन म्हणजेच बीएमटीसीच्या बस चालकाला चालत्या बसमध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मात्र  बसच्या कंडक्टरने प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या बाजूला नेत सुरक्षित ठिकाणी उभी केली. यामुळे बस मधील सुमारे १०  जणांचे प्राण वाचले. मात्र तीव्र झटक्यामुळे चालक किरण कुमार यांचा अकाली मृत्यू झाला. सदर घटना बसच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 



मिळालेल्या माहितीनुसार, काल बुधवारी सकाळी बस चालक किरण कुमार नेलमंगला ते दसनपुरा या मार्ग क्रमांक २५६  M/1 वर वाहन क्रमांक केए -५७ -एफ-४००७ ही बस चालवत होते. अर्धा प्रवास केल्यानंतर किरण कुमार यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि गाडी चालवतानाच ते खाली कोसळले. बस कंडक्टर ओबलेश यांनी प्रसंगावधान राखात लगेच स्टीअरिंग व्हीलचा ताबा घेत गाडी कंट्रोल केली व रस्त्याच्या बाजूला नेत उभी केली.  

Watch: BMTC driver dies of heart attack, alert conductor veers bus to safety

त्यामुळे बसमधील सर्व प्रवाशांचे प्राण वाचले आणि मोठा अपघात टळला. यानंतर ओबलेशने प्रवाशांच्या मदतीने चालक किरण कुमार यांना जवळच्या व्ही.पी. मॅग्नस रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणीअंती किरणकुमार यांना मृत घोषित केले. या प्रकरणाची माहिती ओबलेश यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच मृताच्या कुटुंबीयांनाही माहिती दिली. 

बसच्या सीसीटीव्हीत घटना कैद

बसच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चालक अचानक खाली पडताना दिसत आहे. चालकाने खाली पडता पडता बस डावीकडे वळवली आणि दुसऱ्या  बीएमटीसी बसला धडक दिली. बस कंडक्टर ओबलेश यांनी बसमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करून आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी वाहन सुरक्षितपणे थांबवले. ही घटना सकाळी अकरा वाजता घडली.  


बीएमटीसीने जारी केलेल्या निवेदनानुसार, घटनेवेळी बसमध्ये फक्त १०  प्रवासी होते व त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. बीएमटीसीनुसार किरण कुमार पूर्णपणे निरोगी होते आणि त्यांना कोणतीही मोठी आरोग्य समस्या नव्हती. किरण कुमार हा मूळचा हसनचा रहिवासी होता. त्यांच्या पश्चात पत्नी आणि ५ वर्षांची मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या मृत्यूने बीएमटीसीच्या कर्मचाऱ्यांत हळहळ व्यक्त होत आहे. 




हेही वाचा