पणजी : बार्देश तालुक्यातील १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बाल न्यायालयाने ४७ वर्षीय आरोपीला दोषी ठरविले आहे. याबाबतचा निवाडा बाल न्यायालयाचे अध्यक्ष सई प्रभुदेसाई यांनी दिला आहे.
म्हापसा पोलिसांनी या प्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकाच्या तक्रारीवरून २० मार्च २०१८ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, आरोपीने १२ वर्षीय मुलीच्या घरात कोणी नसल्याची संधी साधून तिचे अपहरण करून तिला आपल्या घरी घेऊन गेला. त्यानंतर तिथे आरोपीने तिला मारहाण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी म्हापसा पोलीस स्थानकाचे तत्कालीन निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक परेश रामनाथकर यांनी आरोपी विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३, ३७६, ५०४, गोवा बाल कायद्याचे कलम ८ आणि बाल लैंगिक शोषण विरोधी कायद्याचे कलम ४,८,१२ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण करून १८ मे २०१८ रोजी बाल न्यायालयात सुमारे ८० पानी आणि १३ साक्षीदारांची साक्ष नोंद करून आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर न्यायालयात सरकारी वकील अॅना मेडोंका आणि थेमा नार्वेकर यांनी युक्तिवाद मांडून आरोपी विरोधातील पुरावे सिद्ध केले. या प्रकरणी बाल न्यायालयाने पुराव्यांची दखल घेऊन ४७ वर्षीय आरोपीला दोषी ठरविले आहे.