ट्रम्पचा अपेक्षित विजय

जागतिक संबंध असलेल्या अनेक मुद्द्यांवर भारत आणि अमेरिकेची भूमिका समान राहिली आहे. दहशतवादासारख्या विषयावर भारत आणि अमेरिकेचे विचार एकमेकांच्याच नव्हे तर जागाच्याही फायद्याचे आहेत, असे जाणकार मानतात. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे भारताला मदतच होईल.

Story: अग्रलेख |
07th November, 12:24 am
ट्रम्पचा अपेक्षित विजय

डोनाल्ड ट्रम्प २०१६ ते २०२० पर्यंतच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकिर्दीनंतर आता पुन्हा विजयी झाले. कमला हॅरीस यांच्याबाबत सुरुवातीला वातावरण सकारात्मक दिसत होते, पण शेवटी त्यांचा पराभव झाला. ७८ वर्षीय अब्जाधीश डोनाल्ड ट्रम्प यांना २७९ इलेक्टोरल मते मिळाली तर कमला हॅरीस यांना २२३ इलेक्टोरल मते मिळाली. एलन मस्क सारख्या जगातील आघाडीच्या अब्जाधीशाने उघडपणे ट्रम्प यांची पाठराखण केली आणि प्रचारही केला. ज्यो बायडेन यांच्या कार्यकाळात अमेरिकेतील लोकशाही धोक्यात आली म्हणणाऱ्यांनी शेवटी बायडेन, बराक ओबामा सारख्या नेत्यांनी पाठिंबा दिलेल्या डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्या कमला हॅरीस यांना पराभूत केले. एक महिला राष्ट्राध्यक्ष झाली असती तर अमेरिकेत तो इतिहास ठरला असता. हा इतिहास घडता घडता बांधकाम सम्राट डोनाल्ड ट्रम यांच्या लोकप्रियतेने रोखला असेच म्हणावे लागेल. जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश, बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू. बुश आणि बराक ओबामा यांच्यानंतर सलग दोनवेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्याची परंपरा २०२० मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना अबाधित ठेवता आली नव्हती. त्यावेळी जो बायडेन यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. आताच्या निवडणुकीतून जो बायडेन यांनी माघार घेतल्यानंतर कमला हॅरीस यांना रिंगणात उतरवले. एरवी अमेरिकेच्या निवडणुकीकडे जगाचे लक्ष असतेच पण हॅरीस यांच्यामुळे अमेरिकेच्या निवडणुकीत कमालीची रंगत आली होती हे नक्की. 

भारताचा विचार करायचा झाला तर भारताचे अमेरिकेशी संबंध चांगलेच आहेत, कारण जागतिक संबंध असलेल्या अनेक मुद्द्यांवर भारत आणि अमेरिकेची भूमिका समान राहिली आहे. दहशतवादासारख्या विषयावर भारत आणि अमेरिकेचे विचार एकमेकांच्याच नव्हे तर जागाच्याही फायद्याचे आहेत, असे जाणकार मानतात. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे भारताला मदतच होईल. अमेरिकेतील मोठ्या उत्पादन कंपन्यांना भारतासारख्या मोठ्या देशाचा नेहमीच फायदा झाला आहे. त्यामुळे व्यापाराचा विषय आला तर त्यातही दोन्ही देशांचे संबंध चांगले राहिले आहेत. कमला हॅरीस जरी भारतीय वंशाच्या असल्या तरी दोन देशांतील सबंधांत त्याचा काही संबंध येत नाही. त्यामुळे भारताने पूर्णपणे मुत्सद्दीपणे या निकालाकडे पाहिले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन करताना आपले मित्र असल्याचे नमूद केले आहे. त्यांच्या म्हणण्यातूनही ट्रम्प हे कुठल्याही मुद्द्यांवर भारताला मदत करतील अशी अपेक्षा दिसत आहे. या दोन्ही नेत्यांची मैत्रीही चांगली असल्यामुळे यापुढेही भारताला अमेरिकेचा फायदाच होणार आहे. जसे मोदींनी त्यांना आपले मित्र म्हटले आहेत तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनीही काही दिवसांपूर्वी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये मोदी आपले मित्र असल्याचे म्हटले होते. आपले सरकार आले तर भारत आणि अमेरिकेचे संबंध अजून चांगले होतील, असे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे ट्रम्प यांच्यावर विश्वास ठेवण्यावाचून भारताला पर्यायही नाही. ट्रम्प हे कधीही कुठली भूमिका घेऊ शकतात म्हणून त्यांच्याबाबत एक अनिश्चितता असली तरी भारत - अमेरिकेचे संबंध अधिक घट्ट होतील, असे सध्या मानायला हरकत नाही. दोघांनीही एकमेकांच्या देशात एकमेकांबद्दल असलेला आदर वेळोवेळी दाखवला आहे. मग मोदींची अमेरिका भेट असो किंवा ट्रम्प यांची भारत भेट असो. मोदी - ट्रम्प यांच्यातील मैत्री यापुढेही दोन्ही देशांच्या विकासासाठी लाभाची ठरू शकते. भारताचा शेजारी चीनशी भारताचे पटत नाही आणि अमेरिकाही चीनला फारसे महत्त्व देत नाही. हा समान दुवा दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी फार गरजेचा आहे.

अमेरिकेला जगावर आपला प्रभाव असल्याचे नेहमी वाटते. तसे दाखविण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्नही असतो. त्यामुळे या निकालानंतर ट्रम्प यांच्याकडे अमेरिकेचे नेतृत्व आल्यानंतरही तसे भासवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. कारण ट्रम्प यांच्याबाबत अनिश्चितता हा दुर्गुण असल्याचे अनेकांना वाटते. पण दहशतवादाविषयी त्यांची राहिलेली भूमिका ही भारताला नेहमीच मदतीची ठरली आहे. ट्रम्प यांचे इमिग्रेशन धोरण तिथे जाणाऱ्या भारतीयांना अडचणीचे ठरेल अशी भीती आहे, कारण ट्रम्प यांनीच व्हिसासदंर्भात आपले धोरण अधिक क्लिष्ट करण्याचे जाहीर केले आहे. त्यांचा अमेरिकेतील नागरिकांनाच नोकरी मिळावी असा हेतू राहिल्यामुळे भविष्यात काही अडथळे तिथे इतर देशांतून जाणाऱ्यांना येऊ शकतात. पण त्यावरही भारत - अमेरिकेच्या मैत्रीतून तोडगा काढला जाऊ शकतो. ताबा घेतल्यानंतर ट्रम्प यांच्या पुढील वाटचालीबाबत काही गोष्टी स्पष्ट होतील त्यामुळे इतक्यातच भीती व्यक्त करण्यात काही अर्थ नाही.