ठगसेनांचे समान सूत्र

ठगसेनांच्या या सगळ्या प्रकरणांमध्ये एक समान सूत्र आहे ते म्हणजे, महिलांकडून होणारी फसवणूक. चार प्रकरणांमध्ये महिलांचीच नावे आहेत किंबहुना तीन प्रकरणांमध्ये तीन महिलाच मुख्य सूत्रधार आहेत, हे एक आश्चर्यच आहे. सरकारी नोकरी मिळते म्हटल्यानंतर लोक कोणाच्याही भूलथापांना बळी पडतात.

Story: संपादकीय |
06th November 2024, 12:38 am
ठगसेनांचे समान सूत्र

सरकारी खात्यांमध्ये नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवणाऱ्या वेगवेगळ्या ठगसेनांवर सध्या गुन्हे दाखल होत आहेत. गेल्या महिन्यापासून तक्रारींचा ओघ सुरू झाला तो थांबत नाही. काल परवाच नवीन तक्रार नोंद झाली. 'अमुक पैसे द्या, सरकारी नोकरी देतो' असे सांगणारे काही महाठग सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. विशेष म्हणजे सध्या अटकेत असलेल्या तीन प्रकरणांतील मुख्य सूत्रधार या महिला आहेत. चौथे एक प्रकरण सध्या पोलिसांकडे चौकशीसाठी आहे, त्यातही एका महिलेवर गुन्हा नोंद आहे. वेगवेगळ्या प्रकरणांत अटक केलेल्या तिन्ही महिलांकडून जप्त केलेल्या गाड्या पाहिल्या किंवा त्यांच्या नावावर असलेली मालमत्ता पाहिली तर गरीबांना फसवून हे लोक आपण कसे ऐषआरामात आयुष्य जगतात त्याचा प्रत्यय येतो. अनेक लोकांना या महिलांनी गंडवले आहे. तक्रार करण्यासाठी सगळेच पुढे आलेले नाहीत. कित्येकांनी आपलीच अब्रू जाईल म्हणून पोलीस स्थानकाची पायरी चढलेली नाही. 

सरकारी नोकरी पैसे देऊन मिळते असे पटवून देणाऱ्या पूजा, प्रिया, दीपाश्री जागोजागी तयार झाल्या आहेत. आपल्या सैदर्याने, वाणीने आणि वागणुकीने आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या या महिलांनी गोव्याचे संपूर्ण वातावरण ढवळून निघाले आहे. गोरगरीबांचा, दुबळ्या लोकांचा फायदा त्यांनी उठवला. त्यातील एक महिला तर आपले पैसे परत मागायला गेलेल्या लोकांचीच पोलिसांकडे तक्रार करायची. आपण लोकांना लुबाडतो या पश्चातापाचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. आज पोलिसांनी त्यांची प्रकरणे ढवळून काढल्यानंतर त्याच्या तळाशी अनेक गुपिते पोलिसांच्या हाती लागत आहेत. महागड्या गाड्या, दागिने, घरे, भूखंड अशा अनेक मालमत्ता आज या लोकांकडे आहेत. ज्या तक्रारी या लोकांच्या विरोधात आलेल्या आहेत, त्या फक्त हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या आहेत. असंख्य लोक यांच्या फसव्या आश्वासनांना बळी पडले आहेत, ज्यांनी अद्याप तक्रारी केलेल्या नाहीत. सरकारी नोकरी देतो अशी आमिषे दाखवून कितीतरी लोकांकडून या ठगांनी पैसे उकळले. आता स्वतःच्या बचावासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असले तरी हे लोक माफीच्या पात्रतेचे नक्कीच नाहीत. या प्रकरणांतील एकाच्या सहकाऱ्याने परवा आत्महत्या केली. त्यानंतर उलट सुलट चर्चाही सुरू झाली. पण नोकरी देतो असे सांगून अनेकांकडून लाखो रुपये घेतल्यानंतर लोकांनी त्यांच्याकडे पैसे परत घेण्यासाठी तगादा लावल्याच्या गोष्टीवर कोणी भाष्य करत नाहीत. त्याने किती लोकांना गंडा घातला ते फोंडा परिसरातील लोकांनाच माहीत आहे. मुख्य सूत्रधारांना अटक झाल्यामुळे हा सगळा खेळ उलटला याची जाणीव या प्रकरणातील सर्वांनाच एव्हाना झाली असावी. एका बाजूने पोलीस आणि दुसऱ्या बाजूने ज्यांच्याकडून पैसे घेतले त्या लोकांचा लागलेला तगादा त्यामुळे कदाचित त्याने आत्महत्या केली असावी. आता पोलिसांनी मुख्य सूत्रधार महिलेच्या विरोधात त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. हे लोक कुठल्याच स्थितीत दयेला पात्र नाहीत. एकेक प्रकरण पाहिले तर नोकरी देण्याचे आमिष दाखवून लोकांना गंडा घालणाऱ्या या टोळीने कशा प्रकारे फसवणूक केली असेल त्याचा अंदाज येतो. 

रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून पैसे उकळणारी प्रिया उर्फ पूजा यादव या महिलेने पोलीस कर्मचारी रोहन वेन्झी याच्या मदतीने घोटाळा केला. डिचोली परिसरातील काही लोक यांच्या आमिषांना फसले. शेवटी तक्रार आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. दीपाश्री सावंत गावस आणि सागर नाईक यांनी शिक्षकाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून एकाला फसवल्याचे एक प्रकरण समोर आले. पूजा नाईक हिने इतर काही साथिदारांच्या मदतीने अनेकांना वेगवेगळ्या खात्यांमध्ये नोकऱ्या देतो असे सांगून गेल्या अनेक वर्षांपासून फसवण्याचे सत्र चालवले होते. मुकुंद राणे याच्याविरोधात एक प्रकरण नोंद झाले, तर जुने गोवा पोलीस स्थानकात सतीश मोरे आणि सरिता केरकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. राज्यभर अशी प्रकरणे समोर येत आहेत. यातील काही लोक गेल्या कित्येक वर्षांपासून लोकांना गंडवत आहेत. ठगसेनांच्या या सगळ्या प्रकरणांमध्ये एक समान सूत्र आहे ते म्हणजे, महिलांकडून होणारी फसवणूक. चार प्रकरणांमध्ये महिलांचीच नावे आहेत किंबहुना तीन प्रकरणांमध्ये तीन महिलाच मुख्य सूत्रधार आहेत, हे एक आश्चर्यच आहे. सरकारी नोकरी मिळते म्हटल्यानंतर लोक कोणाच्याही भूलथापांना बळी पडतात. ऐषआरामात जगण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकानंतर एक गुन्हे करत जाणाऱ्या या महिलांवर तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते, याची कल्पनाही त्यांनी कधी केली नसावी. पोलिसांनी या सर्वांवर सुरू केलेली कारवाई आवश्यक आहे. यात गुंतलेल्या सर्वांना कठोर शिक्षा होईल याची काळजी पोलिसांनी घ्यायला हवी.