फोंडा : सरकारी नोकऱ्यांचे गाजर दाखवून अनेकांना लाखो रुपयांना गंडवणारी 'दीपाश्री' अखेर गजाआड

'पीडितांनी न घाबरता पुढे येऊन तक्रार दाखल करावी' : मुख्यमंत्री

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
04th November, 04:30 pm
फोंडा : सरकारी नोकऱ्यांचे गाजर दाखवून अनेकांना लाखो रुपयांना गंडवणारी 'दीपाश्री' अखेर गजाआड

फोंडा :  सरकारी नोकऱ्यांच्या आमिषाला बळी पडत धूर्त लोकांच्या सापळ्यात अलगद अडकलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशांनुसार पोलिसांनी देखील कंबर कसली असून,फोंडा पोलिसांनी आज दीपाश्री सावंत गावस या महिलेस ताब्यात घेऊन रीतसर अटक केली आहे. पोलिसांनी तिच्याविरुद्ध 'लुकआउट नोटीस जारी केली होती. 

दीपाश्री सावंत ही महिला  दीपाश्री गावस व दीपाश्री माहतो या नावांनी देखील ओळखली जाते. सर्व प्रथम दीपाश्रीचे नाव मार्च २०२१ साली प्रकाश झोतात आले. तिने अडवई-सत्तरी येथील देसाई वाडा येथे राहणाऱ्या राजाराम देसाई यांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तब्बल ९५ हजार उकळले. नोकरीचा तगादा लावताच दीपाश्रीने देसाई यांना जलस्त्रोत खात्याचे बनावट नियुक्तीपत्र दिले. देसाई यांनी म्हापसा येथील आझिलो रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली व पर्वरी येथील जलस्त्रोत खात्यात रुजू होण्यासाठी गेले. येथे त्यांना त्यांच्याकडे असलेले नियुक्ती पत्र हे बनावट असल्याचे आढळले. दरम्यान देसाई यांनी याबाबत वाळपई पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर दीपाश्रीला अटक देखील झाली होती. 

दरम्यान माशेल येथे एका हायस्कुलमध्ये शिक्षिकेची नोकरी देण्याचे आमिष दाखवत उसगाव भागातील एका विवाहित महिलेची १५ लाख रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या  सागर सुरेश नाईक ( कुर्टी - फोंडा) याला फोंडा पोलिसांनी रविवारी २७ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. काही दिवसापूर्वी  फोंडा पोलिसांनी सागरवर गुन्हा नोंद केला होता. सागर पोलीस खात्यातील कर्मचारी आहे. त्याने अनेकांची फसवणूक केल्याचे पोलीस चौकशीत स्पष्ट झाले आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार उसगाव येथील तृप्ती रुद्रेश प्रभू या विवाहित महिलेला माशेल येथील एका हायस्कुल मध्ये शिक्षिकेची नोकरी देण्याचे आमिष संशयीताने दाखविले होते. ऑक्टोबर २०२२ पासून संशयित सागर हा सदर महिलेकडून नोकरीसाठी पैसे उकळत होता. दरम्यान नोकरी तसेच पैसेही परत  मिळाले नसल्याने या महिलेने मागेच संशयिताविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी तक्रार नोंदवत सागर नाईकचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. 

 त्याची अधिक चौकशी केल्यानंतर या प्रकरणात सागर नाईक याची मामी सुनीता पाऊसकर हिचाही सहभाग असल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी सोमवारी सुनीता पाऊसकर हिलाही अटक केली. सुनीता एका शाळेची मुख्याध्यापिका आहे. सुनीता पाऊसकर हिला फोंडा प्रथमवर्ग न्यायालयाने सशर्थ जामीन मंजूर केला.  या प्रकरणातही मुख्य सूत्रधार दीपाश्री सावंत गावस असल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले . फोंडा पोलिसांना तिचा शोध नव्हता त्यामुळे तिच्याविरुद्ध पोलिसांनी ‘लूक आऊट' नोटीस जारी केली होती. 

दरम्यान गेल्या काही दिवसांत नोकऱ्यांचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची वेगवेगळी प्रकरणी समोर आली आहेत. यात पूजा नाईक-अजित सतरकर यांचा समावेश असलेले एक प्रकरण,  पशूवैद्यकीय डॉक्टर प्रकाश मुकुंद राणेचे दुसरे तर, सागर नाईक- सुनीता शशिकांत पाऊसकर व दीपाश्री सावंत गावस या तिघांचा समावेश असलेले तिसरे व पूजा उर्फ प्रिया यादव आणि निलंबित पोलीस कर्मचारी रोहन वेंझी यांचे चौथे प्रकरण, अशी चार प्रकरणे उघडकीस आली आहेत. फसवणुकीच्या एका प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर  डिचोली पोलिसांनी पूजा नाईक हिला पुन्हा अटक केली होती. दरम्यान डिचोली पोलिसांनी विशेष मोहीम राबवत काल कोल्हापूर येथून पूजा उर्फ प्रिया यादव या महिलेस अटक केली होती तर आज दीपाश्री सावंत हिला फोंडा पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. 

'पीडितांनी न घाबरता पुढे येऊन तक्रार दाखल करावी' 

दरम्यान आज १२ वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी  नोकर भरती घोटाळ्यातील एकही आरोपी सुटणार नाही. यात ज्यांनी पैसे गमावले आहेत, त्या सर्वांनी न घाबरता पोलिसांत तक्रार दाखल करावी असे म्हटले आहे. या आधी देखील  राज्यात सरकारी नोकऱ्या पैसे देऊन नव्हे, तर कर्मचारी भरती आयोगामार्फत भरल्या जात असल्याचे माहिती असतानाही सुशिक्षित लोकच सरकारी नोकऱ्यांसाठी पैसे देत आहेत, हे चिंताजनक आहे. नागरिकांनी यापुढे अशा भामट्यांवर विश्वास ठेवू नये, असे मुख्यमंत्री म्हणाले होते.

यापुढेही राज्यात सरकारी नोकऱ्या गुणवत्तेवरच दिल्या जातील. कर्मचारी भरती आयोगाकडून आतापर्यंत काही परीक्षा घेऊन सरकारी नोकरीची पदे भरण्यात आली आहेत. पुढील काही महिन्यांत आणखी पदांच्या भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत, असेही त्यांनी बुधवारी ३० ऑक्टोबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते .

हेही वाचा