गोवा। थेट यूकेतून आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला

संशयित प्लॅसिड विमानतळावरून ताब्यात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th November 2024, 12:11 am
गोवा। थेट यूकेतून आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला


प्रतिनिधी। गोवन वार्ता                        

वास्को : वेर्णा येथे २०१५ साली पोलिसांना शिवीगाळ करून मारहाण करणारा व गुन्हा दाखल झाल्यावर न्यायालयात उपस्थित न राहिलेल्या प्लॅसिड डिकॉस्टा याला रविवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी यूकेहून मोपा विमानतळावर उतरल्यावर ताब्यात घेण्यात आले. यानंतर त्याला वेर्णा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्यावर रितसर अटक करण्यात आली.                        

२३ डिसेंबर २०१५ रोजी दुपारी ३.३० वाजता वेर्णा येथील गोवन महाराजा हॉटेलसमोर अपघात झाला होता. या प्रकरणी तत्कालीन पोलीस शिपाई मुजावेद खान व इतर पोलीस पंचनामा करण्यासाठी गेले होते. तेथे संशयित डिकॉस्टा याने त्या पोलिसांना शिवीगाळ केली. तसेच कामामध्ये अडथळा आणून मारहाण केली. पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना त्याने त्यांना मारहाण करत जखमी केले होते.                        

याप्रकरणी खान यांनी वेर्णा पोलिसांत तक्रार केल्यावर संशयित डिकॉस्टाविरोधात गुन्हा दाखल करून त्याच दिवशी अटक केली होती. त्यानंतर २०१६ मध्ये न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. संशयित डिकॉस्टा न्यायालयात सुनावणी वेळी उपस्थित राहत नव्हता. याची दखल घेऊन न्यायालयाने त्याच्याविरोधात २०२२ मध्ये लुकआऊट नोटीस जारी केली होती. रविवारी तो यूकेहून विमानाने मोपा विमानतळावर उतरल्यावर त्याला इमिग्रेशन प्रवेशद्वारावरच अडवण्यात आले व तेथे त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला वेर्णा पोलिसाच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर वेर्णा पोलिसांनी त्याला सायंकाळी अटक केली आहे.