मुख्यमंत्री डॉ. सावंत; आतापर्यंत ९० टक्के काम पूर्ण
पणजी : जुने गोवेतील सेंट फ्रान्सिस झेवियर शवप्रदर्शनाच्या तयारीचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
सेंट फ्रान्सिस झेवियर शव प्रदर्शनासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सेंट फ्रान्सिस झेवियर शव प्रदर्शन कार्यक्रमाच्या तयारीवर मंत्री आलेक्स सिक्वेरा आणि संदीप जॅकीस सातत्याने लक्ष ठेवून आहेत. हा सोहळा येत्या २१ नोव्हेंबर ते ५ जानेवारी दरम्यान पार पडणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने जय्यत तयारी केली आहे. सार्वजनिक बांधकाम (पीडब्ल्यूडी), पोलीस, आरोग्य, अग्मिशामक या खात्यांनी ९० टक्के तयारी पूर्ण केलेली आहे. उर्वरित कामे १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केली जातील, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले. मडगाव तसेच राज्यातील विविध भागांतील भाविक दर्शनासाठी जुने गोवेत येत असतात. त्यांच्यासाठी खास कदंबा बसेसचीही व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सुमारे ३०० कोटी खर्च होण्याचा अंदाज
सेंट फ्रान्सिस झेवियर शव प्रदर्शनासाठी सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात ३०० कोटींची तरतूद केली होती. यासाठी निधी मिळण्याची मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडेही केलेली होती. परंतु, केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात त्यासाठी वेगळी तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्य सरकारने स्वत:च्या तिजोरीतील पैशांतून हा सोहळा यशस्वी करण्याचे निश्चित करून तशी तयारी सुरू केली आहे. या सोहळ्यासाठी जगभरातील भाविक गोव्यात येणार असल्याने सरकारने संबंधित सर्वच खात्यांना तयारीत गुंतवल्याचेही दिसून येत आहे.