गोवा। हॉटमिक्स डांबरीकरणात पावसाचा मोठा अडथळा!

प्लांट बंद ठेवण्याची वेळ; पाऊस संपताच कामाला येणार गती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th November 2024, 12:01 am
गोवा। हॉटमिक्स डांबरीकरणात पावसाचा मोठा अडथळा!

पणजी : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (पीडब्ल्यूडी) प्लांटसह रस्ते कंत्राटदारांचे राज्यातील सुमारे बाराही हॉटमिक्स प्लांट सुरू करण्यात आलेले आहेत. शिवाय काही भागांतील रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरणही सुरू करण्यात आले आहे. परंतु, अधून मधून पडणाऱ्या पावसाचा हॉटमिक्स प्लांट आणि रस्ते डांबरीकरणाला फटका बसत आहे. पाऊस पूर्णपणे थांबताच हॉटमिक्स डांबरीकरणास गती​ देण्यात येईल, असे ‘पीडब्ल्यूडी’चे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांनी रविवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना सांगितले.


यंदा राज्यात गोवामुक्तीपासूनच्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. जून आणि जुलै या दोन महिन्यांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे काही महिन्यांपूर्वी बांधलेले रस्ते वाहून गेले. काही भागांतील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने त्याचा फटका वाहन चालकांना सहन करावा लागला. यावरून स्थानिक जनता आणि वाहन चालकांकडून रोष व्यक्त होण्यास सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आक्रमक झाले. 

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ‘पीडब्ल्यूडी’ने २७ कंत्राटदारांसह ३० अभियंत्यांना कारणे दाखवा नोटिसा जारी केल्या होत्या. पावसाळा संपताच राज्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण सुरू करण्याचा निर्णय घेत, ‘पीडब्ल्यूडी’ने कामही सुरू केले होते. त्यासाठी स्वत:कडे असलेल्या हॉटमिक्स प्लांटसह कंत्राटदारांजवळील सुमारे बारा प्लांटही सुरू करण्यात आले होते. परंतु, मान्सून हंगाम संपल्यानंतरही राज्यात अधून मधून पाऊस कोसळत असल्याने त्याचा फटका प्लांट आणि डांबरीकरणास बसत आहे. पावसामुळे काही प्लांट पुन्हा बंद ठेवण्यात आले आहेत. पावसाचे प्रमाण कमी होताच सर्व प्लांटवरील काम सुरू होईल आणि रस्त्यांच्या डांबरीकरणास गती देण्यात येईल, असे पार्सेकर म्हणाले.