कुटबण जेटीवरील उर्वरित कामेही लवकरच पूर्णत्वास : मुख्यमंत्री

नव्या जेटीचे उद्घाटन : मच्छीमारांना आणखी सुविधा देण्याचे आश्वासन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd November 2024, 11:53 pm
कुटबण जेटीवरील उर्वरित कामेही लवकरच पूर्णत्वास : मुख्यमंत्री

नव्या सुधारीत जेटीची पाहणी करताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मंत्री आलेक्स सिक्वेरा, मंत्री नीळकंठ हळर्णकर व इतर. (संतोष मिरजकर)   

मडगाव : काँग्रेसच्या काळात कुटबण जेटीवरील समस्यांकडे दुर्लक्ष झाले. कुटबण जेटीवरील मच्छीमारांना आवश्यक त्या सुविधा भाजप सरकारने दिल्या. जेटीवरील उर्वरित कामेही लवकरच पूर्ण केली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.
कुटबण येथील नव्या जेटीचे उद्घाटन रविवारी करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर, मंत्री आलेक्स सिक्वेरा, आमदार क्रुझ सिल्वा यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
कुटबण येथे नव्या जेटीची उभारणी करून अनेक वर्षे झाली. पण त्याठिकाणी अनेक समस्या कायम होत्या. त्याचा वापर मच्छीमारांना होत नव्हता. कॉलरा साथरोगाच्या पार्श्वभूमीवर बोटमालक संघटनांच्या सहकार्यातून कुटबण जेटीवरील प्रलंबित कामे, स्वच्छतागृहांचा प्रश्न सोडवण्यात आला व आता जेटीचे उद्घाटन करण्यात आले.
कुटबण जेटीवरील अनेक प्रश्न मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रयत्नांमुळे सुटले व याचा फायदा मच्छीमारांना होणार आहे. तसेच, चिंचणी पंचायत घर उभारणीलाही मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी आमदार क्रुझ सिल्वा यांनी केली. जेटीच्या काही भागाची उभारणी व संरक्षक भिंतीच्या उभारणीसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या व सदर प्रश्न न्यायालयप्रविष्ठ असल्याने त्याच्या निर्णयानंतर मत्स्योद्योगमंत्री पुढील निर्णय घेतील. बोटमालकांच्या समस्या सोडवण्यासाठी यापुढे प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, कुटबण जेटीवरील पाहणीवेळी सरकारी जागेचा चुकीचा वापर केला जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे सरकारला कडक भूमिका घ्यावी लागली. ही राज्यातील मोठी मच्छीमार जेटी आहे व आजपासून खर्‍या अर्थाने याचा वापर बोटमालकांना होणार आहे. सरकारने या जेटीवर सुमारे १३ कोटी रुपये खर्च केले. लोकांच्या भल्यासाठी आणखीही खर्च केला जाऊ शकतो. पण सरकारवरील खटले मागे न घेतल्यास उर्वरित कामे होणे शक्य नाही. छोट्या बोटी लावण्यासाठी मत्स्य खात्याकडे प्रस्ताव द्यावा. जेटी वापरासाठी सरकार पैसे घेत नाही, डिझेल पंपही सरकारने उभारला असून सबसिडी दिली जाते. जलपुरवठा वाहिनी सरकारने केलेली आहे. लोकांना चांगल्या सेवा देण्याचे काम राज्य सरकार करत आहे.
बोटीवरही स्वच्छतागृहांची सोय करा!
बोटीवर जाण्याआधी कामगारांनी पोलीस पडताळणी, आरोग्याची तपासणी व अ‍ारोग्य कार्ड घेणे गरजेचे असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बोटमालकांनी फक्त मासे विकून पैसे कमवू नयेत, तर कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्याचीही गरज आहे. त्यासाठी बोटीवरही स्वच्छतागृहांची सोय करण्यात यावी. जेटीची स्वच्छता, कामगारांची काळजी, या गोष्टींवर बोटमालक संघटनांनीच लक्ष दिल्यास मोठ्या समस्या उभ्या राहणार नाहीत, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.