कुळे बाजाराला जत्रेचे स्वरूप : मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर जीप मालकांचे उपोषण तूर्त मागे
कुळे बाजारात रविवारी झालेली पर्यटकांची गर्दी.
फोंडा : कुळे येथील दूधसागर जीप ऑपरेटर्स आणि ‘जीटीडीसी’च्या काऊंटरमुळे निर्माण झालेला वाद मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे सुटला. दूधसागर जीप ऑपरेटर्स संघटना व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यात झालेल्या बैठकीत वाढवलेले शुल्क २०० रुपयांनी कमी करून ‘जीटीडीसी’च्या काऊंटरसह ऑनलाईन बुकिंगही सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे रविवारी कुळे बाजाराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले. हजारो पर्यटकांनी रविवारी दूधसागर धबधब्याचे दर्शन घेतले. दरम्यान, जीप मालकांनी साखळी उपोषण तूर्तास मागे घेतले.
गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या वादावर शेवटी शनिवारी रात्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठक घेऊन तोडगा काढला. गोवा पर्यटन विकास मंडळाने सुरू केलेला काऊंटर बंद करावा व संघटनेची वेबसाईट परत करण्याची मागणी जीप मालक करीत होते. रविवारी संघटनेचे अध्यक्ष नीलेश वेळीप यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयबाबतची माहिती जीप मालकांना दिली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या आदेशानुसार जीप मालकांनी सुरू केलेले साखळी उपोषण स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पर्यटकांना घेऊन जीप गाड्या धबधब्यावर गेल्या. रविवारी हजारो पर्यटकांनी कुळेमध्ये गर्दी केल्याने दुकानदारांनी समाधान व्यक्त केले. पर्यटकांमुळे कुळे बाजार पुन्हा गजबजाला.
वादावर तोडगा काढण्यासाठी माजी खासदार विनय तेंडुलकर, माजी मंत्री दीपक पाऊसकर, सावर्डे भाजप मंडळाचे अध्यक्ष विलास देसाई, रमाकांत गावकर, मच्छिंद्र देसाई व अन्य भाजप कार्यकर्त्यांनी महत्वाचे योगदान दिले. रविवारी सुद्धा स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फोंडा पोलीस स्थानकाचे उपअधीक्षक शिवराम वायंगणकर यांनी सुद्धा कुळे परिसरात जावून स्थितीचा आढावा घेतला.
जीपमालकांमध्ये फूट घालण्याचा प्रयत्न करू नये!
दूधसागर टूर ऑपरेटर संघटनेचे अध्यक्ष नीलेश वेळीप यांनी सांगितले, मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढला असून एका महिन्यानंतर पुन्हा बैठक होणार आहे. मागण्या मान्य करून घेण्यासाठी जीप मालकांना अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पाठींबा दिला. व्यवसाय सुरळीत सुरू ठेवण्यासाठी संघटना प्रयत्न करणार आहे. पण जीप मालकांमध्ये पुन्हा फूट पाडण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे आवाहन त्यांनी केले.