वक्तशीरपणा आणि मुद्देसूदपणा आकाशवाणीने मला शिकवला. शिस्त शिकवली. बातम्या दहा मिनिटे म्हणजे तितक्याच. लिहिलेल्या आहेत म्हणून आणखीन अर्धा मिनिट वाढवता येत नाही.
आकाशवाणीच्या वृत्त विभागात एक गोष्ट हमखास शिकता येते. डोकं थंड ठेवणे. ही गोष्ट मी प्रशिक्षणार्थी मुलांना कायम सांगत असतो. हा डोकं थंड ठेवण्याचा रियाझ जीवनाच्या कुठल्याही प्रसंगी कामी येतो.
दहा मिनिटांचं, पांच मिनिटांचं बुलेटीन, एफ. एम. हेडलायन्स या असतातच. मधून इतर प्रशासकीय धावपळ असते. मंत्र्यांचे महत्त्वाचे कार्यक्रम होत असतील, तर तिथं लक्ष ठेवावं लागतं. आपल्या रिपोर्टरला आठवण करावी लागते. नंतर केंद्रीय मंत्री गोव्यात असल्यास ती बातमी दिल्लीला पाठवा असा फोनचा धोशा दिल्लीहून सुरू होतो. कधीकधी व्हॉयस ओव्हर द्यायचा असतो. मधूनच तालुका वृत्तपत्र वा विधानसभा वृत्तांत आपल्या आवाजात रिकॉर्ड करायचा असतो.
आव्हानांची खैरात वा पाऊस कधी सुरू होईल याचा नेम नसतो. एक विलक्षण स्पीड असते. एकाच वेळी अनेक कामे. अशाच एका संध्याकाळी जोरात पाऊस पडत होता. विधानसभा सत्र चालू होतं. पाच वाजले असतील. वृत्तसंपादक सतीश नायक व विधानसभा वृत्तांत लेखक ज्येष्ठ पत्रकार बालाजी गावणेकर यांनी वृत्त कक्षात प्रवेश केला. बालाबाबांचं हस्ताक्षर समजणं तसं सोपं नव्हतं. मी ते वाचून सुधारणा करण्यास सुरुवात केली. पोर्तुगीज शब्द काढून शुद्ध कोंकणी शब्द भरायला सुरुवात केली. दुसऱ्या कक्षातून सतीशराव धावतच आले. “मुकेश, बालाबाबांची शुगर खाली आली आहे. त्यांना त्रास होतोय. तुझ्याकडे गोड असल्यास दे. नाही तर आकाशवाणी जवळच्या गाड्यावर जा आणि चॉकलेट आण. पळ लवकर.” पाऊस धुंवाधर वाढला होता. छत्री घेतली आणि जिन्यावर एक पाऊल टाकलं मात्र बाहेर वीज पडताच डोक्यात लख्ख आठवण झाली. त्या दिवशी दुपारी घरी आलेल्या मावशीने ऑफिसात येताना मला मोठ्ठ्या मॅंगो चॉकलेट्स दिल्या होत्या. मी गोड जास्त खात नाही म्हणून त्या खिशात तशाच राहून गेल्या होत्या. मला हर्ष झाला. मी मागे फिरलो. बालाबाबांना चॉकलेट्स दिल्या. पांच मिनिटात ते स्थिर झाले. जीव भांड्यात पडला. मी बातम्या लिहायला सुरुवात केली.
ही हकीगत जून १९८८ ची असेल. गोव्यात पाच जूनला भयानक वादळ झालं होतं. इतकं वादळ मी तरी कधी अनुभवलेलं नाही. मोठ्या प्रमाणात झाडे पडली होती. वीजयंत्रणा तीन दिवस गूल होती. या परिस्थितीत आम्ही बातमीपत्रं तयार करून कशी वाचली ते एक मोठं दिव्य होतं. इमरजन्सी लायटसुध्दा किती वेळ चालेल? विभाग प्रमुख दिलीप देशपांडे आणि मी सकाळी सहा वाजता कक्षात पोहोचल्यावर टॉर्च घेऊन बातम्या लिहिल्या. सर्व संपर्कच तुटला होता. वृत्त स्रोत कापले गेले होते. फोन चालत नव्हते. हळूहळू यंत्रणा जाग्यावर पडत होती. अशा वेळी बॅटरी सेलवरील ट्रान्सिस्टर कामी येतात. दिल्लीच्या हिंदी, इंग्रजी बातम्या रिकॉर्ड करायच्या व कॅसेट मागे पुढे करत त्या अनुवादित करायच्या. फार मोठी सर्कस ही. त्यासाठीही सराव हवा. आम्ही त्यात पकड मिळवली होती!
थंडीच्या दिवसात पहाटे सहा वाजता रेडिओवर पोहोचल्यावर काम सुरू. दाट धुकं असो की आणखीन काही. वेळेवर पोहोचायलाच पाहिजे. आभाळ फुटून रात्रभर पाऊस पडत असू दे, आपण पहाटे होडी तयार करून का असेना पण रेडिओ कक्षात पोहोचायलाच पाहिजे. जबाबदारी. त्या काळी मोबाइल नव्हते. उशीर झाला तर संपादकांचा ताण वाढायचा.
वक्तशीरपणा आणि मुद्देसूदपणा आकाशवाणीने मला शिकवला. शिस्त शिकवली. बातम्या दहा मिनिटे म्हणजे तितक्याच. लिहिलेल्या आहेत म्हणून आणखीन अर्धा मिनिट वाढवता येत नाही. पुढचा कार्यक्रम वा जाहिरात वा जिंगल असतं. त्या काळी वॉशिंग पावडर निरमा वगैरे जाहिरात असायची.
आणखीन एकदा गंमत झाली. आल्तिनोवरच्या प्रक्षेपकात काही गडबड झाल्याने प्रसारण बंद झालं. दुरूस्तीचं काम सुरू होतं. प्रसारणाचं काम बांबोळीच्या ट्रान्समिटरवरून सुरू झालं. आल्तिनोवर बातम्या तयार करून तिथं जावं लागे. जायला अर्धा तास. लवकर बातम्या तयार करून धावाधाव करावी लागे. संध्याकाळी सात वीसच्या प्रादेशिक खबरो. आम्ही जाऊ लागलो. भाटलें जवळ गाडी बंद पडली. एम्बसडर सरकारी गाडी. ‘आधीच उल्हास तातूंत फाल्गुन मास’ या म्हणीप्रमाणे आमची गत झाली. भराभर सगळे उतरलो. मागून गाडी ढकलली, सुरू झाली एकदाची. वाटेत देशपांडे सर मला सांगत होते. “तू जरा दीर्घ श्वासोश्वास कर पाहू. नाही तर तिथं मायकवर जाऊन हा, हा, हू, हू करून धापा टाकायला लागशील.”
आता गंमत वाटते, पण बाका प्रसंग असल्याने त्या वेळी अंगावर काटा आला होता.
मुकेश थळी, (लेखक बहुभाषी साहित्यिक, अनुवादक, कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत.)