गोवा। ‘समग्र शिक्षा’च्या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय होणार ६२ वर्षे !

केंद्रीय योजना असल्याने निवृत्ती वेतन नाही

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd November 2024, 12:05 am
गोवा। ‘समग्र शिक्षा’च्या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय होणार ६२ वर्षे !

पणजी : केंद्र सरकारच्या समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत राज्यात कार्यरत असलेल्या ब्लॉक तसेच क्लस्टर रिसोर्स पर्सन म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरीत दोन वर्षे वाढ देण्याचा निर्णय सरकारकडून लवकरच घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना वयाच्या ६२व्या वर्षापर्यंत नोकरी करता येणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी शनिवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.

समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या सुमारे १८५ कर्मचाऱ्यांनी वेतन वाढीसह निवृत्ती वेतन सुरू करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. त्याबाबत नुकतीच त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली होती. समग्र शिक्षा अभियान ही केंद्राची योजना असल्यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन देता येणार नाही. मात्र निवृत्तीचे वय ६० वरून ६२ वर्षे करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी ठेवला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

२०२२मध्ये वेतनात वाढ

समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना सुरुवातीला कमी वेतन मिळत होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २०२२ मध्ये त्यांच्या वेतनात घसघशीत वाढ केली होती. त्यानुसार नवीन रुजू होणाऱ्यांना २५ हजार, नोकरीत पाच वर्षे पूर्ण केलेल्यांना ३० हजार आणि दहा वर्षे पूर्ण केलेल्यांना मासिक ३५ हजार रुपये वेतन देण्यात येत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.