आपण जे जे लिहितो ते कठीण असतं. सोपं लिहिण्यासाठी आपणाला स्वाध्याय करायला लागतो. सायास करावे लागतात. आपणालाच अर्थबोध झाला नाही तर ऐकणाऱ्याला कसं उमजेल?
आकाशवाणीच्या बातम्यात एक विश्वासार्हता असते. कारण सरकारी बातम्यात संदिग्धता असून कसे चालेल? कुणी सांगितलं, कुणाला, कधी हे स्रोत महत्त्वाचे. ते दिले पाहिजेत. मृत्यूची बातमी, सरकारात फूट पडली किंवा पडणार ही शक्यता असलेली बातमी, जबाबदार नेत्यांचे वक्तव्य वा निवेदन यांच्यावरून बनवलेली बातमी, हे अगदी काळजीपूर्वक, निगुतीने द्यावं लागतं.
आताचा काळ मोबाईलचा व डिजिटल युगाचा. पण एक काळ असा होता की रेडिओच्या पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरो ऐकूनच लोकांना गोव्यात आजच्या दिवशी काय घडलं हे कळायचं. त्यात राजकीय बातम्या व घडामोडी असायच्या. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, खेळ, हवामान व इतर बातम्या असायच्या.
मला आठवण आहे की, एकदा गोवा विद्यापीठाचे पदवी परीक्षांचे निकाल वृत्त विभागात आले होते. ती बातमी मी तयार करून कोंकणीत वाचली. मला वाटतं, बी.ए. परीक्षेत असावी. राखी कमलाकार, म्हाळशी प्रथम आली होती. काणकोणला ही बातमी म्हाळशी कुटुंबियांनी व इतरांनी ऐकली. “तुझा अमूक मित्र सायकल मारत दूरवरून घरी अभिनंदन करायला आला.” असे म्हाळशी सरांनीच नंतर मला सांगितलं. असे अनेक प्रसंग आहेत. त्या काळी कला अकादमीच्या नाट्य स्पर्धेच्या निकालाच्या बातम्या प्रादेशिक बातम्यातून गोव्याच्या गावागावात पोहोचत. मला आठवण आहे, एकदा नागेशीच्या ‘अंत्रुज लळितक’ संस्थेचे ‘सत्य माड्डितां माड्डितां’ हे नाटक कोंकणी स्पर्धेत प्रथम आलं होतं. ती बातमी वाचल्यावर मला संस्थेचे रवीन्द्र नमशीकर यांचा फोन आला. नेहमीप्रमाणे त्यांनी वृत्तरचनेचं व वृत्तनिवेदनाचं कौतुक केलं. असे अनेक आनंदाचे क्षण आहेत.
सुरेश नायक नावाचे एक वृत्तनिवेदक पणजी केंद्रावर होते. मी त्यांच्या बातम्या हायस्कूलात असताना ऐकत असे. आवाजाचा जबरदस्त पोत व तशीच सुंदर दमदार कोंकणी वृत्त कथन शैली यामुळे ते लोकप्रिय होते. कोंकणीत ज्याला झेत म्हणतात तसा तो भारदस्त आवाज यायचा. त्यांचे भाऊ मुकुंद नायक हे चांगले वृत्तनिवेदक होते. ते अगोदर मुंबईला होते. त्यांनी ललित लेखनही केलं होतं. त्यांचं वृत्तलेखन आटीव, घोटीव असे. कवी उल्हास पै रायकर यांच्याही बातम्या मला आवडत. त्यांच्या आवाजात एक आर्जव, शांती विलसत असे. कोंकणीचं प्रेम उठून दिसे.
कोंकणी बातम्या म्हटल्या की त्यात वृत्तनिवेदक कोंकणी बोलणारा असेल तरच पूर्ण कोंकणी सुगंध उच्चारात बिबिंत होऊन येईल. हे भाषिक फोनेटिक्स महत्त्वाचं. लिखाणही कोंकणीचा परिमल असलेलं हवंच. एक उदाहरण देतो – ‘तातडीची बैठक बोलावली हे वाक्य आहे.’ ‘मंत्र्यांनी ताकतिकेची बसका आपयल्या’ हे वाक्य कोंकणीचा लेप घेऊन येतं. वाचतानाही न्याय्य व्हायला हवंच. तात्पर्य – बातम्या सुंदर परिपूर्ण लिहिणं व अस्खलित कोंकणीत त्या वजनदार शैलीत वाचणं या दोन भिन्न बाबी. लिहिणंही सुबोध पाहिजे व वाचणंही तितकंच छान.
टेलिव्हिजन यायच्या अगोदर बातम्यांचं वाचन फक्त रेडिओवरच चाले. अऩेक वृत्तनिवेदक रेडिओ माध्यमात तयार झाले होते. त्यांना नंतर टीव्हीवर संधी मिळाली. बातम्या लिहिताना वाक्यं लहान हवी. चार पाच शब्दांची, आटोपशीर. वृत्तपत्रासाठी बातमीतील वाक्ये लांब लांब रेलगाडीसारखी चालतील. पण आकाशवाणीवरील बातम्यांची रचना छोट्याशा वाक्यात गुंफणं महत्त्वाचं.
‘कठीण लिहिण सोपं.
सोपं लिहिणं कठीण.’
हा मंत्र मी होतकरू मुलांना तयार करताना सादरीकरणात अगोदर स्लायड टाकून शिकवतो. आपण जे जे लिहितो ते कठीण असतं. सोपं लिहिण्यासाठी आपणाला स्वाध्याय करायला लागतो. सायास करावे लागतात. अनुवादीत वाक्य हे गोळीबंद, शद्बबद्ध कोंदणासारखं हवं. आपणालाच अर्थबोध झाला नाही तर ऐकणाऱ्याला कसं उमजेल? पेपरची बातमी परत परत वाचू शकतो. श्राव्य बातम्यांत हे शक्य नसतं याचं भान अनुवादक, संपादक व वृत्तनिवेदकाला हवं. निवेदकाने मध्ये लय पकडायला हवी. संथ हळू लय धरली तर ते ऐकायला रटाळ होऊन जातं. काही निवेदक वाघ मागे लागल्यासारखे एकदाचं संपवून टाकतात. बातम्या समजत नाही.
अचूकता काटेकोरपणे बाळगावी लागते. वाक्यरचना अचूक हवी. अनुवाद व वाचन अचूक हवं. त्या काळी आम्ही हाताने लगबगीने लिहित असू. आता संगणक आले आहेत. त्यावेळी आमचंच अक्षर आम्हाला कळत नव्हतं. लायव्ह वाचताना गोंधळ उडण्याची भीती असे. ताण असे. एकदा एका निवेदकाला संपादकाने ‘H1N1’ असं लिहून दिलं होतं. त्यानं ते ‘एच वन एन वन’ असं वाचायचं सोडून ‘हिनी’ असं वाचून सोडलं. खरं म्हणजे तो आजार त्या दिवसात कायम चर्चेत बातम्यात होता. कुठलीही बातमी कधीही बदलू शकते म्हणून वृत्तनिवेदकाला सचेत राहण्याचं भान हवं.
मुकेश थळी, (लेखक बहुभाषी साहित्यिक, अनुवादक, कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत.)