खोज

रोमांचक लघुपट ‘खोज’ हे नाव वाचून मला आश्चर्य वाटले. अवघ्या सोळा मिनिटांचा हा लघुपट, यात काय रहस्य असेल? रहस्यमय वातावरण निर्मिती करायलाच किती वेळ लागेल आणि मग सगळी कथा सांगून कधी रहस्य उलगडणार?

Story: आवडलेलं |
26th October 2024, 07:18 am
खोज

अनेकदा आपण खूप पटकन एखाद्या माणसाबद्दल किंवा विषयाबद्दल मत बनवून मोकळे होतो. मग त्या माणसाच्या किंवा विषयाच्या संदर्भातले आपले सगळे विचार त्या ठराविक मतावरच आधारित असतात. अनेकदा आयुष्यभरदेखील आपण आपल्या अशाच मतांवर अडून बसण्याची शक्यता असू शकते. एखाद वेळेस मात्र एखादी घटना अशी घडते की आपले मत चुकीचे होते, घाईघाईत बनवले गेले होते हे आपल्या लक्षात येते. कित्येकवेळा तर आपल्या मताच्या अगदी विरुद्ध परिस्थिती असल्याचेही लक्षात येते. असेच काहीसे माझ्या बाबतीतही झाले. 

लघुपट म्हटले की काही ठराविक विषय माझ्या मनात यायचे. स्त्रीवादी गोष्टी, अन्याय/अत्याचार विरुद्ध लढा किंवा एखादी नवीन संकल्पना किंवा ठराविक चौकट मोडून, धैर्य दाखवून काहीतरी मांडण्याचा केलेला प्रयत्न. हा होता माझा पहिला गैरसमज. खरेतर, या आधी माझ्या बघण्यात आलेले लघुपटही साधारण असेच होते. त्यामुळे रहस्य, रोमांचक लघुपट ‘खोज’ हे नाव वाचून मला आश्चर्य वाटले. अवघ्या सोळा मिनिटांचा हा लघुपट, यात काय रहस्य असेल? रहस्यमय वातावरण निर्मिती करायलाच किती वेळ लागेल आणि मग सगळी कथा सांगून कधी रहस्य उलगडणार? बहुतेक नेहमीचीच काहीतरी गोष्ट असेल, असा काहीसा नकारात्मक विचार करतच मी तो बघायला घेतला. 

गोष्ट सुरू होत होती एका विशिष्ट घराच्या शोधात असलेल्या एका माणसापासून. झाले! नवीन घर, तेही एका ठराविक भागातले, मग तिथे जाऊन विचित्र अनुभव, मग त्यात काहीतरी रहस्य आणि शेवटी सगळ्याचा उलगडा असे अनेक वेळा वाचण्यात आलेले हे नेहमीचेच कथाबीज माझ्या मनात आले. तरी काय आहे हे जाणून घेण्यासाठीच मी अर्धवट न थांबता पुढे बघत राहिले. याहून वेगळे काही असू शकत नाही अशी माझी खातरीच होती! पण लघुपट जसा बघत गेले तसे लक्षात आले, की हा होता माझा दुसरा गैरसमज!

गोष्टीची सुरुवात जरी घर शोधणाऱ्या माणसापासून झाली असली आणि शेवटही जरी घरातल्या एका  रहस्याचा उलगडा होऊन होत असला तरीही त्या रहस्यापर्यंत पोहचण्याचा लघुपटाचा प्रवास मात्र निश्चितच नेहमीपेक्षा वेगळ्या वाटेने जाणारा होता. लघुपटाचा कालावधी अतिशय कमी असल्याने रहस्य नेमके काय आहे हा प्रश्न पडायच्या आतच त्याचा उलगडा व्हायची वेळ येते. पण तरीही त्यात कुठेही घाई केल्यासारखी वाटत नाही. कथेत रहस्य आणि ते उलगडायची प्रक्रिया या दोन्ही गोष्टींना योग्य तो न्याय मिळाला आहे असे मला वाटले. 

कमी कालावधीचा, फक्त पाच पात्र त्यातही दोनच मुख्य पात्र असणारा हा लघुपट एका छोट्या पण चांगल्या आणि वेगळ्या कथेमुळे प्रभावी आणि परिणामकारक झाला आहे. लघुपटांच्या बाबतीत माझे असलेले गैरसमज तर यामुळे दूर झालेच पण एका ठराविक बिंदूवर सुरू झालेली कथा अनपेक्षित मार्गावरून पुढे जाऊ शकते हेही या निमित्ताने कळले. 

जर सुरुवात बघून ‘काय हे  नेहमीचीच कथा असणार. यात काय वेगळे?’ असे म्हणत मी सोडून दिला असता तर? इथून पुढे लघुपट बघताना माझ्या मनात त्याचा प्रकार, कथा, विषय याबद्दल पूर्वग्रह असणार नाहीत त्याचे श्रेय या ‘खोज’ या २०१८ मधल्या लघुपटाचेच!


मुग्धा मणेरीकर, फोंडा