वक्तशीरपणा: शिक्षकी पेशाचा आणि शिस्तीचा पाया

शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी जिवंत आदर्श असतो. 'वेळ कोणासाठी थांबत नाही' या उक्तीप्रमाणे, शिक्षकाने केलेले वेळेचे अचूक नियोजन आणि अंगीकारलेला वक्तशीरपणाच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा आणि शिस्तीचा खरा पाया रचतो.

Story: शिकता-शिकविता |
23rd January, 09:41 pm
वक्तशीरपणा: शिक्षकी पेशाचा  आणि शिस्तीचा पाया

​"Time and Tide waits for nobody" ही इंग्रजीतील सुप्रसिद्ध म्हण आहे. याचाच सार मराठीत 'वेळ आणि लाटा म्हणजेच निसर्ग कोणासाठीच थांबत नाही' असा होतो. ते आपल्या प्रवाहात वाहत असतात. प्रत्येक क्षेत्रात वेळेचे नियोजन खूप महत्त्वाचे असते, पण एक शिक्षक म्हणून वावरताना वेळेचे भान ठेवणे अधिकच गरजेचे आहे.

​यामागचे खरे कारण असे की, शिक्षक ही सामान्य व्यक्ती नसून तो मुलांसमोर एक जिवंत आदर्श असतो. माझ्या अनुभवातील एक साधे उदाहरण - एका वर्गातील मुले नेहमी सकाळी आणि मधल्या सुट्टीनंतर उशिरा यायची. त्यांना विचारले असता ती म्हणाली, "आमचे वर्गशिक्षकच उशिरा येतात." मग एका दिवशी मुख्याध्यापकांनीच सरांना समज दिली, तेव्हा मुलांमध्येही आपोआप बदल दिसून आला.

​सर्वांना वाटते की शिक्षक म्हणजे अर्ध्या दिवसाचे काम. पण शिक्षकांच्या खांद्यावर खूप ओझे असते. जनगणनेचे सर्वेक्षण, निवडणुकांची कामे आणि इतर प्रशासकीय जबाबदाऱ्यांचा भार त्यांच्यावर असतोच. यासोबतच मुलांच्या वह्या तपासणे, हजेरी लिहिणे, उपक्रमांचे नियोजन आणि उत्तरपत्रिका तयार करणे अशी कामे शिक्षक हसत-हसत पूर्ण करत असतात.

​शिक्षकाने प्रत्येक गोष्टीचे नियोजन केल्यास ऐन वेळेवर होणारी धांदल टाळता येते. वेळेचे योग्य नियोजन केल्यास वक्तशीरपणा आपोआप येतो. मला वाटते, शिक्षकांसाठी वेळ नियोजनाची सुरुवात आदल्या दिवसाच्या तयारीपासूनच होते. मी स्वतःसाठी एक नियम बनवला आहे, जो तुम्हीही अवलंबू शकता: सकाळची धांदल टाळण्यासाठी लागणारी पुस्तके, वह्या व इतर साहित्य रात्रीच बॅगेत भरून ठेवणे. उद्याचे कपडे इस्त्री करून ठेवणे आणि पाण्याची बाटलीही रात्रीच बॅगेत भरणे. यामुळे सकाळी वेळ वाचतो आणि काही विसरायला होत नाही.

​अनेक महिला शिक्षिका घरचा स्वयंपाक, मुलांचे टिफिन आणि इतर कामे आवरून वेळेत शाळेत पोहोचतात, हे खरंच कौतुकास्पद आहे. हे केवळ वेळ नियोजनामुळेच साध्य होते. शाळेत तासांच्या नियोजनाप्रमाणे वार्षिक नियोजन पत्रक आणि पाठ टाचण तयार असल्यास अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होतो. शिक्षकांचे काम केवळ शिकवणे नसून मुलांवर संस्कार करणे हे देखील आहे. मला आठवते, आम्ही शाळेत उशिरा गेलो की आम्हाला शिक्षा म्हणून सफाईचे काम दिले जाई. गृहपाठ न केल्यास गुरुजी स्वतःचा डबा न खाता मधल्या सुट्टीत आमच्याकडून पाठांतर करून घेत. वक्तशीरपणाचे बीज कदाचित तेव्हाच आमच्यात पेरले गेले.

​महाविद्यालयीन शिक्षणातही मला असेच शिक्षक लाभले. इंग्रजीचे प्राध्यापक शरद जमखंडे सरांना वर्गात उशिरा आलेले कधीच खपत नसे. त्यांच्या नियोजनामुळे माझा १५ फेब्रुवारीला मिळणारा प्रोजेक्ट १५ जानेवारीलाच पूर्ण झाला. तसेच राज्यशास्त्राचे प्राध्यापक सय्यद अब्दुल्ला सरांचे शिकवणे म्हणजे प्रत्येक शब्द मोलाचा असे. एकदा आम्ही त्यांना न शिकवण्याची विनंती केली, तेव्हा ते म्हणाले, "I cannot do that, I am paid for my job." त्यांच्या या वाक्याने मला जाणीव करून दिली की, वर्गातील प्रत्येक सेकंदासाठी सरकार त्यांना पगार देते आणि वेळ वाया घालवणे हा नोकरीशी आणि मुलांशी केलेला अन्याय आहे.

​काम कितीही उत्तम असो, पण ते वेळेत झाले नाही तर त्याला महत्त्व राहत नाही. वृत्तपत्राचेच उदाहरण पहा - कालचा पेपर आज जुना होतो. त्याचप्रमाणे प्रत्येक शिक्षकाने स्वतःला अपडेट ठेवून वक्तशीरपणा बाळगणे आवश्यक आहे, कारण वेळ नियोजन हाच शिक्षकाच्या शिस्तीचा खरा पाया आहे.



- श्रुती करण परब