आपण संविधानाचे मूल्य कितपत पाळतो, देशाच्या विकासात आपले योगदान आहे की नाही. याचा विचार आज प्रत्येकाने करायला हवा.

आज माणसाने जागे झाले पाहिजे, जागून जग बघितले पाहिजे.
प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? हे जाणुन स्वतः कार्य केले पाहिजे.
कारण, आज आहे सर्वत्र अंधार, माहीत नसणाऱ्या विचारांचा.
म्हणूनच माणसा तू जाग आणि कर प्रयत्नांनी जग साकार.
जानेवारी महिना म्हटला की येतो मकर संक्रांतीचा सण. रथसप्तमी येता - येता जवळ पोहचतो आपला राष्ट्रीय सण म्हणजेच २६ जानेवारी. हा दिवस संपूर्ण भारतात उत्साहाने साजरा केला जातो. कारण या दिवशी भारताचे संविधान अंमलात आले. भारताचे संविधान अंमलात आल्यानंतर भारत एक सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक देश बनला.
यंदाचा प्रजासत्ताक दिन हा ७७ वा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा होईल. प्रत्येक वर्षी या दिवशी भारतीय संविधानाचे महत्व सगळीकडे अधोरेखित केले जाते. सरकारी कार्यालये, शाळा कॉलेजेस सर्व ठिकाणी भारताचा तिरंगा फडकवला जातो. या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींना उजाळा दिला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची माहिती मुलांना दिली जाते. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधानाची रचना करण्यात आली. आणि त्यामुळे प्रत्येक नागरिकाला समान हक्क, स्वातंत्र्य आणि न्याय मिळणे सोपे झाले.
प्रजासत्ताक दिन प्रत्येक नागरिकाला जबाबदार होण्याची एक प्रेरणा देतो. मात्र, आजच्या घडीला काही आव्हाने दिसून येतात. भ्रष्टाचार, बेरोजगारी, पर्यावरण प्रदूषण, जात व धर्माच्या नावावर होणारा भेदभाव हे प्रश्न अजूनही आज समाजात पसरलेले आहेत. संविधानात जे अधिकार आहेत ते महत्वाचे आहेत. पण त्याही पलीकडे त्या कर्तव्यांचे पालन करणे देखील तितकेच महत्वाचे आहे.
आज आधुनिकीकरणाच्या काळात देखील समाज सर्वोपरी सुधारलेला दिसत नाही. आज समाजात वावरताना स्त्रिया सुरक्षित नाही आहेत. अनेक ठिकाणी स्त्रियांचा छळ केला जातो, अत्याचार केले जातात. भारतीय नागरिकांना संविधानाने अनेक हक्क दिले पण आपले कर्तव्य पूर्णपणे बजावणे कोणालाही जमत नाही. त्यामुळेच, प्रजासत्ताक दिन आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची संधी देतो. आपण संविधानाचे मूल्य कितपत पाळतो, देशाच्या विकासात आपले योगदान आहे की नाही. याचा विचार आज प्रत्येकाने करायला हवा.
एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने संविधानाचा आदर करत त्यातील मुल्ये पाळली पाहिजेत. जेव्हा माणूस संविधानात दिलेल्या हक्कांचा आदर करून त्याचा उपयोग जीवनात करेल तेव्हाच खऱ्या अर्थाने देशप्रेम जपले जाईल आणि भारत एक सशक्त प्रजासत्ताक राष्ट्र बनू शकेल.
म्हणूनच, या २६ जानेवारीला मोठ्या मनाने ध्वज फडकवूया,
संविधानाचे पालन करून प्रजासत्ताक दिन साजरा करूया.

- पूजा भिवा परब
पालये, पेडणे-गोवा